Jump to content

ग्रंथवेष्टन


ग्रंथवेष्टन : (बुक जॅकेट). ग्रंथाच्या दोन्ही बाजूंनी आत घड्या घालून दुमडलेले मुद्रित वेष्टन. याला पूर्वीपासून मलपृष्ठ (डस्ट कव्हर) असेही म्हणले जाते.

इतिहास

ग्रंथनिर्मितीच्या प्रारंभीच्या काळात वारंवार हाताळल्यामुळे किंवा धुळीमुळे ग्रंथ खराब होऊ नये, म्हणून ग्रंथाभोवती एक साधे आवरण लावण्यात येई. ग्रंथाचे नाव कळावे, आतील मजकुराची पृष्ठे सुरक्षित राहावी हा मूळ हेतू. तथापि आधुनिक ग्रंथवेष्टनाचे हे आद्य स्वरूप होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून विक्रीच्या दृष्टीने ग्रंथोद्योग विकसित होऊ लागला. याच दृष्टिकोनातून या साध्या आवरणाचे रूपांतर कालपरत्वे, विशेषतः अनुभवपरत्वे, आकर्षक मुखपृष्ठात झाले. ग्रंथांचा खप वाढविणे, हे आवरणाचे आणखी एक कार्य ठरले. अर्थात प्रारंभी मुखपृष्ठ म्हणून ग्रंथावर केवळ एका रंगात मुद्रित केलेला जाड पुठ्ठेवजा कागद वापरण्याची प्रथा सर्वत्र रूढ होती. ग्रंथनाम, लेखक व प्रकाशक यांची नावे आणि ग्रंथाचे मूल्य हे सर्व या दर्शनी पृष्ठावर मुद्रित करण्याची प्रथा होती. चारही बाजूंनी एखादी नक्षीदार वेलबुट्टी (बॉर्डर) हे त्याचे मुख्य आकर्षण होते. कालांतराने ग्रंथांच्या मुखपृष्ठासाठी समर्पक चित्रयोजना करण्यात येऊ लागली. ग्रंथाचे मुखपृष्ठ चितारण्याचे काम त्या वेळच्या प्रथितशय चित्रकारांकडे सोपविले जाई. तथापि त्या वेळी ग्रंथवेष्टन हा चित्रकलेचा स्वतंत्र विषय मानला जात नसे. मुखपृष्ठावर चित्र टाकण्याचा प्रमुख हेतू ते आकर्षक दिसावे, एवढाच असावयाचा आणि अशी चित्रयोजना कल्पित कथाकादंबऱ्यांसाठीच होत असे. गंभीर विषयावरील ग्रंथांसाठी मुखपृष्ठ सजविण्याची प्रथा नव्हती. ही स्थिती विसाव्या शतकाच्या पहिल्या तीस वर्षांच्या कालखंडात आढळते.

एवढे खरे की, मुखपृष्ठ सजविण्याच्या हौसेतूनच ग्रंथवेष्टनाची आधुनिक संकल्पना उदयास आली. ग्रंथाच्या मुखपृष्ठांचा विचार त्याच्या खर्चासह स्वतंत्रपणे होऊ लागला. दुकानात ग्रंथ विक्रीसाठी ठेवले असता ग्रंथवेष्टनाचा उपयोग प्रामुख्याने जाहिरातीच्या दृष्टिकोनातून करण्याची कल्पना गेल्या तीसपस्तीस वर्षांतीलच आहे. साहजिकच मलपृष्ठाद्वारे होणारे ग्रंथसंरक्षण हा पहिलावहिला हेतू मागे पडला आणि ग्रंथाचे सौंदर्यवर्धन व त्याची जाहिरात हाच ग्रंथवेष्टनाचा प्रमुख हेतू बनला.

प्रकार

जाड पुठ्ठ्यांनी होणारी बांधणी व तीवर गुंडाळले जाणारे ग्रंथवेष्टन—तेही बहुधा बहुरंगी, गुळगुळीत कागदावर छापलेले, व्हार्निशचा हात दिलेले—यामुळे ग्रंथनिर्मितीचा खर्च वाढतो. आतील दोनशे पृष्ठांचा कागद व मुद्रण यांचा खर्च कित्येकदा ग्रंथवेष्टनाच्या खर्चापेक्षा कमी असतो, असे असूनही ग्रंथवेष्टनाचा वापर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पाश्चिमात्त्य देशांत पहिल्या महायुद्धानंतर, तर भारतात दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रंथविक्रीच्या संदर्भात ग्रंथवेष्टनास विशेष महत्त्व प्राप्त झाले. ग्रंथनिर्मिती व पर्यायाने ग्रंथविक्रीकार्यक्रमातील ते एक अटळ अंग होऊन बसले आहे. ग्रंथाच्या प्रकाशनाचा मूळारंभ म्हणजे त्याच्या मुखपृष्ठाचा विचार आता संबंधितांच्या अंगवळणी पडला आहे.

तंत्र

साहजिकच ग्रंथवेष्टनाच्या रचनेत तंत्रही वेगवेगळ्या दिशांनी विकसित होत आहे. ग्रंथविषयाची प्रतीकात्मक सूचना देणारे मुखपृष्ठ ग्रंथकर्त्यांना अधिक मोहविते मग ते नवकलेच्या तंत्रात बसणारे असो किंवा यथातथ्य चित्रकृतीने सजलेले असो. ग्रंथवेष्टनाचा एक हेतू जाहिरात असल्यामुळे अनुप्रयुक्त कलेच्या अभ्यासात हा एक रेखीव व निश्चित स्वरूपाचा विषय ठरला आहे. ग्रंथवेष्टनावरील चित्राची आखणी करताना पुढील घटक प्रमाणभूत मानले जातात : (१) ग्रंथाचे नाव, (२) कर्त्याचे व प्रकाशकाचे नाव, (३) प्रकाशनाचे बोधचिन्ह, (४) प्रमुख चित्रे, छायाचित्र किंवा आकृती व (५) ग्रंथाचा कणा म्हणजे जाडीकडील बाजू (स्पाइन). ग्रंथविक्रेत्यांना यांतील शेवटच्या घटकाचे म्हणजे ग्रंथाच्या कण्याचे फार महत्त्व वाटते. कारण जागेच्या काटकसरीमुळे विक्रीकेंद्रावर सर्व ग्रंथ त्यांच्या कण्याकडून लावलेले असतात. म्हणूनच या कण्यावर ग्रंथाचे व लेखकाचे नाव आणि प्रकाशन संस्थेचे बोधचिन्ह व पुष्कळदा किंमतही मुद्रित करावी लागते. नाणावलेले ग्रंथविक्रेते कोऱ्या करकरीत कण्याचे ग्रंथ विक्रीसाठी स्वीकारीत नाहीत.

मुद्रणपद्धतीमधील नवनवीन तंत्रांमुळे, विशेषतः यांत्रिक सोयींमुळे, ग्रंथवेष्टनाच्या आकृतिबंधात नाविन्य येत चालले आहे. पेन्सिल किंवा रंगीत खडूने रेखाटलेली चित्रे प्रतिरूप मुद्रणाच्या (ऑफसेट) साहाय्याने आता प्रभावी रीतीने पुनर्मुद्रित होऊ शकतात. एकरंगी वा बहुरंगी जलरंग–चित्रे साध्या कागदावर आकर्षक स्वरूपात छापणे ग्रेव्हूर मुद्रणपद्धतीमुळे शक्य झाले आहे व फ्लेक्झोग्राफिक मुद्रणपद्धतीमुळे सॅलोफेन किंवा प्लॅस्टिक पारदर्शक फिल्मवर रंगीत छपाई होऊ शकते. सारांश, ग्रंथवेष्टन मुद्रणात नाविन्य आणण्याच्या अनेक शक्यता आता निर्माण झाल्या आहेत. पाश्चिमात्त्य देशांत या तांत्रिक सोयींचा भरपूर लाभ घेतला जातो. ग्रंथवेष्टनामुळे ग्रंथाचे मूल्य जसे दोन्ही प्रकारे वाढते, तसेच त्याच्या सौंदर्यातही भर पडते, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे.

हेतू

यांखेरीज ग्रंथवेष्टनामुळे आणखी काही हेतू साध्य होतात. उदा., ग्रंथवेष्टनाच्या आत दुमडल्या जाणाऱ्या दोन्ही झडपांचा आणि दर्शनी चित्राचा भाग शेवटच्या पृष्ठावर आला नसेल, तर याही पृष्ठाचा उपयोग ग्रंथ विषयांचा व ग्रंथकर्त्याचा परिचय, त्याच्या अन्य ग्रंथांचे वा साहित्यांचे टिपण, ग्रंथाबद्दलचे विद्वत्‌जनांचे व वृत्तपत्रांचे प्रशंसावजा अभिप्राय, प्रकाशक अथवा लेखक यांच्या आगामी साहित्यकृतींचा निर्देश इ. जाहिरातस्वरूपातील मजकूर कटाक्षाने वापरण्यासाठी होतो. कण्याचा उपयोग मात्र वर सांगितल्याप्रमाणे दर्शकपाटा (शो केस) मध्ये ग्रंथ उभे लावल्यानंतर त्यांचे व ग्रंथलेखकांचे नाव समजण्यासाठीच होतो. तसेच ग्रंथप्रकाशक व ग्रंथविक्रेते यांच्याप्रमाणे ग्रंथपालालाही वेगळ्या कारणांसाठी ग्रंथवेष्टनाचा उपयोग होतो. उदा., ग्रंथालयात येणाऱ्या कोणत्याही नव्या ग्रंथाचा किंवा ग्रंथकाराचा परिचय ग्रंथवेष्टनावरून वेगळा कापून तो त्या ग्रंथाच्या पहिल्या पृष्ठावर चिकटविता येतो. तसेच ग्रंथवेष्टने काढून ती त्यांना दर्शकपाटात लावता येतात. साहजिकच ग्रंथवेष्टनामुळे वाचकांना नवनवीन ग्रंथांचा परिचय अत्यंत प्रभावी रीतीने करून देता येतो. एकूण ग्रंथवेष्टन ही ग्रंथोद्योगातील एक महत्त्वाची कलात्मक प्रक्रिया आहे.