Jump to content

गोविंदप्रभू

गोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११८७; - इ.स. १२८५/८६) हे महानुभाव संप्रदायातील पंचकृष्णांपैकी चवथे परमेश्वर अवतार होते. त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता,ते काण्वशाखीय ब्राह्मण होते.महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता.तत्कालीन सर्व रूढी व परंपरा, अंधश्रद्धा,जाती भेदभाव दूर करत स्त्री- पुरुष समानता,स्वातंत्र्य,समता,बंधुता इ. चा कृतीतुन संदेश दिला

बालपण

लहानपणीच आईवडील वारल्याने गोविंदप्रभू यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला. त्यांनंतर वेद अध्ययन करण्यासाठी ऋद्धिपुर येथे आले.,बालपणी श्रीगोविंद प्रभूंनी अचाट बुद्धी स्वीकार केली, अनेकांना जो अभ्यास एक महिन्यात येत तो श्रीप्रभूंना एका दिवसात येत....

गोविंदप्रभू चरित्रलीळा

ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिसे' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत [ संदर्भ हवा ]. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले [ संदर्भ हवा ]. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता [ संदर्भ हवा ]. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.[]

स्त्री आणि शूद्रादींचा उपासनेत सहभाग आणि प्रबोधन

स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावांत समेट घडवितात. 'मातंगा विनवणी स्वीकारू' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचे वर्णन केले आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाहीत. "आम्ही पाणीयेवीण मरत असो", अशी काकुळती ते लोक करतात, तेव्हा गोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात. [ संदर्भ हवा ].

केशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचे उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्याच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही.

सामाजिक परिवर्तनाचे मूळ आधारस्तंभ

सामाजिक परिवर्तनाचे मूळ आधारस्तंभ

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय वातावरणाला प्रचंड असा वारसा आहे. आजतागायत नवनवीन बदल वर्तमान युगात होत आहे. सत्ता संघर्षाच्या काळात अनेक धर्म राजश्रयाला गेली होते. अनेक ठिकाणी संस्कृतीच्या नावावर आणि धार्मिक अधिष्ठान कायम ठेवत अन्यथाज्ञान वाढीस लागले होते. समोर वाऱ्याच्या प्रवाहाने हलणारी दोरी ही साप आहे की दोरी आहे, हे पडताळून न पाहता सांगणे आणि ऐकणे इतकेच काम समाजाने स्वीकारले होते. व्रतवैकल्याच्या नावावर अनेक विधी भरमसाठ प्रमाणात करून घेतल्या जात होत्या. राज्यकर्त्यांच्या सत्तांतरामध्ये हाजीर तो वजीर या न्यायाने गरीब समाज हा गरिबीतच राहत गेला तर श्रीमंत समाज हा श्रीमंत होत गेला. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्गाची विभागणी जरी गुण आणि कर्मानुसार झाली असली तरी प्रत्यक्षात गुण आणि कर्म कुणीही पाहत नव्हते. ब्राम्हण समाजात जन्माला आला म्हणून ब्राम्हण, क्षत्रियामध्ये जन्माला आला म्हणून क्षत्रिय अशी मांडणी होत गेली. परिणामी लोकांनी सोयीनुसार जात वर्ग विभागणी केली. यामुळे शिक्षण, संरक्षण, सेवा आणि दास्य हे व्यवसायाचे चार घटक तयार झाले. अशा विभागणीनुसार वरच्या गटाची सत्ता छोट्या गटावर राहत गेली. प्रस्थापित समाज व्यवस्था इतकी बिघडली असताना परिवर्तनवादी विचारांचा एक नवीन वर्ग निर्माण होत गेला.परंतु ठिकठिकाणी हा परिवर्तनवादी विचार खोडण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला आहे. परिवर्तनवादी विचार बिघडत चाललेल्या समाजाला प्रत्येक वेळी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण या मध्ये प्रस्थापितांची दुकाने बंद होतील या पोटी प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन हा संघर्ष कित्येक काळ या समाजात चालत आलेला आहे. परंतु ठोक मुद्दे नसल्यास परिवर्तन हेही अधुर रहात आणि त्याला गळती सुरू होते. अकरावे आणि बारावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक परिवर्तनाचा काळ होता. वऱ्हाड प्रांतात एक ईश्वर पुरुष जन्माला आले ते म्हणजे गोविंदप्रभु होय. त्यांनी सतत १२५ वर्ष आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी खर्च केले आहे. श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरूसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला. त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. तात्कालीन धार्मिक परिस्थिती फार कठीण होती. हेमाद्री पंडिताच्या चतुर्वग चिंतामणी या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव सामान्य जनतेवर पडलेला आहे. त्याकाळी महार, मातंग, चांभार या घटकांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यांची घरे गावच्या एका बाजूला स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी गोविंदप्रभु त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले. त्यांच्या मुलांच्या ताटातील अन्न प्रेमाने खाऊ लागले. लगेच गावच्या महाजनामध्ये यासंबंधी चर्चा होऊ लागली. "राउळ मातांगा महाराचां घरोघरीं विचरताति : आणि तैसेचि दीक्षिता । ब्राह्मणाचां घरी विचरताति" असे उद्गार त्या मंडळींकडून येऊ लागले. श्रीगोविंदप्रभू मातंग महारादी शुद्रांच्या घरी जातात. हा परिवर्तनवादी बदल गावातील महाजनांना पाहवत नव्हता. म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु गोविंदप्रभु डगमगले नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मोडून महार मतांगच्या घरी जाणे, खाद्यपदार्थ खाणे हा परिवर्तनवादी विचार महाजनांना रुचला नाही. शूद्रांना त्याकाळी रिद्धपुरात पाणी पिण्याची सोय नव्हती.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त राऊळच सोडवू शकतात. म्हणून सर्व बांधव राऊळा जवळ गेले आणि विनंती केली "राउळो : आम्ही पाणियेंवीन मरते असों : तरि काइ की जी : ?" त्यावर लागलीच गोविंदप्रभुनी ज्या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकानी इशारा केला. विहीर खणल्यावर लगेच त्याला पाणी लागले. आपला प्रश्न इतक्या तातडीने सोडवल्याबद्दल सर्वच समाज बांधव खुश झाले. "राउळ माय राउळ बापु: राउळाचेनि प्रसादं आम्ही पाणी पीत असो." असे उद्गार या बांधवांनी काढले. या आधी दलितांच्या प्रश्नाला अशी वाचा कुणीच फोडली नव्हती. या आधी असा प्रयत्न महाराष्ट्रात कधीही झाला नाही. गोविंदप्रभुनी त्याकाळात केलेल्या या कार्याचा परिणाम इतका झाला की, हा समाज माणूस म्हणून जगू लागला. स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता. इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत,तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप' म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. कधी सहज कुणाच्या मुखी शब्द यायचे " हे साचोकार ईश्वर होयः हे करणचरणवंत ब्रम्ह होयः जीवनमुक्त वस्तु ते ऐसी: " लगेच ते मिश्किलतेने उत्तर द्यायचे "ना हं मनुष्यो नच देवयक्षो न ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। न ब्रम्हचारी न गृहीवनस्थो: भिक्षुर्ण चाहं निज बोध रूप ;" वरील सर्व बाजूंचा विचार केला असता गोविंदप्रभु हेच महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात. परंतु आज महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारांचे झेंडे लावणारे गोविंदप्रभुला विसरले की काय असा ठळक मुद्दा समोर येतो. त्यांच्या ओठी चुकूनही गोविंदप्रभुचे नाव येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या मूळ प्रबोधनकाराला आपण विसरलो तर नाहीना हे समाज प्रबोधनकारांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्या रिद्धपूर भूमीत गोविंदप्रभूंनी आपलं उभं आयुष्य परिवर्तनासाठी घातलं त्या ठिकाणाची उपेक्षाच राहिली आहे वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.[]

पुस्तके

  • श्री गोविंदप्रभु चरित्र (व.दि. कुलकर्णी)
  • श्रीगोविंदप्रभू - चरित्र (डाॅ. वि. भि. कोलते)


संदर्भयादी

  1. ^ डॉ. यू.म. पठाण. "श्री गोविंद प्रभू". १४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  2. ^ डॉ. यू.म. पठाण. "श्री गोविंद प्रभू". १४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]