गोविंद बाबाजी जोशी
गोविंद बाबाजी जोशी (जन्म : इ.स. १८२६; मृत्यू १ मे १९०६) हे महाराष्ट्रातील आद्य हिंदू मिशनरी होते. त्यांचे फारच कमी शालेय शिक्षण वसई येथील मराठी शाळेत झाले होते. त्यानंतर त्यांनी घरी राहूनच वाचन-लेखनाचा परिपाठ ठेवला.
गोविंद जोशी यांचा इंदूर आणि बडोदा संस्थानिकांशी जवळचा संबंध होता. त्याकाळी मल्हारराव गायकवाड हे बडोद्याचे अधिपती होते. त्यांच्या कार्याच्या प्रचारासाठी गोविंद बाबाजी संपूर्ण हिंदुस्थानभर फिरले.१८६२ ते १८७७ दरम्यान असा तो १५ वर्षांचा फिरतीचा काळ होता. अगदी रात्री-अपरात्री रेल्वे, बैलगाडीने, बोटीने तर कधी पायी त्यांनी प्रवास केला. या प्रवासाचे वर्णन त्यांनी ‘रोजनिशी’च्या स्वरूपात लिहिले. प्रवासात भेट दिलेल्या स्थळांची ऐतिहासिक, धार्मिक सामाजिक अशी साद्यंत माहिती जमवून ती जोशींनी पुस्तकरूपाने प्रकाशित केली. त्यांच्या ’गेल्या तीस वर्षापूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकीकत (रोजनिशी)’ या प्रवासवर्णनात प्रथमच रोजनिशी पद्धतीचा वापर केलेला आहे. लोकांची राहणी, विचार एवढेच नव्हे तर गावोगावीची उत्पादने, इमारतींची, शब्दोच्चारांची वैशिष्ट्ये त्यांनी ‘रोजनिशी’त नोंदवली. नद्यांची, रस्त्यांची वर्णने केली. गावात भेटलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती, सभेला हजर असणाऱ्या लोकांच्या याद्या, त्यांची भाषणे सारे काही टिपले. हा सर्व प्रवास पदरमोड करून, कष्ट उचलून, ध्येय मनात बाळगून केला. ही रोजनिशी म्हणजे १९व्या शतकातील समाज कसा होता याचे चित्रच आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांत १८८७ सालचे काँग्रेसचे मद्रास येथील अधिवेशन, १८९४ सालचे लाहोरचे अधिवेशन आणि १८९८ सालची राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची सुसंगत माहिती दिलेली आढळते.
गोविंद आबाजी जोशी हे विचाराने सुधारक होते. विधवाविवाह त्यांना मान्य होता. त्यांनी लिहिलेल्या ’हिंदू लोकांस विनंति’ व ’वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ’ या दोन, बालविवाह आणि वृद्धांचे विवाह यांपासून होणाऱ्या अनर्थाची कल्पना देणाऱ्या पुस्तकांवरून त्यांची विचारधारा स्पष्ट होते.
गोविंद बाबाजी यांचे सर्वात मोेठे कार्य म्हणजे रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची त्यांनी केलेली डागडुजी. १८८६ साली त्यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था पाहून त्यांनी स्वतः इंजिनीयर किल्ल्यावर धाडला. समाधीची डागडुजी, तिच्यावर बांधावयाची मेघडंबरी, जगदीश्वराच्या देवळाची दुरुस्ती या कामांचा अंदाजे खर्च तयार करून घेतला व दुरुस्ती पू्रणत्वास नेली..
देशातील अडाणी जनतेला तिच्या दुःखाची आणि हक्कांची जाणीव करून द्यावी, आणि सुस्थितीचा मार्ग दाखवावा या उद्देशाने गोविंद बाबाजी जोशी यांनी हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांतून प्रवास करताना देशाभिमान, नीती, परोपकार, सत्य आदी विषयांवर ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे भाषणे दिली.. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातले आद्य हिंदू मिशनरी म्हणतात.
त्यांनी वसई अससोसिएशन 1862 मध्ये व ठाणे अससोसिएशन 1868 मध्ये स्थापन केले.
गोविंद बाबाजी जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- गेल्या तीस वर्षांपूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकीकत (१८९६)
- थोडासा प्रवास - पुणे ते गोवा (१८९१)
- भारताचे थोडक्यांत सार (१९०१)
- रायगड किल्ल्याचे वर्णन - छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धाराविषयी प्रार्थना (१८९१)
- लाहोरचा प्रवास - प्रवासाची व सामाजिक परिषदेची हकीकत (१८९५)
- वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ (१९०१)
- हिंदू लोकांस विनंती (१८८५)
चरित्रग्रंथ
लेखक अरुण रा. जोशी यांनी ’गोविंद बाबाजी जोशी (वसईकर) - एक उपेक्षित समाजसुधारक’ या नावाने गोविंद बाबाजींचे चरित्र लिहून केव्हातरी इ.स. १९४६ च्या आधी प्रकाशित केले आहे.
पुनःप्रकाशन
काही वर्षांपूर्वी उन्मेष अमृते, अमित जठार आणि गिरीश ढोके या तिघा मित्रांच्या गप्पात दुर्मिळ पुस्तकांचा विषय निघाला. अनेक लेखकमंडळी, अभ्यासक १९ व्या शतकात होऊन गेली आणि त्यांचे साहित्य आज शोध घेऊनही सापडत नाही. अशी दुर्मिळ पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचे आणि अनमोल ठेवा जतन करण्याचे तिघांनी ठरवले. 'रोजनिशी' हे त्यांतले पहिले पुस्तक आहे. गोविंद बाबाजी यांच्या ‘रोजनिशी’च्या हजार प्रतींपैकी ६०० प्रती राज्यातील वाचनालयांना मोफत वाटल्या जाणार आहेत, तर उर्वरित प्रती अभ्यासक, विचारवंतांना दिल्या जाणार आहेत.