गोराडू
गोराडू (इं.: व्हाइट यॅम, ग्रेटर यॅम लॅ.: डायॉस्कोरिया ॲलाटा) हा कोनफळाचा एक प्रकार आहे. याची वेल सुमारे १५ मीटर उंच वाढणारी असून वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) प्रकारची असते.[१][२]
डायोस्कोरिया अलाटा हे या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे जे या वनस्पतीशी संबंधित आहे. डायोस्कोरेसी कुटुंब. इंग्रजीमध्ये याला पर्पल याम, ग्रेटर याम, गयाना ॲरोरूट, टेन-मंथ्स याम, वॉटर याम, व्हाईट याम, विंग्ड याम किंवा फक्त याम म्हणतात. याची वेल एका हंगामात उत्पादन घेतल्यानंतर मरते; पुढील वर्षी जमिनीतील कंदातून नवीन कोंब परत वाढतो. त्याच्या देठावर लहान गडद जांभळ्या रंगाचे कंद आणि भूगर्भात मोठा तपकिरी कंद वाढतो. दोन्ही कंद मातीत लावल्यास त्यापासून नवीन वेली उगवतात. तसेच हे दोन्ही प्रकारचे कंद खाण्यायोग्य असतात. ते शिजवून खाल्ले जातात. या वेलीची कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता पडत नाही..[३][२]
या वेलीचे मूळस्थान आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात. भारतात हीची अनेक ठिकाणी लागवड होते. डायॉस्कोरिया पार्सिमिलिस व डायॉस्कोरिया हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते आहे. हिचे सुमारे ७२ प्रकार ओळखले गेले आहेत. खोड चौकोनी व काहीसे सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत इतर झाडांवर चढते. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. फुले एकलिंगी फळे (बोंडे) सपाट व बी सपक्ष असते. पानांच्या बगलेत अनेक आकार-प्रकारच्या कंदिका (लहान कंद) येतात. जमिनीत विविध प्रकारची ग्रंथिल मुळे (घनकंद) येतात. तपकिरी रंगापासून ते गर्द काळ्यापर्यंत अनेक छटा त्यांवर आढळतात. ती खाद्य आहेत. काही प्रकारांत त्यांची लांबी १·८५-२·५० मी, आढळते त्यांतील पिठूळ मगज (गर) नरम, पांढरा किंवा मलईसारखा, जांभळट किंवा लालसर असतो, त्यात २१ टक्के स्टार्च असतो. ही मुळे वाळवून व पीठ करून अथवा बटाट्यासारखी भाजी करून किंवा तळून खातात. वन्य जमाती भाताऐवजी खातात. जांभळट रंगाच्या मुळाचा उपयोग आइसक्रीमला रंग व स्वाद आणण्यासाठी करतात. ही मुळे कृमिनाशक असून महारोग, मूळव्याध व परमा इत्यादींवर वापरतात.[२]
गोराडूची लागवड सुरण, आले किंवा हळदीच्या पिकात मिश्रपीक म्हणून करतात किंवा स्वतंत्र पीक म्हणूनही लावतात. गुजरातमध्ये याची लागवड बरीच होते.[२]
गोराडूला १००–१५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाला ६० सेंमी. खोल, मध्यम काळी किंवा रेतीमिश्रित पोयट्याची जमीन उत्तम समजतात. भारी चिकण जमिनीत ग्रंथिल मुळे चांगली पोसत नाहीत.[२]
लागवडीपूर्वी जमीन २०-२२ सेंमी. खोल नांगरून, ढेकळे फोडून हेक्टरी २५-३० टन भरखत घालून, वखरपाळ्या देऊन, चांगली नरम आणि भुसभुशीत करतात. रेताड जमिनीत स्वतंत्र पिकांसाठी वाफे व भारी प्रकारच्या जमिनीत रुंद वरंबे करतात. मिश्रपिकाच्या बाबतीत मुख्य पिकासाठी काढलेल्या सऱ्यांचा उपयोग केला जातो.[२]
गोरडूच्या कंदात २१ टक्के कार्बोहायड्रेट (स्टार्च), ७३ टक्के पाणी असते. याचे तुकडे करून तेलात तळून, उकडून किंवा निखाऱ्यावर भाजून खाल्ले जातात. तसेच आयुर्वेदिक औषधीसाठी याचे वाळवून चूर्ण केले जाते. याच्या स्टार्चचा कच्चा माल म्हणून अल्कोहोल बनवण्यासाठी वापर केला जातो.
गुणधर्म
आयुर्वेदानुसार मधुर रस, गुरु, स्निग्ध गुण आणि शीतशक्ति असलेली ही एक औषधी वनस्पती आहे. हीची कंद आयुर्वेदीय औषधी म्हणून वापरली जातात. वाजीकरण, शुक्राणूंची संख्या आणि कामवासना वाढवते. लघवीलां साफ होते. पोटातील जंत मरतात. मनःशांती मिळते. तहान कमी करते. याने मधुमेह, कुष्ठरोग, प्रमेह, लघवीचा जलोदर बरा होतो. कंद नीट शिजवून प्रमाणात खाल्ल्याने शरीर निरोगी आणि मजबूत होते.
आधुनिक औषधात काही प्रजातींपासून तयार केलेले "स्टेरॉइड सॅपोजेनिन" हे गर्भनिरोधक गोळ्यांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते.
१०० ग्रॅम गोराडू मधुन पुढील पोषक द्रव्ये प्राप्त होतात - ०.२९ मिलीग्राम जीवनसत्व बी६, २७.८९ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ०.१८ मिलीग्राम तांबे, १७.१ मिलीग्राम जीवनसत्व सी, ८१६ मिलीग्राम पोटॅशियम, ४.१ ग्रॅम एकूण आहारातील तंतुमय पदार्थ, ०.११ मिलीग्राम जीवनसत्व बी१, ५५ मिलीग्राम फॉस्फरस, ०.५४ मिलीग्राम लोह, ०.३१ मिलीग्राम जीवनसत्व बी५, २३ मिलीग्राम जीवनसत्व बी९, २१ मिलीग्राम मॅग्नेशियम, ०.५५ मिलीग्राम जीवनसत्व बी३, १.५३ ग्रॅम प्रथिने, ०.०३ मिलीग्राम जीवनसत्व बी२ आणि ०.२४ मिलीग्राम जस्त.[४]
लागवड
लागवड मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला करतात. बेण्यासाठी मागील सालच्या उत्पादनापैकी पोसलेली निरोगी ग्रंथिल मुळे वापरतात. त्यांचे १००–१५० ग्रॅ. वजनाचे प्रत्येकी दोन डोळे असलेले तुकडे ७५ × ७५ सेंमी. किंवा ९० × ९० सेंमी. अंतरावर ओळीत प्रत्येक जागी एक याप्रमाणे १० सेंमी. खोल लावतात. हेक्टरी १,२५०–१,५०० किग्रॅ. बेणे लागते. आले-हळदीमधील मिश्रपीक १·५–३ मी. अंतरावर लावतात. त्याकरिता बेणे ४००–४८० किग्रॅ. लागते. लावलेल्या बेण्यातून निघालेले एकदोन जोमदार वेल ३० सेंमी. इतके वाढले की, त्यांच्याजवळ उंच बांबू पुरून आधार देतात. हेक्टरी ६०–७५ किग्रॅ. नायट्रोजन दोन समान हप्त्यांनी देतात. पहिला हप्ता लागणीनंतर एक महिन्याने आणि दुसरा पहिल्यानंतर एक महिन्याने देतात. आवश्यकतेप्रमाणे निंदणी करतात व पाणी देतात. मिश्रपिकाला मुख्य पिकाला दिलेल्या मशागतीचा व खतपाण्याचा फायदा मिळतो.[२]
लागवडीपासून ६-७ महिन्यांत ग्रंथिल मुळे तयार होतात. त्यावेळी वेलावरील जुनी पाने पिवळी पडून गळू लागतात, वेलाच्या बुंध्याभोवतालची जमीन भेगाळते. वेल थोडेसे सुकल्यावर बुंध्याजवळची माती खणून ग्रंथिल मुळे न दुखवता काढून घेतात. प्रत्येक वेलापासून एक दोन मोठी ग्रंथिल मुळे मिळतात. योग्य प्रकारे तयार होण्यापूर्वीच खणून काढल्यास साठवणीत ती टिकत नाहीत. ग्रंथिल मुळे काढल्याबरोबर विकतात किंवा थंड कोरड्या जागेत साठवितात.[२]
सामान्यतः गुजरातमधील पिकापासून हेक्टरी १५,०००–१७,००० किग्रॅ. उत्पन्न मिळते. मिश्रपिकापासून हेक्टरी ७,०००– ८,००० किग्रॅ. उत्पन्न येते.[२]
गोराडूवर महत्त्वाचे कीटक उपद्रव आणि रोग नाहीत.[२]
विविध भाषेतील नावे
- हिंदी: चुपरी आलू, खमालू,
- कन्नड: टेंगुगेनासु, हेगेनासु,
- मल्याळम: कासिल, कवुट्टू,
- तमिळ: कास्तान कासिल,
- इंग्रजी: ग्रेटर याम, एशियाटिक याम
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Dioscorea alata was first described and published in Species Plantarum 2: 1033. 1753. "Name - Dioscorea alata L." Tropicos. Saint Louis, Missouri: Missouri Botanical Garden. May 26, 2011 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h i j "गोराडू". मराठी विश्वकोश. ९ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ Bevacqua, Robert F. (1994). "Origin of Horticulture in Southeast Asia and the Dispersal of Domesticated Plants to the Pacific Islands by Polynesian Voyagers: The Hawaiian Islands Case Study" (PDF). HortScience. 29 (11): 1226–1229. doi:10.21273/HORTSCI.29.11.1226.
- ^ "Purple yam facts and health benefits" (इंग्रजी भाषेत). १८ जानेवारी २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च २०२४ रोजी पाहिले.