गोरखचिंच (शास्त्रीय नाव: Adansonia digitata, अदानसोनिया डिजिटेटा ; इंग्लिश: African baobab , आफ्रिकन बाओबाब ;) हा मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे व आता उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा वृक्ष आहे. याच्या नऊ प्रजातींपैकी सहा फक्त मादागास्करमध्ये आढळतात. मायकेल ॲडनसन या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने या वृक्षाचे वर्णन केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ Adansonia digitata हे नाव देण्यात आले. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होत असून हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात. खोडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते, त्यामुळे पाणी कमी असलेल्या प्रदेशातसुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य १००० वर्षे असते. खोडे पोकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खोडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लोकांनी आश्रय घेतला होता.महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात धमोरी येथे पुरातन वृक्ष असून परिसरातील लोक येथे पूजा करतात गोरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले अशी आख्यायिका आहे.
नावामागील आख्यायिका
गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते. याच्या बाओबाब या आफ्रिकन नावाचा अर्थ ज्येष्ठवर्य असा आहे.
उपयोग
फळाचे साल मखमली असून वजन साधारण १.५ किलो असते. गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात. गरापासून शीत पेय करतात. गराचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यांवर या पेयाचा उपयोग होतो. जंगली प्राणी याची पाने आवडीने खातात. माणसे खोडाचे तुकडे चघळून शोष कमी करतात. खोडाच्या अंतरसालापासून मजबूत दोर व गोणपाट तयार केले जातात. फळाच्या वाळलेल्या करवंट्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. लाकूड हलके असते. त्यामुळे गुजरातमध्ये याच्या लाकडापासून मासेमारीसाठी होड्या तयार केल्या जातात. अंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो. या वृक्षावर सुगरणीसारखे पक्षी घरटी करतात.