Jump to content

गोदावरी परुळेकर

गोदावरी परुळेकर
जन्म: १९०८
मृत्यू: ऑक्टोबर ८, १९९६
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
साम्यवाद
संघटना: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पत्रकारिता/ लेखन: जेव्हा माणूस जागा होतो
पुरस्कार: साहित्य अकादमी पुरस्कार
पती: शामराव परुळेकर

गोदावरी शामराव परुळेकर (जन्म : १४ ऑगस्ट १९०८; - ८ ऑक्टोबर १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या.

गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. प्रसिद्ध वकील असलेल्या वडिलांनी आपल्या या लेकीला वैचारिक स्वातंत्र्य दिले, तसेच कृती करण्यासाठी पाठबळही पुरवले. त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते. बी.ए. एल्‌एल.बी. झालेल्या गोदावरीबाईं कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. या विवाहामुळे कामगारांच्या प्रश्नांच्या विविध पैलूंशी त्यांचा परिचय झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना वरचेवर तुरुंगवासात दिवस काढावे लागले. युद्ध संपल्यानंतर त्या वारली शेतकऱ्यांशी जोडल्या गेल्या. त्या शेतकऱ्यांची वेठबिगारीत दखल घेतली जात नव्हती आणि समाजात त्यांना प्रतिष्ठाही नव्हती. आपली दखल घेतली जावी आणि आणि सामाजिक उन्नती व्हावी यासाठी वारली शेतकरी करत असलेल्या संघर्षाचा त्याही एक भाग बनल्या. []गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाज्याच्या त्या सदस्य बनल्या.

१९१२मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद साहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात मोलाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी त्यांची ११ मोफत ग्रंथालये व १० मोफत वाचनालये मोफत चालू होती.

१९४५ च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, `जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली. 'जेव्हा माणूस जागा होतो' या समाजशास्त्रीय ग्रंथातून त्यांनी जमीनदारांकडे पिढ्यान्‌पिढ्या वेठबिगारीने काम करणाऱ्या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे. आदिवासी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिल्यावर हा माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे.यातील ‘वेठबिगारी गाडून टाकली’ या प्रकरणातून आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात नवचैतन्य कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे. याखेरीज त्यांनी आर्थर रोड, ठाणे, दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या गुन्हेगारावर ‘बंदिवासाची आठ वर्ष’ हे पुस्तक लिहिले. ठाणे जिल्ह्यतील वारली या जमातीच्या महिलांच्या जीवनात सुधारणांची पहाट आणणारी कणखर स्त्री म्हणजे गोदावरी परुळेकर अंधश्रद्धेच्या जोखंडामधून त्यांची काही प्रमाणात सुटका करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

स्त्री विषयक कार्य-

[]गोदावरी ताईंनी वारली समाजातील स्त्रियांवर होणारे अत्याचार पहिले. या स्त्रिया एका दृष्टचक्रात अडकल्या होत्या. विक्षिप्त जमीनदार आणि सामाजिक पितृसत्ताक दबाव यामुळे त्यांची मोठी घुसमट होत होती. हे दृष्ट जमीनमालक त्यांच्यावर बलात्कार करत. तितकीच दुःखाची बाब अशी की, वारली महिला या पुरुषाइतक्या पवित्र नाहीत, असा समज रूढ होता. शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धांचा पगडाहि आणखी सामाजिक दुखणीही जोडला होतीच. यामुळे चुकीच्या विनाशकारी कल्पनांचा पगडा समाजावर होता. एखाद्या निष्पाप आणि निरुपद्रवी स्त्रीला अचानक भूतबाधा झाल्याचे जाहीर होत असे. अकारणच तिला मारहाण होई. इतकेच नव्हे तर भुताने झपाटलेल्या झाड बनलेल्या त्या महिलेची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. स्त्रियांवरील या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा निर्णय गोदावरीताईंनी घेतला, परंतु स्त्रियांमध्ये बदल घडवून आणण्याच्या कामात त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कारण त्यांच्या लक्षात आले की, वारली आदिवासींच्या कल्पना, आदर्श कृती यामध्ये सुधारणा घडवून आणण्यास शिक्षणाशिवाय अन्य पर्याय नाही. तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी त्यांना लढणायचे बळही गोदावरीताईंनी दिले. त्यासाठी राजकारणाचे प्राथमिक धडेही त्यांनी शिकवले. या साऱ्या संदर्भातील लढ्याच्या आठवणी त्यांनी आपल्या 'जेव्हा माणूस जागा होतो'  या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. या पुस्तकाला १९७२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते तयार झाले.

परोपकारी  गोदावरीताई आणि त्रस्त वारली आदिवासी यांच्यावर हल्ला करण्यास पोलीस आणि सैनिक कचरले नाहीत. १९४६ साली वारली भागात जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली. तरीसुद्धा वेषांतर करून त्या भागात पोहचण्यास गोदावरीताईंना यश आले. तिथे वेषांतर करून त्या तीन वर्ष कार्य करीत राहिल्या. १९५० साली त्यांना पोलिसांनी ओळखले आणि तीन वर्षासाठी तुरुंगात पाठवले. परंतु त्यांचे प्रयत्न वाया गेले नाही. तोपर्यंत वारलीच्या नावावरील सामाजिक शूद्रत्वाचा शिक्का पुसला गेला होता. महिलांचे हक्क आणि सामाजिक, आर्थिक समानता या कारणांसाठी गोदावरीताईंनी काम केले. शैक्षणिक कार्यक्रमाचे क्षेत्र असो की कामगार संघटनांना आश्रय देने असो ; देशांतर्गत कामगार संघटना असो की शिवणवर्गाच्या वेळा ठरवणे असो; गोदावरीताईंचा त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. वारलींबद्दल त्यांना असणाऱ्या कळवळ्यामुळे या जमातीला स्वातंत्र्य आणि लौकिक नव्याने मिळवण्याचे बळ मिळाले. []

प्रकाशित साहित्य

  • जेव्हा माणूस जागा होतो - डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणारे पुस्तक.[]
  • बंदिवासाची आठ वर्षे - कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक.[]
  • Adivasis' Revolt : The story of Warli Peasants in Struggle

पुरस्कार

१९७२चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकासाठी.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ patil, prakash (2012). karmyogini. kolhapur: mukta publishing house. p. 76. ISBN 978-93-81249-09-3.
  2. ^ patil, prakash (2012). karmyogini. kolhapur: mukta publishing house. p. 77. ISBN 978-93-81249-09-3.
  3. ^ Patil, Prakash (2012). Karmyogini. Kolhapur: Mukta Publishing House. pp. 77–78. ISBN 978-93-81249-09-3.
  4. ^ a b संजय वझरेकर. "नवनीत :आजचे महाराष्ट्र सारस्वत : १४ ऑगस्ट". ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

मराठी लेखक