गोंधळी
गोंधळी ही हिंदू जात आहे. या समूहाचे लोक तुळजाभवानी देवीस आपले आराध्य दैवत मानतात. हा समाज गोंधळ, पोवाडे, यातून जनजागृती करतात.[१]
भौगोलिक सीमा व निवासस्थान
या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वऱ्हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे. मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत. यांचे जास्त लोकसंख्या महाराष्ट्रात मराठवाडा :औरंगाबाद, जालना (खासगाव), नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, कोकण: मुंबई,ठाणे (कल्याण), नाशिक,सोलापूर, पुणे विर्दभ: बुलढाणा (नांदुरा) (देऊलघाट), व इतर ठिकाणी अस्तित्व आहे. जालना जिल्हातल्या जाफ्राबाद तालुका मध्ये खासगाव या गावात मुळचे गोंधळी व वासुदेव समाजातील शेकडो लोक या गावात राहतात. मुंबई इलाख्यांत (१) मराठे, (२) कुंभार, (३) कडमराय, (४) जोशी, (५) रेणुकराय, (६) ब्राह्यण, (७) अकरमाशे अशा सहा पोटजाती यांमध्ये आहेत.[२] यांचे संस्कार व रीतिरिवाज या बाबतींत मराठे कुणब्यांप्रमाणे वागतात व यांची संस्कृती ही मराठी संस्कृती आहे. मध्यप्रांतात यांच्या जाती पुढीलप्रमाणे आढळून येतातः- ब्राह्यण, मराठे, माने, कुणबी, खैरेकुणबी, तेली,गंगापरे,जोशी,इत्यादी. यांची गोत्रे, डोकेंफोड, सुक्त मुके, जवल, पंचांगे इत्यादी होत.
उपजीविका
हे लोक देवीच्या नावाचा गोंधळ करतात व भवानीच्या नावाचा गजर करून हिंदू धर्माचा प्रसार करतात.[३] घरोघरी देवीचे कार्यक्रम आयोजित करून मनोरंजन करतात घटस्थापना पुजाविधी करतात.
विवाह विधी
लग्नांत वराच्या गळ्यांत त्याच्या जातींतील ५ विवाहित लोक कवड्याची माळ घालतात; हाच गोंधळी होण्याचा विधि आहे. उच्च जातीच्या लग्नाकार्यांत किंवा नवसाचा गोंधळ करण्यास यांस बोलावतात. गोंधळास चार माणसेे लागतात. कोणी लोक नवसांकरितांहि गोंधळी होतात. स्वतःची जात न सोडतां त्यांस ही दीक्षा घेतां येते.गोंधळी समाज भारतीय संस्कृती टिकवतो[४]
गोंधळी जाबता
गोंधळी यांनी दरमहा पौर्णिमेस प्रातःकाळी अंघोळ करून, गंध लावून वस्त्रपात्र स्वच्छतेने सरकार वाड्यांत येऊन तख्तापुढे गोंधळ रात्रौ नेमाने करून जात यावे. लिहिल्याप्रमाणे आपले काम हुशारीने करावे. यांत अंतर पडू नये. पौर्णिमेस अगर जेव्हा हुकूम होईल त्या वेळेस जमत जावे. सदरहू लिहिल्याप्रमाणे बंदोबस्त हुशारीने सरकार चाकरी करून दाखवील, त्याजवर सरकारमेहेरबानी होईल. हे समजोन हुशारीने वागावे. सरकारांतून चालावयाचे जाबते:-
- दरमहा पौर्णिमेस व चंपाषष्ठीच्या गोंधळाबद्दल रुपया एक व खण पावतो. त्याप्रमाणे पावेल.
- पोतास खादी व ओवाळणीबद्दल रुपया एकपावतो म्हणोन कलम. त्यास शिरस्त्याप्रमाणे पावेल, व रोजमुरा दोन ताफ्यांस पावतो त्याप्रमाणे पावेल.
- दसऱ्याच्या पूजेस चौंडक्यास पागोटी दोन व दिपवाळीबद्दल तेल व फराळाचें सालाबादीप्रमाणे पावत जाईल.
या जाबत्याप्रमाणे प्रतापसिंह छत्रपति सातारकर यांची व्यवस्था होती.
संदर्भ
- ^ Cavhāṇa, Rāmanātha Nāmadeva (1989). Bhaṭakyā-vimuktāñce antaraṅga. Sugāvā Prakāśana.
- ^ Māne, Lakshmaṇa (1984). Banda daravājā. Granthālī.
- ^ Vyavahāre, Śarada (1999). Lokasãskr̥tīcā antaḥpravāha. Pratibhā Prakāśana. ISBN 978-81-86180-80-8.
- ^ [सेन्सस रिपोर्ट, सन १९११ (मुंबई); रसेल व हिरालाल].