Jump to content

गॅरी हर्बर्ट स्पेन्सर

गॅसर, हर्बर्ट स्पेन्सर :(५ जुलै १८८८–११ मे १९६३)तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर. अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिक. गॅसर यांना जोसेफ एर्लांगर यांच्या समवेत १९४४ चे शरीरक्रियाविज्ञान व वैद्यकशास्त्र या विषयांतील नोबेल पारितोषिक मिळाले.

त्यांचा जन्म प्लॅटव्हिल, विस्कॉन्सिन येथे झाला. त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या ए. बी. (१९१०) व ए. एम्. (१९११) या पदव्या मिळविल्या. तेथे असताना त्यांनी एर्लांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शरीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास केला. १९१५ मध्ये त्यांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची एम्. डी. पदवी संपादन केली व पुढे एक वर्ष त्याच विद्यापीठात औषधिविज्ञान विभागात काम केले. १९१६ मध्ये सेंट लूइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात एर्लांगर यांच्या समवेत त्यांनी संशोधनास सुरुवात केली.

१९२१ साली तेथेच औषधिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२३–२५ या काळात ते यूरोपला गेले आणि तेथे ए. व्ही. हिल, डब्ल्यू. स्ट्रॉब, एल्. लापिक व सर हेन्री डेल या विख्यात शास्त्रज्ञांबरोबर त्यांनी काम केले. १९२५–३१ मध्ये ते परत वॉशिंग्टन विद्यापीठात व त्यानंतर १९३५ पर्यंत कॉर्नेल विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक व वैद्यकीय विभागाचे प्रमुख होते. १९३५–५३ या काळात ते रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेचे संचालक व पुढे सेवानिवृत्त सभासद झाले.

जॉन हॉपकिन्स वैद्यक विद्यालयात असताना रक्तक्लथनासंबंधी (रक्त गोठण्यासंबंधी) त्यांनी संशोधन केले. एर्लांगर यांच्या समवेत गॅसर यांनी तंत्रिका विद्युत् क्रियाविज्ञानावर (मज्‍जेवरील विद्युत् प्रवाहाच्या परिणामावर) संशोधन केले. गॅसर यांनी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या निबंधात मध्यपटल (छाती व पोट यांमधील पडद्याच्या) तंत्रिकेतील विद्युत् क्रिया प्रवाहाविषयी माहिती होती. पुढे या प्रयोगात त्यांनी नव्यानेच उपयोगात आलेल्या कमी विद्युत् दाब असलेल्या ऋण किरण दोलनदर्शकाचा [→ इलेक्ट्रॉनीय मापन] उपयोग केला. या उपकरणाद्वारे मिळणाऱ्या आलेखांची जटिलता (गुंतागुंत) निरनिराळ्या तंत्रिका समुच्चयांच्या वेगवेगळ्या विद्युत् संवाहकतेमुळे उत्पन्न होते असे दिसून आले. त्यापासून वेदना तसेच प्रतिक्षेपण (आपोआप होणारी अनैच्छिक) क्रिया यांविषयी बरीच माहिती मिळाली. वसावरणरहित (चरबीसारख्या पदार्थाचे आवरण नसलेल्या) तंत्रिकांबद्दलचे गॅसर यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रिकांचे कार्य आणि त्यांची रचना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्यांनी दाखवून दिली.

अनेक अमेरिकन विद्यापीठांनी तसेच पॅरिस, ब्रुसेल्स इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, फिलॉसॉफिकल सोसायटी, अमेरिकन फिजिऑलॉजिकल सोसायटी इ. संस्थांचे ते सभासद होते.अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ फिजिशियन्स या संस्थेचे १९५४ चे कोबेल पदक त्यांना मिळाले होते. रसेल सेज इन्स्टिट्यूट ऑफ पॅथॉलॉजी या संस्थेच्या संचालक मंडळाचे ते अध्यक्ष होते. ते न्यू यॉर्क येथे मरण पावले.