गूगल ग्लास
गुगल ग्लास हे उपकरण गुगलने तयार केलं असून ते बाजारात येण्याच्या तयारीत आहे. यानं कम्प्युटरविश्वातच नव्हे, तर एकंदरीतच समाजामध्ये खूप धूम माजण्याची शक्यता आहे. त्याच्या फायद्यातोट्यांवर आजपासूनच प्रचंड वादळ जगात आलंय. यातून असंख्य खटले, वाद, मारामाऱ्या, संशय अशा अनेक गोष्टी उद्भवणार असल्यामुळे प्रचंडच खळबळ माजणार आहे. गुगल ग्लासच्या लॉचिंगच्या नुसत्या बातमीनं सर्व जगभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.
डोळ्यावर घालायचा एक चश्मा
गुगल ग्लास म्हणजे डोळ्यावर घालायचा फक्त एक चश्मा. पण फरक हा, की या चश्म्यातच एक कॅमेरा, एक पडदा, एक अतिशय लहान कम्प्युटर आणि इंटरनेटचं कनेक्शन अशा गोष्टीही असतील. थोडक्यात, त्या चश्म्यातच एक स्मार्टफोन बसवल्यासारखंच असेल. हा चश्मा घातला की आपल्याला समोर जे दिसेल, त्याचे तो फोटो व्हीडीओ बनवू शकेल. फक्त त्या चश्म्याला तोंडानं ‘हा फोटो काढ’ अशी सूचना द्यावी लागेल. हळू आवाजात सांगितलेली ही सूचना कोणाला ऐकू न गेल्यामुळे समोरच्या माणसाला आपलं शूटिंग चाललंय आणि ते चक्क गुगल ग्लासच्या कॉम्प्युटरमध्ये साठवलं जातंय याची कल्पनाही येणार नाही.
ज्या व्यक्तीचा किंवा ज्या वस्तूचा फोटो किंवा व्हीडीओ शूटिंग चालू असेल त्यावेळी त्या व्यक्ती किंवा वस्तूची माहिती ही तात्काळ म्हणजे त्याच क्षणी (रिअल टाईममध्ये) इंटरनेटवरून मिळू शकेल. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीचं शूटिंग चालू आहे. त्या व्यक्तीची फेसबुकवरची प्रोफाईल लगेच आपल्याला मिळू शकेल किंवा एखादी नदी समोर असेल, तर विकिपीडियामधून त्या नदीविषयीचा पूर्ण इतिहास हा सुद्धा आपल्याला समोर पडद्यावर दाखवता येईल आणि ती नदी बघता बघता एकीकडे आपण त्या नदीविषयीची माहितीसुद्धा गोळा करू शकू. समजा, आपण एखाद्या मॉलकडे बघत असलो, तर त्याच वेळेला जीपीएससारख्या तंत्राचा वापर करून आपण कुठे आहोत हे कम्प्युटरला कळेल आणि त्यावरून इंटरनेटचा वापर करून समोरचा मॉल कुठला आहे, त्यात कुठली कुठली दुकानं आहेत, त्यात कुठल्या कुठल्या वस्तू किती किमतीला विकल्या जाताहेत, त्यात कुठली रेस्टॉरंटस आहेत, त्यात कुठले कुठले पदार्थ किती किमतीला मिळताहेत तसंच आत चाललेल्या सिनेमांविषयीची माहिती, त्याच्या खेळांच्या वेळा, त्यांची तिकिटं, ती उपलब्ध आहेत की नाहीत. एवढंच नव्हे, तर त्या सिनेमाची परीक्षणं हेही सगळं आपल्याला कळू शकेल.
वापर
गुगल ग्लासमुळे तुमच्या अपॉईंटमेंटस् लक्षात ठेवण्याची सोय असेल, सोशल नेटवर्किंग साईटवरच्या मेसेजेसचे लगेच अॅलर्ट मिळतील, प्रत्येक वळणासकट दिशा कळेल, हवामानाची आणि ट्रॅफिकची माहिती कळेल, फोटो आणि व्हिडिओ काढून शेअर करता येतील. न्यू यॉर्क टाईम्स सारख्या अॅप्लिकेशन्समुळे वर्तमानपत्रातली हवी ती बातमी, चित्र दिसू शकतं. व्हॉईस रेकग्निशन सॉफ्टवेर वापरून तुम्ही बोलाल त्याचं क्षणार्धात भाषांतर होऊन तो मेसेज दुसऱ्याकडे जाऊ शकेल. तसेच ऐकलेले शब्द तुमच्या भाषेत अनुवाद होऊन ऐकू येऊ शकतील. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेर आणि सोशल नेटवर्किंग वापरून तुम्ही नुकत्याच भेटलेल्या अनोळखी व्यक्तीचं कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवरचं पब्लिक प्रोफाईल क्षणार्धात पाहू शकाल. तसंच गुगल सर्च करता येईलच, व्हिडिओ चॅटमध्ये भाग घेता येईल आणि भोवतालच्या आजूबाजूच्याच काय पण जगातल्या कितीतरी ठिकाणांवरची माहिती आपल्याला उपलब्ध करून बघता येईल. गुगल ग्लासची ठळक अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे तो सहजपणे डोळ्यांवर वापरता येईल असा आहे. सध्याच्या अॅंड्रॉईड स्मार्टफोन आणि टॅबलेटचं पुढचं विस्तारित रूप आहे. संपूर्ण दिवसभरात हातही न लावता आपण त्याच्या मदतीने वेगवेगळी अनेक कामं पार पाडू शकतो. गुगल ग्लासमुळे एखादा फोटो, चित्र किंवा दृश्य ४ जीबीच्या मर्यादेपर्यंत शूट करून साठवलं जाऊ शकतं. ही व्हिडीओ क्लिप किंवा फोटोज सोशल नेटवर्किंग किंवा इ-मेलद्वारा पाठवता येतो. गुगल आणखी एक गंमत म्हणजे आपल्याला आलेले एसएमएस किंवा इ-मेल्स आपण पाहू शकतो आणि आपल्या आवाजात त्याचं उत्तरही देऊ शकतो. आत्ता ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती गुगल ग्लासद्वारा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. आपण फक्त त्याला तोंडी प्रश्न विचारला, की गुगल ग्लास इंटरनेटवर त्या प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला त्या ग्लासवरच्या पडद्यावर उमटून देईल. उदा. आपण शनिवारवाड्यासमोर उभं असताना प्रश्न केला की 'शनिवारवाडा कधी बांधला होता?' आपल्याला शनिवारवाड्याचा संपूर्ण इतिहास गुगल ग्लास देईल. कुठेही जायचे असेल तरी प्रवासात लागणाऱ्या नकाशाची गरजच उरणार नाही. गुगल ग्लास ती माहिती शोधून आयत्या वेळी देईल. गुगल ग्लासने त्या माणसाला संपूर्ण जग कसं आहे हे दाखवलं जाऊ शकेल. आपलं रोजचं रुटीन पाहून तोच रोजच्या प्रवासापासून ते ऑफिसमधल्या अनेक कामात तो आपल्याला मदत करेल. म्हणजे वाहतूक किती आहे, कुठल्या मार्गाने जाता येईल वगैरे अनेक गोष्टित तो मार्गदर्शन करेल. गुगल ग्लासचा सगळ्यात कहर म्हणजे आपण परदेशी जाणार असू, तर त्या त्या भाषेचा अनुवाद आपल्या भाषेत करून तो आपली अडचण सोडवू शकतो.
इतिहास
या संकल्पनेचा पहिला सनसनाटी प्रयोग सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज या गुगलच्या सहसंस्थापकांनी २७ जून २०१२ला गुगलच्या एका इव्हेंटमध्ये सानफ्रांन्सिस्कोला मॉस्कॉन सेंटरमध्ये केला. या प्रयोगाचा पहिला भाग इमारतीबाहेर दाखवण्यात आला. एक स्कायडायव्हिंग टीम एका मोठ्या आवरण असलेल्या कवचामध्ये गुगल ग्लास घालून तयारीत होती. याचं व्हिडिओ चॅट करण्याची तयारीही गुगल प्लसनं सेट केली होती. ग्लासच्या आत बसवलेल्या कॅमऱ्यातून प्रत्येक हालचाल ही चित्रित होत गेली. त्यानंतर या गुगल टीमनं आपल्या आवरणातून बाहेर येऊन ठराविक हालचाल करून मॅस्कॉन सेंटरच्या छतावर उडी मारली. त्यानंतर काही सायकलस्वारांनी गुगल ग्लास धालून मॅस्कॉन सेंटरच्या छतावर अनेक प्रकारे चित्तथरारक ट्रिक्स करून दाखवल्या. त्यानंतर त्यातल्या एका माणसानं गुगल ग्लास घालून इमारतीच्या बाजूला उभ्या असलेल्या सायकलस्वाराला एक वस्तू दिली. त्या सायकलस्वारानं तीच वस्तू कॉन्फरन्स सेंटरभोवती चक्कर मारत व्यासपीठावर असलेल्या सर्गी ब्रिनच्या हातात दिली. गमंत म्हणजे या सगळ्या घटना अनेक प्रेक्षक त्यांच्यासमोर असलेल्या मोठ्या पडद्यावर आश्चर्यचकित होऊन पाहत होते. अखेर ब्रिन यानं ती वस्तू १५०० डॉलरला बुक करता येऊ शकेल आणि २०१३ मध्ये ती बाजारात उपलब्ध होणार असल्याचं जाहीर केलं. सायकलस्वारानं ब्रिनच्या हाती दिलेली वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गुगल ग्लास होता. यातला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी इमारत पाहून आत चाललेल्या बिझनेसच्या, दुकानांवरच्या पाट्या वाचता येणं किंवा रेस्टॉरंटकडे पाहून आतला मेनू वाचता येणं हे त्यातून साद्य होऊल. निरनिराळी ॲप्लिकेशन्स वापरून वेगवेगळी माहिती मिळवता येईल. उदाहरणार्थ, तुम्ही लंडनमध्ये आहात. तुमचे गुगल ग्लासेस तुम्ही डोळ्यावर चढवलेत. तुम्ही नवीन ग्लोब थिएटर पाहिलं आणि त्याची जास्त माहिती विचारलीत. मग तुम्हाला पर्याय आले, तुम्हाला मूळ ग्लोब थिएटरचा इतिहास हवा आहे का? का १९९० मध्ये नवीन आलेल्या ग्लोब थिएटरची माहिती हवीय? का तिथे आत्ता कोणती नाटकं होणार आहेत याची माहिती हवी आहे? गुगल ग्लास अक्षरशः हवी ती माहिती पुरवेल. गुगल ग्लास घातल्यावर काही उद्योगांवर मात्र खूप वाईट परिणाम आहे. उदाहरणार्थ, कॅसिनोमध्ये ते वापरून आपण दुसऱ्यांचे पत्ते ओळखू शकू किंवा सिनेमा थिएटरवर तो पूर्ण सिनेमा रेकॉर्ड करू शकू. कॅबरेजसारख्या अनेक नृत्यांच्या ठिकाणी आपण त्याचं व्हिडीओ शूटिंग करू शकू. तसंच लष्कराच्या आणि गुप्त ठिकाणांचे आपण फोटो काढू शकू. तसंच गुन्हेगार अनेक गोष्टीचं व्हीडिओ शूटिंग करून किंवा फोटो काढून इतरांना ब्लॅकमेल करू शकतील. कारखान्यांना भेट देणारी मंडळी आतल्या काही गुप्त गोष्टींची माहिती मिळवून ती स्पर्धकांना देऊ शकतील. अशा असंख्या गोष्टींमुळे एकंदरीतच कंपन्याच्या लोकांच्या खाजगी आयुष्यावर, सुरक्षिततेवर आणि त्यांच्या प्रायव्हसीवर गदा येईल म्हणून अनेक कंपन्यांनी गुगल ग्लासच्या कल्पनेला विरोध करायला सुरुवात केली आहे. अमेरिकन काँग्रेसमधल्या ८ सदस्यांनी गुगलला पत्र लिहून आपली भीती व्यक्त केली आहे. ‘स्टॉप द सायबोर्ग’ सारख्या चळवळी या ग्लासेसवर बंदी आणायचा प्रचार करतायत, तर अमेरिकेत काही कंपन्यांनी ‘ॲंटी गुगल ग्लास’ बोर्ड लावलेत. रशिया, युक्रेन अशा देशात असलेल्या कायद्यांनुसार तिथे गुगल ग्लास वापरणंच बेकायदेशीर ठरेल असंही काही जणांचं म्हणणं आहे.
परस्परविरोधी मतं
मात्र या वस्तूबद्दल अनेकांची परस्परविरोधी मतंही आहेत. डेव्हिड ॲस्प्रे या इंटरनेट सिक्युरुटी तज्ज्ञानं याबाबत नाराजी व्यक्त केलीय. युजरनं गुगल ग्लास वापरून गोळा केलेली माहिती जर त्यानं पब्लिकला उपलब्ध करून दिली तर गुगल सर्च केल्यावर ती माहिती इतरांना दिसू शकेल. मात्र यामुळे गुगलकडे युजरनं मिळवलेल्या माहितीवर जास्त नियंत्रण करण्याची क्षमता येईल. लोकांच्या प्रायव्हसीवर गुगल ग्लास अतिक्रमण करेल अशी भीती व्यक्त होते आहे. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेरमुळे आपल्याला माहिती नसणाऱ्या लोकांना गर्दीत देखील फेस रेकग्निशननं सोशल साईट वापरून ओळख काढता येईल. लोकांचं संभाषण त्यांच्या मर्जीविरूद्ध रेकॉर्ड करता येईल. गुगल या ग्लासवरून जाहिरातबाजी करू शकेल. उदाहरणार्थ, गुगल ग्लास वापरणारी व्यक्ती जिथे जाईल, जे पाहिल ती माहिती ते गोळा करून गुगल त्या अनुषंगानं युजरला जाहिराती दाखवेल. एकंदरीतच तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक हित किंवा नैतिकता यांचा प्रश्न दिवसेंदिवस आणखीनच वाढत जाणार आहे. याचं कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती ही भयानक वेगानं सध्या होते आहे. ऑल्व्हिन टॉफ्लर मानवी इतिहासाचे तीन भाग मांडतो. शेती, उद्योग आणि सेवा. शेतीच्या काळातल्या अनेक दशसहस्त्रकांमध्ये जेवढी प्रगती झाली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रगती औद्योगिक क्रांतीनंतरच्या उद्योगविश्वातल्या काही शतकांमध्ये झाली. तसंच सेवाक्षेत्र ज्या काही गेल्या दशकात झपाट्यानं वाढलं, त्यात तंत्रज्ञानाची जी काही प्रगती झाली, ती उद्योगातल्या काही शतकांच्या प्रगतीपेक्षा आणि शेतीच्या काही दशसहस्त्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पटीनं जास्त होती. थोडक्यात, गेल्या तीन दशकात माणसानं तंत्रज्ञानात जेवढी प्रगती केली, तेवढी प्रगती जवळपास आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात झाली नव्हती. हा ट्रेंड लक्षात घेता माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर आणि रक्तासारख्या अनेक घटकांवर दर क्षणाला नियंत्रण ठेवणारे आणि त्यात कुठेही काही बिघाड आढळल्यास त्याची सूचना देणारे नॅनोरोबोज, वार्धक्यावर, तसंच कॅन्सर, एड्स, अल्झामयर अशा गोष्टी या शतकात होण्याची बरीच शक्यता आहे. नाणी, नोटा, क्रेडिट कार्डज्, डेबिट कार्डज् ही सगळी नष्ट होऊन बॅक्स, इन्शुरन्स आणि इतर अनेक हजारो कंपन्यांच्या कार्यालयांची अक्षरशः म्युझियम्सही याच शतकात याच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होतील.
बाह्य दुवे
- Google Glass – अधिकृत सांकेतिकस्थळ
- Google Glass Apps – उपकरणांची यादी