गुलियेल्मो मार्कोनी
गुलियेल्मो मार्कोनी | |
जन्म | एप्रिल २५, १८७४ पालाझ्झो मारेस्काल्ची, बोलोन्या, इटली |
मृत्यू | जुलै २०, १९३७ रोम, इटली |
निवासस्थान | इटली युनायटेड किंग्डम |
राष्ट्रीयत्व | इटालियन |
धर्म | ख्रिश्चन (रोमन कॅथॉलिक) |
कार्यक्षेत्र | विद्युत अभियांत्रिकी |
कार्यसंस्था | मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी |
ख्याती | रेडिओ |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०९) |
वडील | ज्युसेप मार्कोनी |
आई | ऍनी जेम्सन-मार्कोनी |
गुलियेल्मो मार्कोनी (IPA इटालियन: ɡuʎˈʎɛlmo marˈkoːni)चा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.
सॅल्सबरीमध्ये दुसऱ्या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले. आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.