Jump to content

गुलाबराव महाराज

गुलाबराव महाराज
जन्म ६ जुलै १८८१]]
लोणी टाकळी, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र, भारत
मृत्यू २० सप्टेंबर १९१५]]
पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश

गुलाबराव महाराज (जन्म : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे, तालुका लोणी टाकळी, ६ जुलै १८८१; - पुणे, २० सप्टेंबर १९१५) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक होते.

श्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. सर्य आयुष्य ग्रामीण भागात गेले. तेही फक्त चौतीस वर्षांचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यानी १३४ ग्रंथ लिहिले.


जीवन

गुलाबराव महाराज यांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. "भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही" हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. 'भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत' असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करून गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली.

आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त - हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. 'मधुराद्वैत' (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.

गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्‍नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित यांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला.

गुलाबराव महाराज यांचे इ.स. १९१५ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले.

साहित्य

मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वऱ्हाडी बोलीतून त्यांनी १३३ ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्‌मयप्रकार त्यांनी हाताळले. २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोकादी रचना इत्यादींचा त्यांत समावेश आहे.

गुलाबराव महाराजांनी लिहिलेली पुस्तके

  • अलौकिक व्याख्याने (इ.स. १९१२)
  • धर्म समन्वय
  • प्रेमनिकुंज (इ.स. १९१८)
  • योगप्रभाव
  • संप्रदाय सुरतरु (इ.स. १९१९)
  • साधुबोध (इ.स. १९१५)

गुलाबराव महाराज यांच्यावरील पुस्तके

  • प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ (बाळ राणे)
  • संत गुलाबराव महाराज (सुनीति आफळे)
  • संत श्री गुलाबराव महाराज (प्रा. विजय यंगलवार)
  • ज्ञानेश्वर कन्या-गुलाबराव महाराज (चरित्र, डॉ. सच्चिदानंद शेवडे)

मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज एकदा ख्यातनाम मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेले. ग्रंथालयात विशिष्ट विषयांवरील कुठले ग्रंथ आहेत, या जिज्ञासेपायी त्यांनी ग्रंथपालांना विचारणा केली. ग्रंथपाल महाराजांना ओळखत नव्हता. एक अंध व्यक्ती ग्रंथांची विचारपूस करते म्हणून त्या सर्वच लोकांना कुतूहल वाटले. ग्रंथपालाच्या सहकाऱ्याने महाराजांना ग्रंथांची नावे सांगणे सुरू केले. बहुतांश ग्रंथ महाराजांना माहीत होते. या ग्रंथांचा क्रम कसा लावावयास हवा, हे महाराज त्या-त्या ग्रंथातील सारांशाच्या आधारे त्या ग्रंथालयकर्मीला सांगत होते. ग्रंथपाल व आजूबाजूचे लोक महाराजांचे ज्ञान पाहून थक्क झाले. चौकशीअंती त्यांना समजले की अत्यंत सामान्य दिसणारी ही अंध व्यक्ती म्हणजे मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज आहेत...

१८८१ ते १९१५ या इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात सुशिक्षित भारतीयांना पाश्‍चात्त्य विचारांनी जखडले होते. भारतातील शास्त्रे, कला, साहित्य, जीवनपद्धती अशा सर्वच बाबी त्या लोकांना अर्थहीन वाटत होत्या. भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. याच काळात पाश्‍चात्त्य विचारसरणीतील उथळपणा आणि भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व केवळ बुद्धिवादाच्या आधारे विचारवंतांना पटवून देण्याचे आत्यंतिक मोलाचे कार्य अर्भकावस्थेतच अंधत्व प्राप्त झालेल्या गुलाबराव महाराजांनी केले. गुलाबराव महाराजांचा जीवनपट विलक्षण आहे. अमरावती जिल्ह्यात नांदगाव (खंडे)ता. लोणीला महाराजांचा जन्म झाला. मातृवियोगानंतर सहा वर्षे बडनेराजवळ असलेल्या लोणी टाकळी येथे गुलाबराव महाराजांचे वास्तव्य होते. घरातील वातावरण पूर्णपणे प्रतिकूल. आठव्या महिन्यातच आजाराने डोळे गेले म्हणून आंधळेपणा आलेला. अशा स्थितीत महाराजांनी सर्व ज्ञान कसे प्राप्त केले, हा प्रश्‍न सामान्य माणसाला निश्‍चित पडतो. इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरचे, धर्म आणि अध्यात्म शास्त्र, संस्कृतातील गायनशास्त्रावरचे, वैद्यक शास्त्रावरचे, विविध कला विषयांचे, वेद-उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी वयाच्या १२ ते १६ वर्षांच्या काळातच करून घेतले. प्रपंच किंवा परमार्थ असा एकही विषय राहिला नाही की ज्यावर गुलाबराव महाराजांनी आपले स्वतंत्र विचार प्रगट केले नाहीत. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर उत्तरेकडचे व बंगालकडचेही जे मोठे विद्वान त्यांच्या संपर्कात आले ते सर्व त्यांची अलौकिक प्रतिभा पाहून थक्क झाले. त्यांच्या शुद्ध आचरणाला व अगाध ज्ञानाला भुलून लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.

मानभाव मत, डार्विन मत, स्पेन्सर, मायर्स यांच्या मतांवर आणि ग्रंथांवर महाराजांनी समीक्षा केली. जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा केली. विविध विषयांवरच्या १३४ ग्रंथांचे लेखन महाराजांनी केले. मराठी, हिंदी, ब्रज, संस्कृत भाषेत लेखन केले. काव्य, योग, संगीत, धर्म, सांख्यशास्त्र, वेदान्त, छंदशास्त्र असे सर्व विषय हाताळले. हे अगाध ज्ञान महाराजांनी केव्हा व कसे प्राप्‍त केले असेल हा विषय आजही आपल्या विचारक्षमतेच्या बाहेरचाच आहे.

महाराज जवळच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत असत. अगाध स्मरणशक्तीच्या आधारे एकदा ऐकताच त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यांच्यासाठी पुस्तक वाचणारा कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. प्रत्येकाला दक्षिणा द्यायचे. ज्वारी, गहू, हातातील चांदीचे कडे, घरातील मौल्यवान वस्तू... ग्रंथ वाचून दाखविणाऱ्याला गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी काय काय वस्तू दिल्या असतील ते त्यांना किंवा घेणाऱ्यालाच माहिती. महाराजांनी आपल्या आयुष्यात कशाचा मोह बाळगला असेल तर तो केवळ ज्ञानलालसेचा, अर्थातच ग्रंथांचा आणि पुस्तकांचा! पत्‍नीचे एक लुगडे व स्वतःच्या अंगावर बंडी आणि धोतर या शिवाय महाराजांजवळ कुठलीच संपत्ती नव्हती. जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. गुलाबराव महाराजांनी दोन हजारहून अधिक ग्रंथ जवळ बाळगले. पुस्तकांच्या पेट्या डोक्यावर घेऊन कितीही मैलांचा प्रवास ते पती-पत्‍नी करीत.. ती दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत सुरक्षित आहे. या ग्रंथसंपदेवर महाराजांचा जीव होता. ‘ज्ञानेश्वरी-गूढार्थदीपिका’ ग्रंथाचे कर्ते वेदान्तकेसरी बाबाजी महाराज पंडित या आपल्या शिष्योत्तमावर महाराजांचे प्रचंड प्रेम होते. बाबाजी महाराजांची गुरुभक्ती निःसीम होती. स्वतः गुलाबराव महाराजांनीच ‘मी पंडिताला वश झालो आहे’, असे उद्‌गार काढले होते. त्या बाबाजी महाराज पंडितांना गुलाबराव महाराजांनी आपल्या शेवटच्या काळात काही मोलाच्या सूचना केल्या होत्या. त्यात ग्रंथालयाची व्यवस्था चांगली ठेवावी, ही पण एक सूचना होती. बाबाजी महाराज पंडितांनी महाराजांच्या अन्य सूचनांप्रमाणेच याही सूचनेचे अत्यंत तंतोतंत पालन केले. परिणामी महाराजांचा हा धनसंग्रह आजही अमरावतीच्या परकोटाच्या आत दहिसाथीत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सुस्थितीत, सुरक्षितपणे जपून ठेवला आहे.

अंध असलेल्या गुलाबराव महाराजांनी अकोल्याच्या एका चित्रकाराकरवी ज्ञानेश्वर माउलीचे एक चित्र तयार करून घेतले होते. याच चित्राच्या आधारे नंतर ज्ञानेश्वर माउलींचा फेट्यातील समाधिस्थ बसलेले चित्र विविध चित्रकारांनी साकारले. ते चित्र आजही या ज्ञानेश्वर मंदिरात अग्रभागी लावण्यात आले आहे. गुलाबराव महाराजांच्या ग्रंथ संपदेत आज अत्यंत दुर्मिळ असलेल्या ग्रंथांचाही समावेश आहे. या ग्रंथसंपदेची संख्या दोन हजाराहून अधिक आहे. शांकर मताचे मंडण असलेला भामती, चित्‌सुखी, अद्वैतसिद्धी, खंडण खंड खाद्यम, बायबल, कुराण, प्लेटो, हेगेल, मायर्स, डार्विन, स्पेन्सर अशी मोठी ग्रंथसंपदा आहे. दर्शनशास्त्र, संगीत, काव्य, योग, षड्‌दर्शन, सांख्य, न्याय, धर्म अशा असंख्य विषयांवरचे ग्रंथ गुलाबराव महाराजांनी अभ्यासले. आत्मसात केले आणि त्यावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले. गुलाबराव महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देणारी ही ग्रंथसंपदा याच मंदिरात आज कपाटबंद आहे. या ग्रंथांना हात लागणार नाही, याची पुरेपूर काळजी या मंदिराच्या व्यवस्थापनाने घेतली आहे, हे विशेष! चौतीस वर्षांच्या अल्पायुष्यकाळात गुलाबराव महाराजांनी एवढे ज्ञान कसे प्राप्‍त केले, या प्रश्‍नाचे पूर्ण समाधानकारक नसले तरी अल्पसे उत्तर या ग्रंथांच्या दर्शनातूनच आपल्याला मिळते.

छोट्या-मोठ्या प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी गुलाबराव महाराजांचे जीवन आणि त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत प्रेरणादायी आहे. खरे पाहता हे ज्ञानेश्वर मंदिर बुद्धिवान तरुणांच्या वर्दळीचे स्थान असायला हवे. मात्र, स्थिती तशी नाही!

बाबाजी महाराज पंडितांच्या नंतर त्यांचे चिरंजीव पदनामकोष किंवा घटनेच्या मराठी अनुवाद निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा होता, असे डॉ. वा.ना. पंडित आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव - गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे, सोबतच उर्दू साहित्य व प्रामुख्याने गजलचे अभ्यासक - डॉ. राम पंडित यांनी महाराजांचे वैचारिक धन जपण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न केला आहे. डॉ. राम पंडित यांनी पुढाकार घेऊन स्कंददास स्मारक न्यास व पंचलतिका ग्रंथ न्यास या प्रकाशन संस्था स्थापन केल्या आणि सातत्याने गुलाबराव महाराजांचे ग्रंथ प्रकाशित केले. महाराजांच्या अनेक ग्रंथांचे त्यांनी हिंदी भाषेत अनुवाद करून प्रकाशन केले. बबनराव पंडित, डॉ. पुरुषोत्तम पंडित, अनिल पंडित, प्रमोद पंडित, सुधाकर फणसाळकर, वसंत चिपळूणकर, राम लिमये, भालचंद्र बुरसे, केसरे ही मंडळी गुलाबराव महाराजांच्या ग्रंथ प्रकाशनामध्ये आपले योगदान देत असतात. आज गुलाबराव महाराजांनी लिहिलेले सर्वच ग्रंथ उपलब्ध आहेत. प्राचीन काळात भारतात सगळेच शास्त्र विकसित होते. त्यासाठी संस्कृतचे अध्ययन आणि आकलन आवश्यक आहे. ते आकलन महाराजांना झालेले होते. त्यातूनच त्यांनी जगाला थक्क करून सोडणारा विचार मांडला.

माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन!

महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी कष्टणाऱ्या डॉ. राम पंडित यांच्या कवितेच्या ओळी महाराजांच्या ग्रंथसंपदेविषयी समर्पक वाटतात. डॉ. राम पंडित लिहितात,

एक चक्षुहीन

अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन

चक्षुंच्या पलीकडे गेला......

नंतर कळले

तो तर चक्षुहीन नव्हता

खरे म्हणजे

मोठ्या डोळ्याचे, साक्षर

आम्हीच आंधळे होतो

आता आमच्या सारख्यांचे डोळे

त्या चक्षुहीनाची वाट बघतात

त्यांच्या मार्गाने जाता जाता

आम्ही पडतो, उठतो

परत चालतो

काय करावे... आम्हीच तर आंधळे!

आमच्या नेत्रात अश्रू आहेत

नजर कदाचित धोका खाईल, पण हृदय नव्हे

गीता, वेद, पुराणांच्या प्रमाणे

त्यांच्या त्या वाक्यावर आमचा अटळ विश्‍वास आहे

जे त्यांनी आपले जीर्ण वस्त्र त्यागताना उच्चारले

‘माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन’

होळी नंतर...