Jump to content

गुजरातचा पहिला महमूद

अबुल फतेह नसिरुद्दीन महमूद शाह पहिला तथा महमुद शाह पहिला किंवा महमूद बेगडा (इ.स. १४४५ - २३ नोव्हेंबर, इ.स. १५११) हा पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील गुजरातचा सुलतान होता. हा मुझफ्फरी वंशाचा स्थापक अहमद शाह पहिल्याचा नातू असून मुझफ्फरी सुलतानांमधील सर्वाधिक काळ राज्य करणारा होता.

जुनागढ आणि पावागढ हे गुजरातमधील दोन मोठे डोंगरी किल्ले तथा गड जिंकून घेतल्यावर याला बेगडा असे नामाभिधान मिळाले. याने मध्य गुजरातमध्ये वात्रक नदीकाठी महमुदाबाद (आताचे मेमदावाद) नावाचे शहर वसवले. याशिवाय पावागढच्या पायथ्याशी असलेले चांपानेर शहर जिंकल्यावर त्याचे मुहम्मदाबाद असे नामकरण करून शहराचे इस्लामी स्थापत्यात पुनर्वसन केले. याच प्रकारे जुनागढ जिंकल्यावर त्याचे नाव मुस्तफाबाद केले व किल्ला अधिक भक्कम करून तेथे अनेक महाल व इतर इमारती रचविल्या.

महत्त्वाकांक्षी असलेल्या महमूदने हिंदुस्तानात इस्लाम पसरविण्यासाठी कैरोच्या आणि ऑटोमन सुलतानांशी संधी केली व समुद्रमार्गे कुमक मागवली. तेथून आलेल्या आरमाराच्या मदतीने महमूदने कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर आपला अमल बसविला आणि थेट मुंबईपर्यंत धडक मारून तेथील कोळ्यांकडून ती बेटे जिंकून घेतली.