Jump to content

गीतयात्री गदिमा

गीतयात्री गदिमा हे मधू पोतदार यांनी लिहिलेले एक छोटे साठ पानी पुस्तक आहे. ह्या पुस्तकात ग.दि. माडगूळकरांच्या चरित्राचा आलेख आहे. यात गाण्यांच्या आठवणी, प्रेमगीते, लावण्या, बालगीते, गीतरामायण, गीतगोपाल, कथा, पटकथा व संवादही आहेत. माडगूळकरांनी वास्तव्य केलेल्या माडगूळ, औंध, कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि तेथील पंचवटी बंगला येथील घटनांचा या पुस्तकात उल्लेख आहे.

बुगडी माझी सांडली गं, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, दिवसामागुनी दिवस चालले ही गीते या पुस्तकात आहेतच, पण गदिमांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास आहे,. ह्या पुस्तकात त्यांची पहिली कविता आहे आणि शेवटचे शब्दही (मला दिसला तो कालपुरुष. ठार काळा. त्या अंधाराला कसलाही अवयव नव्हता. माझा मीच त्याला ओळखून ओरडलो, 'हॅलो मि. डेथ’) आहेत.

’गीतयात्री गदिमा’मधील कवितांच्या काही ओळी

बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो येथले गुरू
झाडे, वेली, पशू, पाखरे
यांसी गोष्टी करू


पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या
या जीवनात काव्ये, काव्यात जीवनी या
गंधात धुंद वारा, वाऱ्यात गंध नाचे
डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे...


देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी...


मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड...