Jump to content

गिरनार

गिरनाराचे पायथ्याच्या प्रदेशातून दिसणारे दृश्य

गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हणले जाते.[]

भूरचना

गिरनार डोंगराची उंची १,११७ मी. आहे. हा सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व मॉंझोनाइट यांचा बनलेला आहे.

ऐतिहासिक संदर्भ

गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्णकालीन रैवतक महायात्रा येथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते.

अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैनं धर्मीयांचे पहिले तीर्थंकर १००८ भगवान नेमीनाथ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे. येथे इ.स.पू.सु. २५० मधील सम्राट अशोक यांच्या समकालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळ्याची पुन्हा दुरुस्ती स्कंदगुप्तकालात झाल्याचा उल्लेख ४५५ च्या शिलालेखात आहे. ‘रा’ खेंगार व चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेष गिरनारवर आहेत. गिरनार हे तीर्थक्षेत्र आहे.

धार्मिक महत्त्व

सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.

गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचे बाविसवे तीर्थंकर भगवान नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूंत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.

जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात.हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. नेमीनाथ भगवतांच्या चरण पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ योगेश नाईक. "दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान : गिरनार". २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत