Jump to content

गिजुभाई बधेका

गिजुभाई बधेका (१५ नोव्हेंबर १८८५–२३ जून १९३९).

आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म चितळ (सौराष्ट्र) येथे झाला. वडिलांचे नाव भगवानजी व आईचे नाव काशीबा. गिरिजाशंकर ऊर्फ गिजुभाई यांचे प्राथमिक शिक्षण वेळा येथे व त्यानंतरचे शिक्षण भावनगर येथे झाले. १९०५ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते भावनगर येथे त्यांचे मामा हरगोविंद पंड्या यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी सामळदास महाविद्यालयामध्ये गिजुभाईंचे नाव दाखल केले; परंतु तेथील अभ्यासक्रम पुरा न करताच त्यांनी महाविद्यालय सोडले व उपजीविकेसाठी २०१७ मध्ये आफ्रिकेस प्रयाण केले आणि तेथील सॉलिलीटरच्या कमपनीत काम केले. तेथील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर १९१० साली ते भारतात परतले. त्यांनी आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित अशी प्रवासवर्णने लिहिली. भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व १९११ पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे हा व्यवसाय सोडून भावनगर येथील दक्षिणामूर्ती या संस्थेत त्यांनी साहाय्यक अधीक्षक म्हणून नोकरी पतकरली. कालांतराने ते त्या संस्थेत प्राचार्य झाले. १९०२ साली ते हरिबेन यांच्याशी विवाहबद्ध झाले. हरिबेन यांच्या निधनानंतर १९०६ साली जदिबेन यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. नरेंद्रभाई हा त्यांचा एकुलता एक मुलगा.

कार्य

गिजुभाई हे वकिलीचा व्यवसाय करीत. स्वतःच्या कचेरीत बसले असता एका लहान मुलाला हातपाय बांधून शाळेत नेत असल्याचे त्यांनी पाहिले. लहान मुलांना अशा तऱ्हेने शाळेत न्यावे लागते, याचे त्यांना फार वाईट वाटले. त्या सुमारास त्यांनी इटलीतील मारिया माँटेसरी (Maria Montessori) यांचे नाव ऐकले होते. माँटेसरी बाईंच्या शाळेत मुले हसत-खेळत जातात, आनंदाने बागडतात हे त्यांनी त्यांचे मामा मोटुभाई यांनी दिलेल्या माँटेसरींच्या साहित्यातून वाचले होते. भारतातील परिस्थिती त्यापेक्षा वेगळी होती, हे पाहून त्यांनी माँटेसरींना आपले गुरू मानून भारतामध्ये माँटेसरी पद्धतीची बालशिक्षणाची शाळा सुरू करावयाचे ठरविले. त्यांनी १९१८ मध्ये बालशिक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू केले. ऑगस्ट १९२० मध्ये त्यांनी दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना केली. भारतात भारतीयाने सुरू केलेला बालशिक्षणाचा हा पहिला प्रयोग होता. या प्रयोगाची रचना संपूर्णपणे बालकेंद्री आणि शास्त्रीय होती. बालशाळेतबालकांना स्वतंत्रपणे कृती करू देणे आणि शिक्षकाने त्यांचे अवलोकन करत राहावे, यावर गीजुभाई यांनी भर दिला.

गीजुभाई यांनी बालमंदिराची रचना करताना बालकाला केंद्रबिंदू ठेवून तशी रचना केली आहे. त्यामध्ये त्यांनी क्रीडांगण, मैदान, बाग, पशुपक्षी संगोपन, पुस्तकालय, हस्तकला उद्योग, कला मंदीर, स्नानागार, विश्रांती विभाग आणि अपंग व मतीमंद बालकांसाठी विशेष विभाग असे विभाग होते. त्याचबरोबर त्यांनी बालकांच्या इंद्रीय विकासाची साधने, वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, संगीताची साधने, बैलगाडी, मोटार, कचराकुडी, बागकाम साधने, रेडिओ इत्यादी साधने बालमंदिरात ठेवले होते. बालकांच्या भाषा, गणित, परिसर इत्यादी संबंधित शिक्षणासाठी उपयुक्त साधनेही तयार केली. बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे यासाठी चित्रपट पाहणे, कथाकथन करणे, प्रदर्शने भरविणे, उत्सव साजरे करणे अशी अनेक कार्यक्रम ते बालमंदिरात आयोजित करत.

बालशिक्षण कार्य

गिजुभाईंनी बालशिक्षणाच्या सर्वच अंगांकडे लक्ष दिले. बालकांचे शास्त्र जाणून त्यांच्याप्रमाणे बालकांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा गट तयार व्हावा या हेतूने त्यांनी १९२५ मध्ये भारतातील पहिले पूर्वप्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय (अध्यापक मंदिर) सुरू केले. तसेच वस्तीतील, खेड्यांतील प्रौढ साक्षर व्हावे यासाठीही त्यांनी मोठी चळवळ उभारली. यासाठी त्यांनी अक्षरज्ञान नावाची पुस्तिका लिहिली. बालशिक्षणाच्या प्रसाराचे उद्दिष्ट ठेवून १९२६ मध्ये त्यांनी माँटेसरी संगाची स्थापना केली. त्यानंतर १९४९ मध्ये तिचे नूतन बालशिक्षण संघ असे नामकरण करण्यात आले. त्यांनी शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक (Tarabai Modak) यांच्या सहकार्याने शिक्षणपत्रिका हे शिक्षणविषयक गुजराती मासिक सुरू केले. पुढे १९३३ मध्ये हे मासिक मराठीतून आणि १९३४ मध्ये हिंदीतूनही प्रकासित होऊ लागले. जुगतराम या सहकाऱ्याबरोबर बालकांसाठी त्यांनी वाचनमाला लिहिली. या प्रकारची त्यांची एकूण शंभरांवर पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांत बालनाटके, कथा, लोकगीते इत्यादींचा समावेश होता. त्यांनी पालकांसाठी पुस्तकेही लिहिली आणि प्रौढांसाठी साक्षरतावर्ग चालविले.

गीजुभाई यांनी बालकांच्या शिक्षणासंदर्भात व्यापक दृष्टी मांडताना म्हणतात की, देशातील लाखो बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न हा केवळ शिक्षम खात्याचा नसून तो राज्याचा, शासनाचा, लोकांचा असतो. शाळेमध्ये केवळ माहितीचे शिक्षण न देता कृतीवर भर द्यावा. मुलांना वर्गात मारून त्यांना नितीमान करता येत नाही. शिक्षणात सर्वांत महत्त्वपूर्ण शिक्षम हे हृदयाचे शिक्षम असते, असे ते म्हणत.

गिजुभाईंच्या कार्याने पश्चिम भारतात बालशिक्षणाचा पाया घातला गेला. त्यांच्या कार्यावर माँटेसरी, फ्रीड्रिख फ्रबेल (Friedrich Fröbel) आणि योहान हाइन्‍रिक पेस्टालॉत्सी  (Johann Heinrich Pestalozzi) यांच्या विचारांची छाप होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गुजरात साहित्यसभेने त्यांना रणजितराम सुवर्णपदक आणि दहा हजार रुपयांची देण्यात आले. तसेच गलीयारा पुरस्कारही त्यांना मिळाला. ते १९२८ मध्ये भारतात पार पडलेल्या दुसऱ्या माँटेसरी संमेलनाचे अध्यक्ष, तर १९३६ मध्ये हैदराबाद येथील अखिल भारतीय बालसाहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. गिजुभाई बालकांसाठी आईसारखे काम करीत. त्यामुळे त्यांना ‘बालमित्र’ ही पदवी तर मिळालीच; पण गमतीने ‘मूछिवाली माँ’ (मिशावाली आई) असे नामाभिधान प्राप्त झाले.

गिजुभाईंनी १९३६ साली मतभेदांमुळे दक्षिणामूर्ती ही संस्था सोडली आणि राजकोट येथे अध्यापक मंदिर स्थापन केले. अतिश्रमाने त्यांची तब्येत बिघडली. त्यातच अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.