Jump to content

गाय

गाय
देवणी या भारतीय वंशाची गाय
देवणी या भारतीय वंशाची गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: बोस
गायींचा आढळप्रदेश
गायींचा आढळप्रदेश
जीव

बाॅस. टॉरस
बाॅस. इंडिकस
बाॅस. लाँजिफ्रॉन्स

गाय हा एक सस्तन प्राणी असून भारताच्या पाळीव पशूंमधील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. प्राचीन काळापासून भारतात गाय ही प्रामुख्याने दूध, दही, ताक, लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेतीकरिता उपयुक्त पशुवंश पैदाशीसाठी पाळली जाते.

गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. बैल गाडीला किंवा नांगराला जोडून त्यांकडून गाडी-नांगर ओधण्याची कामे करवून घेतात. एक बैल जोडलेल्या गाडीला छकडा आणि दोन बैलांच्या गाडीला बैलगाडी म्हणतात.

गाईच्या पाडसाला वासरू, पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. भारतीय गाईचे शास्त्रीय नाव बॉस इंडिकस असे असून यात, डांगी, देवणी, कांकरेज, खिल्लार, गीर, ओंगल अशा विविध उपजातींचा समावेश होतो. विदेशी गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरस असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.

भारतीय गाय

भारतीय गाय ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरियाना, साहिवाल, गीर, अमृतमहाल, गवळाऊ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज,लाल कंधारी, थारपारकर, गुंतुर, ओंगल, गावठी, निमारी, राठी, मालवी, हल्लीकर, वेच्चूर, कंगायम, उंबलाचेरी, बरगूर, केनकाथा, पोंंवर, कासारगोड, गंगातिरी, खेरीगढ, नागोरी, मेवाती, सिरी, पंगनुर इत्यादी ४८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.[] भारतात दक्षिण भारतामधील अमृतमहल, काठियावाडची तलवडा व बुंदेलखंडमधील गोरना या गायी भारतात प्रसिद्ध आहेत.

भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनू इत्यादी नावे आहेत.

भारतीय गोवंशाचे महत्त्व

भारतीय गोवंशातील गायीच्या दुधाला A-2 प्रकारचे दूध म्हणले जाते. A-1 प्रकारापेक्षा या दुधात आणि त्यापासून तयार केलेल्या तुपात मानवी आरोग्यास उपयुक्त घटक जास्त प्रमाणात असल्याचे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. संकरित गायींपेक्षा देशी गायींची वातावरणातील बदलांना तोंड देण्याची क्षमता जास्त असते.[ संदर्भ हवा ]

धार्मिक महत्त्व

हिंदू, जैन, पारशी इ. धर्मात गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते.

हिंदू धर्म

हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः ।
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट ॥

यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.

हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो.

अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय साऱ्या संपत्तीचे भांडार आहे.

नेल्लोर वंशाची गाय

गाय शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी आहे.

औषधी महत्त्व

गाईचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधी गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.त्याला पंचगव्य असे म्हणतात.स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे. गाईचे शेणाने सारविलेल्या घरात कीटक कमी आढळतात. [ संदर्भ हवा ]

गाईच्या दुधात २१ प्रकारची ॲमिनो ‌‍‍आम्ले, ११ प्रकारचे फॅटी आम्ले, ६ प्रकारची जीवनसत्त्वे, २५ प्रकारची धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकारचे फॉस्फरस व ११ प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येतात.[ संदर्भ हवा ]

गोहत्या बंदी

हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.

कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे. गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे, असे काही हिंदूंची समजूत आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.

सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगल बादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इंग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.

भारताच्या महाराष्ट्र राज्यात १९७६पासून गोहत्याबंदीचा कायदा आहे. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गायीच्या नव्हे, तर बैलांच्या म्हणजेच गोवंशाच्या हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला. मात्र, त्याला राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली नव्हती. पंधरा वर्षांनंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजूरी घेऊन हा कायदा लागू केला.

गोहत्या बंदी करणारे महाराष्ट्र हे काही भारतातले एकमेव राज्य नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी अनेक राज्यांत हा कायदा आहे. गाय, बैल आदी जनावरे शेतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी व्हावा, याबाबत राज्यघटनेतील ४८व्या कलमात तरतूद केल्याने त्याच्या आधारे गोहत्या बंदी घालता येते. त्यामुळेच न्यायालयानेही ती वैध ठरविली आहे.

सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला असल्याने गोमांस बाळगणेही गुन्हा आहे . गोमांस हे ज्यांच्या खाद्यजीवनाचे अविभाज्य घटक आहे, त्यांची यामुळे अडचण झाली. त्यांच्याकडील मांसाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. त्यांचा छळ करण्याच्या काही घटनाही घडल्या. 

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातला गोवंश हत्याबंदीचा कायदा वैध ठरविला असला, तरी त्यातील तीन प्रमुख निर्बंध उठविले आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी असली, तरी परराज्यांतून किंवा परदेशांतून आणलेले गोमांस बाळगणे किंवा खाणे गुन्हा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गोमांस बाळगण्यावर बंदी घालणे न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. एखाद्याकडील गोमांस हे राज्यातील बेकायदा गोहत्येद्वारे आल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी न्यायालयाने सरकारवर टाकली आहे. त्यामुळे गोमांस बाळगणाऱ्यांचा होणारा छळ थांबू शकेल. त्याचबरोबर गाय, बैल आदींची विक्री आणि वाहतूक ही त्यांच्या हत्येसाठीच होत असल्याचे समजून वाहतूकदारावर गुन्हा नोंदविण्याची तरतूदही न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. (७ मे २०१६)

गोवंश हत्याबंदीच्या सध्याच्या कायद्यातील तीन प्रमुख तरतुदी न्यायालयाने रद्द केल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने एकूणच कायद्याचा फेरविचार सुरू केला आहे.

हिंदूंनी केलेले गोमांस भक्षण

हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्‍न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले? या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्‍न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.

या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

संकरित गाई

करनस्विस, सुनंदिनी, करनफ्रिज, फुले, त्रिवेणी या भारतीय संकरित गायी आहेत. या गायी भारतीय वंशांच्या गायीशी संकर घडवून तयार करण्यात आलेल्या आहेत.

जगातील प्रमुख देशातील गाईंची संख्या

संपूर्ण जगात आज ७२५ गोवंश आहेत. त्यात आफ्रिका खंडात १२० गोवंश, युरोप खंडात ३०५ गोवंश, अमेरिका खंडात ११० तर भारतात ४८ गोवंशांच्या गा आहेत.[] संपूर्ण जगात एकूण गाईंची संख्या १.३ अब्ज (१,३०,००,००,०००) असावी असे २००९ मधील अनुमान आहे.[]

जगातील गाईंची संख्या
क्षेत्र/देशगायी
भारत28,17,00,000
ब्राझील18,70,87,000
चीन13,97,21,000
यूएसए9,66,69,000
युरोप8,76,50,000
अर्जेंटिना5,10,62,000
ऑस्ट्रेलिया2,92,02,000
मेक्सिको2,64,89,000
रशिया1,83,70,000
दक्षिण आफ्रिका1,41,87,000
कॅनडा1,39,45,000
इतर4,97,56,000

गायीच्या दुधातील पोषक द्रव्ये

गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी यांच्या दुधातील पोषक द्रव्ये.

चित्र दालन

कांकरेज गाय
देवणी गाय
गवळाऊ गाय विदर्भ
भारताच्या गीर गाय
ब्राझील मध्ये जतन केलेला शुद्ध गीर गोवंश
मथुरा येथील गाय
'मलेनाडू गिड्डा' म्हणजे बुटकी मलेनाडू गाय
'मलेनाडू गिड्डा' उडुपी येथील मोकाट गोवंश

संदर्भ यादी

  • गाईचे अर्थशास्त्र (पुस्तक)

भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेली गोवंश हत्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने जेव्हा गोहत्याबंदीचा विचार केला तेव्हा त्या पार्श्वभूमीवर प्रा. वि.म. दांडेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. पुस्तकाचे प्रकाशक - पुण्याचे सुगावा प्रकाशन.

  • देशी गोवंश- अमित गद्रे आणि प्रा.डॉ.नितीन मार्कंडेय, सकाळ प्रकाशन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b घोरपडे, डॉ व्यंकटराव (१२ नोव्हेंबर २०२०). "देशी गोवंश दुर्लक्षितच". 2021-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Muruvimi, F. and J. Ellis-Jones. 1999. A farming systems approach to improving draft animal power in Sub-Saharan Africa. In: Starkey, P. and P. Kaumbutho. 1999. Meeting the challenges of animal traction. Intermediate Technology Publications, London. pp. 10-19.