Jump to content

गामा (पहिलवान)

Gama1916

गामा पहेलवान (उर्दू: گاما پھلوان  ;) ऊर्फ गुलाम मोहम्मद (उर्दू: غلام محمد ;) (इ.स. १८८२ किंवा २२-५-१८७८; अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत - इ.स. १९६० किंवा २२-५-१९६३; लाहोर, पंजाब, पाकिस्तान) हा पंजाबी कुस्तीगीर होता.

जीवन

गामाचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले आणि त्याला कुस्तीत पराभूत केले. या कुस्तीनंतर गामाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला.

त्यानंतर गामा पहेलवानाने जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली व इ.स. १९१० पर्यंत भारतीय उपखंडातील तमाम पहेलवानांना कुस्तीत पराजित केले, आणि निर्विवादपणे आपणच भारतीय कुस्तीचा चॅंपियन आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर गामाने परदेशी जाऊन इंग्लंडमध्ये कुस्त्यांच्या दंगलीत भाग घ्यायला सुरुवात केली, आणि जागतिक चॅंपियन असलेल्या पोलंडच्या स्टॅनिस्लॉस बाइझ्का या पहेलवानाला कुस्तीसाठी आमंत्रित केले. १० सप्टेंबर, इ.स. १९१० या रोजी दोघांमध्ये सामना झाला आणि गामाने स्टॅनिस्लॉसला सहज चीत केले. या कुस्तीनंतर गामाला जागतिक चॅंपियनचा बुल-टेस्ट बेल्ट मिळाला. इ.स. १९२७ मध्ये स्टॅनिस्लॉस बाइझ्का भरपूर मेहनत आणि तयारीनिशी समोर आला आणि त्याने गामाला कुस्तीसाठी पुकारले. याही कुस्तीत गामाने स्टॅनिस्लॉसला काही मिनिटांनतर चीत केले आणि आपले चॅंपियनपद राखले.

त्यानंतर गामा भारतात परत आले. आल्यावर त्यांनी परत एकदा रहीम बख्श सुलतानीवालाशी कुस्ती केली, त्याच्यावर जय मिळवला, आणि आपल्याला यापूर्वीच मिळालेला रुस्तुमे हिंद हा किताब कायम ठेवला. गामाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या केल्या आणि त्या एकूणएक कुस्त्यांत तो एकदाही हरला नाही. भारताच्या फाळणीनंतर गामा पाकिस्तानला जाऊन स्थिरस्थावर झाले. तिथे त्यांचा मृत्यू इ.स. १९६० मध्ये झाला.

जिवंतपणीच आख्यायिका बनलेला गामा मेल्यानंतरही म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांत आपल्यामध्येच राहिला. आजही दोन जाडजूड माणसे समोरून जात असली की लोक म्हणतात, पहा कसे गामा-गुंगा चालले आहेत.

गामा पहिलवानाने कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या तालमीत मेहनत केली असे सांगितले जाते. त्यामुळे गामाला शाहू महाराजांचा पैलवान असे म्हणले जाते. (?)