Jump to content

गानयोगी पं.द.वि.पलुस्कर (पुस्तक)

गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्या जीवनावर अंजली कीर्तने यांनी 'गानयोगी' हा एक शोधग्रंथ लिहिला आहे.

या ग्रंथाची विभागणी दोन भागांत केलेली आहे. 'संगीताचं सुवर्णयुग' या पूर्वार्धात कीर्तने यांनी १८५० ते १९५० या शंभर वर्षांतील सांगीतिक इतिहासाचा, महाराष्ट्रात झालेल्या उत्तरी संगीत घराण्यांच्या स्थलांतराचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. त्या स्थलांतरांची वैशिष्ट्येेे, त्या काळातील संगीत क्षेत्रातील वातावरण, गुरुकुल परंपरेची खासीयत, रहिमतखान, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, अल्लादिया खान, अब्दुल करीम खॉं यांसारख्या थोर गायकांचे योगदान, या सर्व पैलूंचा बहुमुखी विचार या ग्रंथात केला असल्याने संगीताच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हा ग्रंथ फार उपयुक्त आहे.

या ग्रंथावर ५ वर्षे काम करताना अंजली कीर्तने यांनी पलुस्करांच्या १२ वर्षांच्या खाजगी रोजनिशांचे परिशीलन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी संगीतविषयक इतिहासग्रंथ, चरित्त्रे, आत्मचरित्रे, स्मरणिका, मासिके यांचा झपाटल्यासारखा अभ्यास केला. शिवाय पुणे, नाशिक, कुरुंदवाड यांसारख्या महाराष्ट्रातील गावांप्रमाणेच, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरच्या शहरांचा दौरा केला. याचे कारण द.वि. पलुसकर हे देशभर लोकप्रिय गायक होते. जालंधरला ज्या ठिकाणी बापूराव वयाच्या चौदाव्या वर्षी गायले ते स्थळ लेखिकेने शोधले. बनारसचे राधारमण व दादासाहेब तिळवणकर, मोगलसराईचे गंगाधर भागवत, कलकत्त्याचे लालाबाबू खन्ना आणि जमनाप्रसाद गोएंका यांसारख्या बापूरावांच्या जीवनातील शंभरेक व्यक्तींना वा त्यांच्या वारसांनाही अत्यंत चिकाटीने लेखिकेने शोधून काढले. त्यांच्याकडून दुर्मीळ दस्तावेज प्राप्त करून घेतले.

सखोल व चौफेर संशोधन आणि गाढा अभ्यास हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.