गागाभट्ट
गागाभट्ट हे काशीत राहणारे एक विद्वान भट..[१] त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. गागाभट्ट : (सतरावे शतक)यांचे घराणे मूळचे पैठणचे. त्याचे पूर्वज वाराणसीस जाऊन राहिले. तेथे मूळ पुरुष नारायणभट्ट याने स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर, कर्तबगारीने व लोकसाहाय्याने मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले विश्वनाथ मंदिर पुन्हा उभारल्यामुळे त्याच्या घराण्यास आजवर चालू असलेल्या अग्रपूजेचा मान मिळाला. ह्या घराण्यात एकापेक्षा एक विद्वान पुरुष निपजले. हिंदुस्थानातील राजेरजवाडे आणि मुसलमान बादशाहाचे दरबारी या घराण्यातील विद्वान पुरुषांस मोठा मान देत. गागाभट्टाचे वडील दिनकरभट्टही विद्वान पंडित होते.
गागाभट्टांची ग्रंथसंपदा विपुल आहे. मीमांसा, धर्मशास्त्र, न्याय, अलंकार, वेदान्त इ. विषयांचा तो प्रकांड पंडित होता.
गागाभट्ट आणि शिवाजी राजे ह्यांचा संबंध १६६३पासून आला. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकात त्याने पुढाकार घेतला होता. ह्या राज्याभिषेकासंबंधी अनेक अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. त्याकरिता त्याने अनेक विद्वान पंडितांशी चर्चा करून धर्मासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय तयार केले.
शिवाजी राजे सिसोदिया वंशातील क्षत्रिय आहे, हे गागाभट्टाने सिद्ध केले. फक्त क्षत्रिय संस्कारांचा लोप झाला होता, म्हणून त्याने वैदिक विधींनी शिवाजी राजांचे उपनयन करून पूर्वीच्याच विवाहित स्त्रियांशी पुन्हा समंत्रक विवाह लाविले. त्यासाठी त्यांनी राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक नवा ग्रंथही रचला. याचा समकालीन वाराणसीचा दुसरा प्रकांड पंडित कवींद्राचार्य सरस्वती हा नेमस्त, तर गागाभट्ट जहाल होता. मात्र शिवछत्रपतींनी त्यास विशेष पसंत केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागाभट्ट यांनी केला .[२]
राज्याभिषेक
शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी जेव्हा राज्याभिषेक करणे आवश्यक झाले तेव्हा महाराष्ट्रातील ब्राह्मण अनुकूल नव्हते. कारण आधीच्या शेकडो वर्षांत महाराष्ट्रात कोणालाच राज्याभिषेक न झाल्याने राज्याभिषेकाच्या विधींचे कोणालाच ज्ञान नव्हते. या विषयावरील ग्रंथही उपलब्ध नव्हते.पैठणमधील एका ब्राह्मणाने मूळ पैठणचे असलेले व काशीत स्थायिक गागाभट्टांचे नाव सुचवले.[३]
गागाभट्टांनी लिहिलेले ग्रंथ
- कायास्थधर्म दीपिका [१]
- निरूढ पशुबंधप्रयोग
- भट्टचिंतामणी
- मीमांसाकुसुमांजली
- राकागम
- राज्याभिषेकप्रयोग
- समयनय
- सुज्ञानदुर्गोदय
- शिवअर्कोदय
संदर्भ
- छत्रपती शिवाजी महाराज का राज्यभिषेक और उसके बाद (लेखक - सर जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथातील एक प्रकरण)
- ^ a b Chhatrapati Shivaji (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. 2005. ISBN 9788128808265.
- ^ Eraly, Abraham (2007-09-17). Emperors Of The Peacock Throne: The Saga of the Great Moghuls (इंग्रजी भाषेत). Penguin Books Limited. ISBN 9789351180937.
- ^ Sarasvatī (हिंदी भाषेत). Iṇḍiyana Presa. 1974-01-07.