गव्हाणी घुबड
शास्त्रीय नाव | Tyto alba (Scopoli) |
---|---|
कुळ | उलूकाद्य (Tytonidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Barn Owl, Screech Owl |
संस्कृत | कुवय, कुटरू |
हिंदी | कुरैया, करैल |
गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळप्रदेश असणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्याउत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला मराठी मध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत.
वर्णन
गव्हाणी घुबड पक्षी हा साधारण ३६ सें. मी. आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. याचे डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते.[१] नर-मादी दिसायला सारखेच असतात.
वास्तव्य/आढळस्थान
गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात.
खाद्य
उंदीर, घुशी, सरडे, पाली हे यांचे मुख्य खाद्य आहे.
प्रजनन काळ
या पक्ष्यांचा विणीचा निश्चित काळ नाही. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची, गोलसर, ४ ते ७ अंडी देते.
इतर
भारतीय संस्कृतीत हे अपशकुनी मानले गेले आहेत परंतु इंग्लंडमध्ये मात्र गव्हाणी घुबड विद्वत्तेचे प्रतीक मानले गेले आहे.
चित्रदालन
- Tyto alba guttata
संदर्भ आणि नोंदी
- ^ पांडे , देशपांडे , संत, सतीश , प्रमोद , निरंजन (2013). महाराष्ट्राचे पक्षी. पुणे: इला फाऊंडेशन. p. 145. ISBN 978-81-906955-8-9.CS1 maint: multiple names: authors list (link)
बाह्य दुवे
- गव्हाणी घुबड बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.