गवंडीकाम
वीट, दगड, फरशी वगैरे कठीण पदार्थ कोरडे अगर संयोजक वापरून जे बांधकाम करण्यात येते ते गवंडीकाम होय. दगडी बांधकामाकरिता दगडाची घडाई करणारास पाथरवट वा घडाईदार म्हणतात. त्याच्या कामाचाही समावेश गवंडीकामात होतो. घडवलेले दगड, सर्व प्रकारच्या विटा वगैरेंची जुडाई करणे ही कामे जुडाईदार करतो. दरजा भरणे, गिलावा करणे ही कामे गवंडी करतो. घडाईकामास कौशल्य लागते. जुडाईवर गवंडीकामाची मजबुती अवलंबून असते.
गवंडीकामाचे सर्वसामान्य नियम : दगड, विटा वगैरे कोणत्याही बांधकामातील घटकांचा अखेर एकजीव होऊन काम एकसंध व्हावे हे धोरण असते. त्यांतील घन घटक अलग होऊ नयेत म्हणून त्यांचा एकमेकांत गुताव होईल अशी विशेष प्रकारची रचना करतात. दगडकामातील व वीटकामातील गुताव करण्याच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. दोन्ही प्रकारांत उभे सांधे कोठेही एका ओळीत येणार नाहीत अशा तऱ्हेने प्रत्येक थरातील घन घटकांची जुडाई करतात, त्यास सांधमोड म्हणतात (आ.१). तसेच बांधकामातील कोणताही एक भाग शेजारच्या कामापेक्षा ठराविक उंचीपर्यंत उभारतात आणि शेजारचा भाग उचलला जाईल तेव्हा, अगोदर उभारलेल्या भागाशी त्याचा जोड सुरक्षित व्हावा म्हणून भावी सांध्याच्या ठिकाणची पहिल्या भागाची रचाई टप्प्याटप्प्यांनी ठेवतात. यास चाल सोडणे म्हणतात (आ.१). प्रत्येक घन घटकाला भक्कम बैठक असावी लागते व तो बसविताना ठोकून ठोकून पक्का करतात. कोणताही भाग हलू नये. सर्व कामे ओळंब्यात व आकारात येण्याकरिता प्रत्येक थराची जुडाई करताना ओळंबा व लाइनदोरी (थराची आडवी पातळी बरोबर राखण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी ) लावणे अवश्य असते. बांधकामाची रुंदी ३५ सेमी. पेक्षा जास्त असेल तेव्हा दोन्ही दर्शनी बाजूंस दोन जुडाईदार समोरासमोर उभे राहून लाइनदोरी व ओळंबा पाहून जोडीने जुडाई करतात. बांधकामास बसवावयाचे लाकडी ठोकळे, खुंट्या, नळ वगैरे काम चालू असताना बसवितात. त्याकरिता काम झाल्यावर भोके पाडण्याने आजूबाजूचे बांधकाम कमकुवत होते. चुना किंवा सिमेंटचा संयोजक वापरला असेल, तर तो आवळून घट्ट होण्याकरिता बांधकाम सु. १४ दिवस ओले ठेवावे लागते. सिमेंट, चुना किंवा मातीचा संयोजक वापरतात अथवा सुके बांधकामही त्याच पद्धतीने रचतात. चुना किंवा सिमेंट वापरून कामाची रचाई होत असताना रचून झालेल्या खालच्या थरांचा दर्शनी भाग शेणामातीने सारवतात. दर्शनी भागावर येणारे संयोजकाचे ओघळ व डाग काम पुरे झाल्यावर घासून स्वच्छ करणे त्यामुळे सोपे होते.