गर्वनिर्वाण
राम गणेश गडकरी यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण' नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल.
राम गणेश गडकरी यांनी इ.स. १९०८मध्ये ’गर्वनिर्वाण’ लिहायला आरंभ केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते लिहून पूर्ण झाले. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; गणपतराव बोडस हे दिग्दर्शनाबरोबरच ‘हिरण्यकश्यपू’ची, बालगंधर्व ‘कयाधू’ची म्हणजे प्रल्हादाच्या आईची, तर जोगळेकर ‘लोकपाला’ची भूमिका करणार होते. पण यात काम करणाऱ्या गडकऱ्यांच्या एका हितशत्रू मित्र नटाने, त्या वेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात निनावी लिहिले होते की, ‘‘जॅक्सनच्या खुनामुळे राजद्रोहाचा आरोप करून, पुरावा या दृष्टीने किर्लोस्कर मंडळी गर्वनिर्वाण हे राजकीय नाटक बसवत आहे.’’ ‘किर्लोस्कर’वर ब्रिटिशांची वक्रदृष्टी होतीच; पण या पत्राने आगीत तेल ओतले गेले. कलाकारांमध्येही अनेक कारणांनी सुंदोपसुंदी वाढली. अशा रीतीने १९१०मध्ये ते नाटक मंचावर येणे रद्द झाले.[१] नंतर १९१४मध्ये हे नाटक करायचे ठरले. या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.
नाटकांच्या संशोधनाच्या निमित्ताने हृषीकेश जोशींना १०० वर्षांपूर्वीचे गडकरींचे हे नाटक सापडले आणि ते रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्चय केला. भक्त प्रल्हादाच्या चरित्रावर आधारित असलेले हे मूळ पाच अंकी नाटक असून त्याची जोशी यांनी दोन अंकी रंगावृत्ती केली आहे.
मूळ नाटकातील एकूण ९१ पदांपैकी फक्त १२-१३ पदांचा नाटकात समावेश करण्यात आला आहे. संगीत नाटक असल्याने अजय पूरकर, सावनी कुलकर्णी, सृजन दातार हे गायक नट नाटकात काम करतील. त्यांच्या साथीला अविनाश नारकर, मानसी जोशी, अंशुमन जोशी, शार्दुल सराफ यांचा अभिनय असेल.
हृषीकेश जोशी नाटकाचे दिग्दर्शक आहेत तर, नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.
लोकपाल
नाटककार राम गणेश गडकरी यांनी १९०८ साली 'प्रल्हादचरित्र' नावाचे नाटक लिहायला घेतले होते, या नाटकाचे नाव पुढे गडकऱ्यांचे गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या सांगण्यावरून 'गर्वनिर्वाण' असे करण्यात आले. राम गणेश गडकऱ्यांनी लिहिलेले हे पहिले नाटक होते. त्यात ’लोकपालाचे एक पात्र आहे. 'अमात्य लोकपाल' हा हिरण्यकश्यपूच्या राज्याचा मुख्य प्रशासक आहे. आज लोकपाल बिलामध्ये लोकपालाची जी म्हणून काही 'आदर्श कर्तव्ये' अभिप्रेत आहेत, ती सर्व कर्तव्ये पार पाडणारा, किंबहुना त्याहीपेक्षा सचोटीचा, आत्मभान असलेला लोकपाल या 'गर्वनिर्वाण' नाटकात गडकऱ्यांनी रंगवला आहे. सुरुवातीला अत्यंत जबाबदारीने हिरण्यकश्यपूचा कारभार सांभाळणारा हा लोकपाल, दुरभिमानी, अतिमहत्त्वाकांक्षी आणि अहंमन्य हिरण्यकश्यपूच्या हातून अनाचार घडतोय हे पाहून त्याला सारासार विचार करण्यास सांगतो. नैतिकतेची, सत्याची आणि परिस्थितीची त्याला जाणीव करून देतो. एका महत्त्वाच्या प्रसंगात या लोकपालाच्या तोंडी वाक्य आहे- महाराज, लोकपालाचा नेत्र हाच राजाचा नेत्र. लोकपालाने पाहिले, ते राजानेही पाहिले. राज्यात प्रजेची मानसिकता काय आहे, राजाने आत्ता कसे वागणे अपेक्षित आहे, हे लोकपाल राजाला सुचवतो, प्रसंगी समजावतो, वादही होतो. आणि शेवटी हिरण्यकश्यपू लोकपालाला राज्यातून हाकलून देतो.
भारतामध्ये १९६८ साली न्यायमूर्ती सिंघवी यांनी 'लोकपाल' हा शब्द प्रथम वापरला आणि त्या नावाचे बिल बनले. 'लोकपाल' हा शब्द नक्की कधी अस्तित्वात आला, याबद्दल काही भरवसा देता येत नाही, असे असले तरी गडकऱ्यांनी हा शब्द आधीच वापरला होता, हे यावरून दिसते. भारतात लोकपाल बिलासंदर्भात जे जे म्हणून काही झाले, त्याचे अनेक संदर्भ 'गर्वनिर्वाण' नाटकात दिसतात.
गडकऱ्यांनी जेव्हा 'गर्वनिर्वाण' लिहिले त्यावेळी ते २३ वर्षांचे होते. ज्या अर्थी हा 'लोकपाल' शब्द या नाटकात त्यांनी वापरला आहे, त्या अर्थी हा शब्दप्रयोग त्यांच्याआधी झालेला असला पाहिजे. 'लोकपाल' हा नुसता शब्दच नाही, तर ज्या अर्थी त्याची कर्तव्ये या नाटकात दिसतात, त्या अर्थी 'लोकपाल' ही 'सिस्टीम' त्यांना माहीत असली पाहिजे. तत्कालीन साहित्यात, राजकीय दस्तावेजांत, व्यवस्थेत 'लोकपाल' आधीपासूनच अस्तित्वात असला पाहिजे. आणि तसे नसेल तर 'लोकपाल' या शब्दाचे आणि या 'व्यवस्थे'चे श्रेय राम गणेश गडकऱ्यांना तरी दिले पाहिजे.
लोकपाल नायक की खलनायक?
भारतात लोकपाल बिल पास झाल्यानंतर बनलेला पहिला लोकपाल नायक की हे खलनायक याबद्दल जनता साशंक असली किंवा नसली तरी, इ.स. १९१० साली रंगभूमीवर येऊ घातलेल्या ’गर्वनिर्वाण’ नाटकातील नटाला, म्हणजे संस्थानिक असलेल्या नानासाहेब जोगळेकरांना, आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकपालाची भूमिका नको होती. त्यांना 'खलनायक' असलेल्या हिरण्यकश्यपूचीच भूमिका हवी होती. कारण नट म्हणून लोकपालाच्या भूमिकेत फारसे आव्हान नसून, कर्दनकाळ ठरलेल्या हिरण्यकश्यपूची त्याला भुरळ पडली होती, आणि त्यायोगेच त्याला नट म्हणून आपली छाप पाडायची होती.
नाटकाचा बळी आणि पुनर्जन्म
’गर्वनिर्वाण’च्या कलाकारांत अंतर्गत सुंदोपसुंदी, कलह, हेवेदावे निर्माण झाले होते. वर्ध्यात रंगीत तालमीनंतर रात्री नवख्या नटाकडून गडकऱ्यांचा अपमान झाल्याच्या निमित्ताने कलाकारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि गडकऱ्यांच्या नाट्यरूपी पहिल्या अपत्याचा, म्हणजे 'गर्वनिर्वाण'चा, बळी पडला. शेवटी या नाटकाचा पुनर्जन्म होण्यासाठी २०१४ हे साल उजाडावे लागले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "गर्वनिर्वाणाची निर्मिती". दिव्यमराठी. ८ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
बाह्य दुवे
- श्रद्धा पेडणेकर (७ जानेवारी २०१४). "संगीत गर्वनिर्वाण'ची शंभर वर्षांनी "नांदी'". सकाळ. ८ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
- खापरे संकेतस्थळावर राम गणेश गडकर्यांच्या संगीत गर्वनिर्वाणमधील काही पदे विदागारातील आवृत्ती