Jump to content

गर्भकला

गर्भकला, भ्रूणाची (विकासाच्या पूर्व अवस्थांत असणाऱ्या अपक्व जीवाची) वाढ होत असताना त्याच्या ऊतकांपासून (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहांपासून) त्याच्याभोवती उत्पन्न होणाऱ्या पातळ वेष्टणांना गर्भकला म्हणतात. या वेष्टणांना भ्रूणकलाही म्हणतात. शिवाय या संरचना भ्रूणाच्या शरीराबाहेर असल्यामुळे त्यांना भ्रूणबाह्य कला असेही नाव दिलेले आहे. गर्भकला सर्व उल्बी [ज्या प्राण्यांच्या भ्रूणांत उल्ब ही गर्भकला असते असे प्राणी] प्राण्यांच्या– सरीसृप (सरपटणारे), पक्षी आणि स्तनी (सस्तन)– भ्रूणावस्थेत असतात. शार्क मासे व अस्थिमत्स्य (शरीरात हाडांचा सांगाडा असलेले मासे) यांच्या भ्रूणावस्थांत ज्यांची गर्भकलांशी तुलना करता येईलअशा काही प्रकारच्या कला उत्पन्न होतात. इतर प्राण्यांमध्येही (अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेले आणि खालच्या दर्जाचे पृष्ठवंशी प्राणी) कला उत्पन्न होतात, पण त्या अंडाशयाच्या पुटक-कोशिकांपासून (ज्यात अंडे वाढते त्या पिशवीसारख्या भागाच्या पेशींपासून) अथवा स्त्री-जननमार्गाच्या विशिष्ट कोशिकांच्या (पेशींच्या) स्रावापासून उत्पन्न होत असल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या असतात.

सरीसृप, पक्षी आणि स्तनी यांच्या भ्रूणांच्या वृद्धीच्या काळात भ्रूणाभोवती चार वेगवेगळ्या कला उत्पन्न होतात. पीतक कोश (भ्रूणाला चिकटलेली व आत पीतक म्हणजे पोषणद्रव्य असलेली अतिशय पातळ पिशवी), उल्ब, जरायू (उल्बाच्या बाहेर असणारी व त्याला वेढणारी कला) व अपरापोषिका (भ्रूणाच्या आहारनालाच्या मागच्या भागापासून निघणारा व एका टोकाशी बंद असणारा पिशवीसारखा भाग) या त्या चार कला होत. या कला भ्रूणाचे शुष्कन (वाळणे) आणि आघात यांच्यापासून रक्षण करतात आणि श्वसन, उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणे) आणि पोषण ही भ्रूणाच्या जीवनातील महत्त्वाची कार्येही पार पाडतात. पण प्राण्यांच्या काही गटांमध्ये एखाद्या विशिष्ट कलेचे खास कार्य असते, तर इतर गटांमध्ये त्या कलेला फारसे महत्त्व नसते. सरीसृप आणि पक्षी या दोन वर्गात पीतक कोश महत्त्वाचा असतो, पण स्तनिवर्गात त्याला एक अवशेषी (लहान, ऱ्हास पावलेले व अपूर्ण वाढ झालेले) अंग यापेक्षा जास्त महत्त्व नसते.

भ्रूण पीतकापासून अलग होत असताना त्याचे शीर्ष, पुच्छ व दोन्ही बाजूंकडील आद्य-कायस्तराला (बाह्य देहभित्तीच्या उत्पत्तीत मदत करणाऱ्या पूर्व-मध्यस्तराच्या बाहेरच्या स्तराला) स्पष्टपणे घड्या पडतात. या घड्या अथवा दुमडी एकमेकींकडे वाढत जाऊन भ्रूणाच्या वर त्यांचे पूर्णपणे सायुज्यन (एकीकरण) होते. अशा प्रकारे भ्रूण दोन निरनिराळ्या कलांनी वेढला जातो.प्रत्येक कला बाह्यस्तर आणि मध्यस्तर यांच्या सायुज्यनाने बनलेली असते. भ्रूणाच्या जवळ असणारी आणि त्याला पूर्णपणे वेढणारी कला उल्ब आणि त्याच्या बाहेर असणारी जरायू होय. भ्रूण आणि उल्ब यांच्यामधील जागा पाण्यासारख्या द्रवाने भरलेली असते. यामुळे भ्रूण जलीय माध्यमात राहतो. भ्रूण ओला ठेवणे, आघातापासून त्याचे रक्षण करणे, तो कशालाही चिकटू न देणे आणि त्याच्या पृष्ठीय स्तरांचे पोषण करणे ही या द्रवाची कार्ये होत.

भ्रूणाच्या पचनमार्गाच्या पश्च (मागच्या) टोकाजवळून आंत्रापासून (आतड्यापासून) एक पिशवीसारखा अंधवर्ध (एका टोकाशी बंद असणारी पिशवी) उत्पन्न होतो. याला अपरापोषिका म्हणतात. हिची झपाट्याने वाढ होऊन ती जरायूला लागून त्याच्या खाली पसरते. अपरापोषिका दोन स्तरांची बनलेली असते. आतला अंतःस्तर आणि याच्या बाहेरचा आंतरांग-मध्यस्तर. अपरापोषिकेचा विस्तार झाल्यानंतर पुढे तिच्या पृष्ठावर रुधिरवाहिका (रक्तवाहिन्या) उत्पन्न होतात व त्यामुळे ती भ्रूणाचे श्वसनांग आणि उत्सर्जनांग बनते.

सरीसृप आणि पक्षी यांच्या अंड्यांत पीतक पुष्कळच असते पण स्तनींमध्ये ते थोडे असते. सरीसृपांत आणि पक्ष्यांत सबंध भ्रूण सक्रिय ध्रुवाजवळ (अंड्यातील वरच्या अर्धगोलातील अल्प वा मुळीच पीतक नसलेल्या भागाजवळ) तयार होतो. भ्रूणाचा अंतःस्तर आणि आंतरांग-मध्यस्तर यांची वाढ होऊन पीतकाचा सगळा गठ्ठा त्यांनी वेढला जातो आणि अशा प्रकारे पीतक कोश तयार होतो. भ्रूणाच्या पोषणाकरिता पीतक कोशातून पीतक पचनमार्गात जात असते. पीतक कोशातील सर्व पीतक संपल्यावर अखेरीस या कोशापासून पिल्लाच्या शरीराचा अधर (खालचा) भाग बनतो. सस्तन प्राण्यांत पीतक जरी थोडे असले, तरी वरील दोन वर्गांतील प्राण्यांप्रमाणेच त्यांतही मोठा पीतक कोश तयार होतो.

पक्ष्यांमध्ये जरायू आणि अपरापोषिका या सुरुवातीला वेगळ्या असणाऱ्या कला एक होऊन जरायु-अपरापोषिका ही संयुक्त कला बनते. उच्च दर्जाच्या सस्तन प्राण्यांमध्ये जरायू आणि अपरापोषिका अथवा अपरापोषिका-वाहिका मातेच्या गर्भाशयाच्या श्लेष्मकलेशी (बुळबुळीत पदार्थ स्रवणाऱ्या अस्तराशी) अथवा अस्तराशी संयुक्त होऊन अपरा (वार) तयार होते. उल्ब, अपरापोषिका आणि पीतक कोश यांच्या सायुज्यनाने नाभिरज्‍जू (नाळ) बनते.

सरीसृप आणि पक्षी यांची अंडी फुटून पिल्ले बाहेर पडण्याच्या वेळी अथवा त्याच्या थोड्या आधी या कलांचे अभिशोषण होते. सस्तन प्राण्यांमध्ये जन्माच्या वेळी या कला स्वाभाविक रीत्या फाटून अलग होतात. अलग होणाऱ्या कला बहुधा उल्ब, जरायू आणि अपरा या असतात आणि या सगळ्यांना नाळ-वार असे एकवट नाव देतात.