Jump to content

गरुडाचार

बिडिगनविले कृष्णस्वामी अय्यंगार गरुडाचार (१३ जानेवारी, इ.स. १९१७:चिकमंगळूर, कर्नाटक - २७ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे म्हैसूरच्या संघातून आणि संयुक्त प्रांताच्या क्रिकेट संघातून रणजी करंडक सामने खेळणारे एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू होते. ९९व्या वर्षी निधन पावलेले हे आधुनिक काळातले सर्वात वयोवृद्ध क्रिकेट खेळाडू होते.

गरुडाचार यांनी बनारस विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. इ.स. १९३५-३६ ते १९५०-५१ या कालावधीत त्यांची क्रिकेट कारकीर्द बहरात होती. २७ प्रथमश्रेणी सामन्यांत त्यांनी एका शतकासह एकूण ११२६ धावा केल्या होत्या. त्यांची सरासरी २९.६३ होती.

गरुडाचार उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करायचे. गोलंदाजीत त्यांने १००हून अधिक बळी घेतले होते. एकाच सामन्यात पाच गडी बाद करण्याची कामगिरी सात वेळा, आणि दहा बळी घेण्याची कामगिरी त्यांनी तीन वेळा केली होती.

१९३९-४० च्या मोसमात अंतिम रणजी करंडक सामना पूना क्लबच्या मैदानावर २४ फेब्रुवारी १९४० रोजी झाला. त्यावेळी संयुक्त प्रांताने प्रथम फलंदाजी केली होती.गरुडाचार यांनी आठव्या क्रमांकावर येऊन ६३ धावांची नाबाद फलंदाजी केली. संयुक्त प्रांताचा डाव २३७ धावांत संपला होता.महाराष्ट्राने ५८१ धावा करून आघाडी घेतली होती. गरुडाचार यांनी खंडू रांगणेकर यांना ४५ धावांवर बाद केले. त्या सामन्यात त्यांना ही एकच विकेट मिळाली होती.

१९४१-४२ मध्ये गरुडाचार यांनी उत्तम खेळ करून म्हैसूर संघाला रणजी ट्रॉफी मिळवून दिली.

इ.स. १९४६च्या सुमारास क्रिकेट खेळाडू गरुडाचार यांनी सी.के. नायडू कर्णधार असलेल्या होळकर संघाविरुद्ध १६४ धावांची खेळी केली. या सामन्यात ते म्हैसूर संघाचे कर्णधार होते.याच सामन्याने गरुडाचार यांनी त्यांच्या प्रथम वर्गीय क्रिकेट कारकिर्दीची समाप्ती केली.