Jump to content

गणोरे

गणोरे
जिल्हाअहमदनगर जिल्हा
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या४४२१
२०११
दूरध्वनी संकेतांक०२४२४
टपाल संकेतांक४२२६०१
वाहन संकेतांकमहा-१७


गणोरे हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आढळा नदीकाठी वसलेले गाव आहे. गणोरेला जाण्यासाठी संगमनेर आणि अकोले या शहरांमधून एस.टी.ची सोय आहे. खाजगी वाहनेही मिळतात. गावात मुख्य बाजारपेठ दर्शनीच आहे. आजूबाजूची अनेक गांवे गानोर्यावर अवलंबून असल्याने इथे मार्केट चांगले आहे. गुरुवार हा दिवस येथील आठवडी बाजाराचा. तसे सधन गाव, राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे.अकोले तालुक्यातील या गावात अबिंकादेवीचे मंदिर आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर या गावातील एका मुलीचे लग्न अकोले तालुक्यातील डुबेर या गावातील तरुणाशी झालेले होते. ही विवाहित स्त्री घरातून निघून गेली आणि फिरत फिरत गणोरे गावाच्या उत्तर बाजूने वाहणाऱ्या आढळा नदीतीरी येऊन बसली. हा भाग म्हणजे गणोरे, हिवरगाव आणि डोंगरगाव या तिन्ही गावांची शिव म्हणजे हद्द होती. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ही स्त्री अनेकांच्या डोळ्यादेखत अंतर्धान पावली (गुप्त झाली). आणि ज्या ठिकाणी ती अंतर्धान पावली त्याठिकाणी लोकांनी मंदिर बांधले आणि त्या स्त्रीला `अंबिका माता' असे नाव मिळाले. अशी ही आख्ययिका आहे. पुरावा म्हणले तर काही नाही. पण या भागात हे मंदिर प्रसिद्ध आहे. मे महिन्यामध्ये या अंबिका देवीची यात्रा भरते. अजूनही यात्रेच्या दिवशी समनापूर आणि डुबेर या गावांवरून मानाच्या सासन काठया येतात. तीनही गावांच्या शिवेवर असल्याने ही यात्रा तिन्ही गावांमिळून केली जाते. पण प्रत्येक गावाची जबाबदारी वेगवेगळी असते. डोंगरगावचे नागरिक देवीला खन नारळ देऊन ओटी भरणं करतात. हिवरगावचे लोक `तकतराव' ओढत आणतात. हा तकतराव नावाचा राक्षस १२ बैल जोडलेला गाड्यातून ओढत इथे आणला जातो, आणि देवीच्या पायाशी त्याचा बळी दिला जातो. यानंतर शोभेच्या दारूची नयनरम्य आतिषबाजी केली जाते.

     मुख्य गाव गणोरेला पूजेचा आणि होमाचा मान असतो. गावातील भक्त आणि प्रतिष्टीत लोक मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढून मंदिरात येतात. तिथे देवीची पूजा करून बाहेर बोकडाचा बळी दिला जातो. संध्याकाळी गणोरे ग्रामस्थांच्या वतीने तमाशा सारखा करमणुकीचा कार्यक्रम केला जातो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हगामा म्हणजेच कुस्त्यांचा फड रंगतो. दूर दूरच्या गावातील पहिलवान इथे कुस्त्या खेळण्यासाठी येतात. गावातील आखाडा आणि कुस्ती कधीच मोडीत निघालेली असले तरी यात्रेच्या निमित्ताने अजून हा हगामा प्रकार टिकून आहे. ही यात्रा म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या यात्रांचा समारोप/ शेवट. यानंतर कुठलीही यात्रा होत नाही. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे............ अनिल दातीर.