Jump to content

गणगौर (राजस्थान)

गणगौर मिरवणूक

गणगौर (राजस्थान) हा भारत देशातील राजस्थान प्रांतातील महिलांचा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे.[] गण म्हणजे शिव आणि गौरी म्हणजे पार्वती यांचे एकत्रित पूजन असा या व्रताचा आणि उत्सवाचा भाग आहे.[]

स्वरूप

राजस्थानमधील महिला भक्तीभावपूर्वक या सणाचे आणि व्रताचे पालन करतात.[]या व्रतामधे मार्च -एप्रिल या कालखंडात शिवाची पत्नी पार्वती-गौरी हिचे पूजन केले जाते.[]सुगीच्या हंगामात साजरा होण्याऱ्या या सणामधे महिला सौभाग्यासाठी, समृद्धीसाठी आणि संततीच्या सुखासाठी व्रत करतात.कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून गणगौर पूजतात तर विवाहित महिला पतीच्या सुखासाठी या व्रताचे पालन करतात.[] चैत्र महिन्यामधे होळी पौर्णिमेनंतरच्या लगेचच्या दिवशी या व्रताची सुरुवात होते.हा उत्सव सोळा दिवस सुरू असतो. नवविवाहित युवतींना १८ दिवस हे व्रत करणे बंधनकारक मानले जाते. या अठरा दिवसात महिला केवळ एकाच वेळी भोजन करतात आणि एकवेळ उपवास करतात. गणगौरीच्या उत्सवानिमित्त संपूर्ण कालावधी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या ठिकाणी जत्रा भरतात आणि उत्सवाचा आनंद घेतला जातो.[]

व्रतासंबंधी आख्यायिका

एकदा शिव-पार्वती आणि नारदमुनी जंगलात सहलीला निघाले. त्यांच्या येण्याची वार्ता कळताच जंगलातील स्रियांनी त्यांच्यासाठी नैवेद्य तयार करायला सुरुवात केली. प्रथम सामाजिक निम्न स्तरातील महिला आपले पदार्थ घेऊन आल्या. ते खाऊन संतुष्ट झालेल्या पार्वतीने एका वनस्पतीचे शिंपण त्यांच्यावर करून त्यांना आशीर्वाद दिले.त्यानंतर उच्च वर्गातील स्रिया आपले पदार्थ पार्वतीला अर्पण करण्यासाठी आल्या. तू यांना कसा आशीर्वाद देणार असे शिवांनी पार्वतीला विचारल्यावर तिने आपल्या बोटाला एक जखम केली आणि त्यातून आलेले रक्त तिने या महिलांवर शिंपडून आशीर्वाद दिले अशी या व्रताची आख्यायिका आहे असे मानले जाते.

स्वरूप

गणगौर उत्सवातील महिलांचे आकर्षण म्हणजे मेंदी काढणे.हातांवर आणि पायांवर मेंदीने विविध आकाराची नक्षी काढली जाते राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरू होतो.या दिवशी गणगौर बसवितात.होळीच्या राखेचे आणि शेणाचे १६ मुटके करतात.भिंतीवर १६ हळद आणि कुंकु यांच्या टिकल्या काढतात.त्याखाली मुटके मांडतात.हे मुटके हे गौरीचे प्रतीक होय.गव्हाच्या ओंब्या,हळद यांनी पूजा करतात. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्यांजवळ ते कणीस ठेवतात.त्याला शंकर म्हणतात.आणखी एका कणसाला केसांचा गुंता आणि लाल पिवळा धागा बांधतात.हेही गौरीचे प्रतीक मानले जाते.या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवतात. छोटी मातीची मडकी तयार करून त्यांना छिद्रे केली जातात आणि त्यामधे छोटे दिवे लावले जातात. होळीपासून सातव्या दिवशी कुमारिका मुली हे घडे त्यामधे दिवे प्रज्वलित करून डोक्यावर घेऊन निघतात.या मिरवणुकीत त्यांना पैसे, गूळ, तेल हे छोट्या भेटींच्या स्वरूपात दिले जाते. दहा दिवस अशी मिरवणूक काढली जाते.दहाव्या दिवशी गौरी विसर्जनानंतर मुली हे घडे फोडून विहीरीत टाकतात आणि त्यानंतर उत्सवी मिष्टान्नांचा आनंद घेतात.[]

मिरवणूक

या उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांमधे मुली आणि महिला मिळून शिव आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तींचा विशेष शृंगार करतात. त्यांना नवे शिवलेले उत्सवी पोशाख, दागिने घातले जातात.पहिले दोन दिवस एका विवाहित स्रीच्या डोक्यावर ईश्वर म्हणजे शिव आणि पार्वती म्हणजे गौरी यांच्या मूर्ती घेऊन मिरवणूक निघते.[] अन्य सर्व महिला गौरीच्या सासरी तिची पाठवणी करणारी लोकगीते गातात.[]विहीर, पाणवठा, तळे, झरा अशा एखाद्या ठिकाणी मिरवणूक पोहोचते. पहिले दोन दिवस मूर्तींवर केवळ पाणी शिंपडून त्या परत आणल्या जातात. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मात्र मिरवणूक संपते आणि विहीरीत वा पाण्यात ईश्वर आणि गौरीच्या मूर्तीचे विसर्जन करून गौरीला निरोप दिला जातो. असे या उत्सवाचे स्वरूप आहे.

जयपूर येथील उत्सव

राजस्थान मधील जयपूर शहरात या उत्सवासाठी घेवर / घीवर नावाचे विशेष मिष्टान्न केले जाते. लोक आपापसात या मिठाईची देवाणघेवाण करून आनंद व्यक्त करतात आणि शुभेच्छा देतात. जननी देवडी या जयपूर मधील सिटी पॅलेस येथे असलेल्या ठिकाणी देवीची मिरवणूक काढली जाते. जगभरातून पर्यटक या उत्सवासाठी उपस्थित राहतात आणि उत्सवाचा आनंद घेतात.[]

उदयपूर येथील उत्सव

मिरवणूक

उदयपूर येथे या उत्सवासाठी विशेष घाटाची योजना केलेली असून त्याचे नाव गणगौर घाट असे आहे.[१०] पिछालो तलावाच्या परिसरात हा घाट असून येथे गणगौर काळातील सर्व उत्सवी कार्यक्रम आयोजित केले जातात. गणगौर मिरवणूक ही शहराच्या विविध भागातून येथे येते. यामध्ये गणगौर मूर्ती वाजतगाजत आणल्या जातात त्यासाठी रथ, बैलजोडया, लोककलाकारांचे सादरीकरण यांचा सहभाग विशेषत्वाने असतो.[११]

हे ही पहा

राजस्थान

चैत्रगौर

संदर्भ

  1. ^ a b Melton, J. Gordon (2011-09-13). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations [2 volumes]: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-59884-206-7.
  2. ^ Meena, R. P. Art Culture and Heritage of Rajasthan Study Material With MCQ: Useful for RPSC RAS Prelims and Other Exams (इंग्रजी भाषेत). New Era Publication.
  3. ^ Julka, Anu (2014-10-08). Shrinath Ji: Pichwais: the Manifestation of Pushtimarg (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 978-1-4828-2285-4.
  4. ^ "Gangaur Puja 2023: Date, Time, Pooja Vidhi and Significance of Gauri Puja". 2023-03-24. ISSN 0971-8257.
  5. ^ Unnithan-Kumar, Maya (1997). Identity, Gender, and Poverty: New Perspectives on Caste and Tribe in Rajasthan (इंग्रजी भाषेत). Berghahn Books. ISBN 978-1-57181-918-5.
  6. ^ Dwivedi, Dr Bhojraj (2014-10-27). Religious Basis of Hindu Beliefs (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5165-092-8.
  7. ^ Locating Pleasure in Indian History: Prescribed and Proscribed Desires in Visual and Literary Cultures (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. 2021-07-30. ISBN 978-93-90513-88-8.
  8. ^ "Gangaur | ShivShankar.in" (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.
  9. ^ "Gangaur Festival Jaipur - Significance, Rituals, Celebrations". www.jaipur.org.uk. 2020-12-05 रोजी पाहिले.
  10. ^ Stott, David; McCulloch, Victoria (2014-01-14). Rajasthan, Delhi & Agra (इंग्रजी भाषेत). Footprint Travel Guides. ISBN 978-1-909268-39-5.
  11. ^ "GANGAUR FESTIVAL". MAGIK INDIA (इंग्रजी भाषेत). 2020-03-22. 2020-12-05 रोजी पाहिले.