Jump to content

गंगाजळी

गंगाजळी भविष्यकाळात फेडावी लागणारी देणी निश्चितपणे देता यावीत म्हणून प्रतिवर्षीच्या नफ्यातून बाजूस काढून ठेवलेल्या रकमांचा निधी. हा निधी व त्यावरील व्याज ह्यांतून विवक्षित काळी फेडावयाच्या दायित्वाची संपूर्ण फेड करता यावी, अशी व्यवस्था उद्योगसंस्था करीत असतात. दहा–पंधरा वर्षांनंतर आवश्यक त्या यंत्रांच्या नूतनीकरणासाठी, ऋणपत्रे फेडण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी करण्यात येणारे राखीव निधी व गंगाजळी ह्यांमध्ये फरक आहे. अशा राखीव निधींची व्यवस्था करणे, ही उद्योगसंस्थांच्या दृष्टीने एक ऐच्छिक बाब समजली जाते. अशा निधींसाठी लागणाऱ्या रकमा संस्थांच्या नफातोटापत्रकांत खर्च  म्हणून दाखवितात व त्या संस्थामध्येच खेळत्या भांडवलाच्या रूपात वापरल्या तरी चालते परंतु गंगाजळीची रक्कम बाजूस काढून ठेवून तिचा संस्थेच्या धंद्याबाहेर सुरक्षित विनियोग करण्यात येतो कारण ठराविक वेळी संस्थेचे संपूर्ण विवक्षित दायित्व फेडण्यासाठी ती उपलब्ध होणे, संस्थेच्या दृष्टीने अनिवार्य असते. गंगाजळीची रक्कम नफातोटापत्रकात खर्च म्हणून न दाखविता नफ्याचे वाटप या रूपाने दाखवावी लागते.