Jump to content

खेरीअर गाय

खेरीअर गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाचा उगम मुख्यतः ओडिशा राज्यातील नुआपाडा जिल्ह्यातील खेरीअर/खरियार गावातील आहे. त्यामुळे या गोवंशाचे नाव खेरीअर गावावरून पडले आहे. ओडिशातील नुआपाडा, कालाहांडी आणि बालनगिर जिल्ह्यांचा समावेश प्रजनन क्षेत्रात होतो. नुआपाडा जिल्ह्यातील खरियार, कोमना, सिनापली आणि बोडेन ब्लॉकमध्ये या जातीचे गोवंश मोठ्या प्रमाणात आढळतात.

शारीरिक रचना

  • ही एक नम्र, लहान आकाराची, परंतु मजबूत जात आहे. कातडीचा रंग हलका तपकिरी ते राखाडी असतो.
  • पाठीवरील वशिंड (कुबड), मान आणि चेहऱ्याचा आणि पाठीचा काही भाग गडद रंगाचा असतो.
  • शिंगे सरळ, वर आणि आतील बाजूस उगवलेली आणि काळ्या रंगाची असतात.
  • कपाळाचा आकार मध्यम व सरळ असून डोके सुद्धा शरीराच्या आकाराच्या प्रमाणात आहे.
  • डोळ्याच्या पापण्या काळ्या असून, नाक आणि तोंडाचा भाग राखाडी काळा असतो.
  • कान १८ सेमी पर्यंत लांब असून साधारणतः आडवे असतात.
  • शेपटी प्रामुख्याने काळी आणि कधी कधी राखाडी असते तर खुर काळे असतात.
  • गळकंबल किंवा गळ्याची पोळी बैलांची मध्यम आकाराची तर गायींची लहान आकाराची असते.
  • वशिंड किंवा कुबड मध्यम आकाराचे असते. तसेच दुधाची कास ही लहान, वाटीच्या आकाराची, मध्यम आकाराची दुधाची शिरा असते.
  • बैलाची सरासरी उंची १०६ सेमी तर गायींची उंची १०२ सेमी असते.
  • बैलाच्या शरीराची लांबी सरासरी ११४ सेमी, आणि गायीची १०६ सेमी असते.
  • बैलाचे शरीराचे वजन सरासरी १९६ किलो असते आणि मादीचे वजन १५६ किलो असते.
  • बैलाच्या छातीचा घेर ११४ सेमी आणि गायीचा १२३ सेमी असतो.
  • एका वेतास दूध उत्पादन ३०० किलो ते ४५० किलो पर्यंत असते.
  • सरासरी दुधातील फॅट्स ४ - ५ % पर्यंत असते. आणि दररोजचे दुधाचे उत्पादन सुमारे १.८ किलो असते.
  • पहिल्या वासराचे सरासरी वय सुमारे ४ वर्षे असते. स्तनपानाचा कालावधी सुमारे २७० ते २९० दिवसांचा असतो.
  • या जातीचे बछड्यांचे अंतर १.२५ ते १.५ वर्षे आहे.[]

वैशिष्ट्य

खेरीअर हा मुळात मशागतीचा गोवंश आहे. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी केला जातो. हे शांत, लहान आकाराचे, बलवान प्राणी आहेत, उष्णता आणि दुष्काळ सहन करतात आणि रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो. हे त्यांच्या डोंगराळ आणि लहरी हवामान असलेल्या मूळ प्रदेशांभोवती सापडतात.

'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[]. या गोवंशाची विशेष काळजी घेतल्यास हा चांगला 'दुधारू गोवंश' ठरू शकतो.

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Khariar". saveindiancows.org. 2021-12-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे