खिचडी
खाद्यपदार्थ
मुगाची खिचडी , हा भारतातील सर्वांच्या परिचयाचा असा रुचकर व पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. हा बनवायला तांदूळ, मूगडाळ, हळद आणि मीठ लागते. २:१ या प्रमाणात तांदूळ व् मूगडाळ घेऊन ते मिश्रण भाताप्रमाणे शिजवले जाते. लहान मुलांकरिता खिचडी आसट (जास्त पाणी घालून) करतात. खिचडी पचनास सोपी व पोटाला हलकी समजली जाते. म्हणून ती खास उपवासाला बनवली जाते.
खिचडीचा रुचकरपणा वाढवण्याकरिता आधी जिऱ्याची फोडणी करावी. तिच्यात आवडीप्रमाणे लसूण, मसाला, (वेलदोडे) ,लवंग, जायपत्री, कलमी दालचिनी, टाकावे त्यात चिमूटभर हळद टाकावी. फोडणी केलेल्या पातेल्यात तांदूळ-मुगडाळीचे मिश्रण टाकावे. मीठ टाकून भाताप्रमाणे शिजवावे. कालावधी १५ मिनिटे. गरम वाढावे.
सोबत विविध पदार्थ खाण्यास द्यावे जसे : पापड, लोणची, मोहरीची फोडणी, दूध, दही, ताक, लोणी, तूप,किंवा टोमॅटो/चिंच इत्यादीचे सार ,भजी.
संस्कृती व भाषा
भारतीय संस्कृतीत खिचडी हा साधारण पदार्थ समजला जातो. बहुधा साधे जेवण हवे असेल तेव्हा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करतात. पचायला सोपी असल्याने लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाथी खिचडी चांगला आहार समजली जाते.. खिचडी हा शब्द मराठी भाषेत अनपेक्षित घटकांच्या अथवा व्यक्तींच्या एकत्र येण्यास उपहासाने वापरला जातो.