खाकाबो राझी
खाकाबो राझी हे ५,८८१ मीटर उंची असलेले शिखर, आग्नेय आशियातील सर्वोच्च शिखर आहे. म्यानमार देशाच्या उत्तरेतील काचीन राज्यात चीनच्या सीमेजवळ हिमालय पर्वतप्रणालीच्या एका उपशृंखलेत ह्या शिखराचे स्थान आहे.
खाकाबो राझी शिखर हे खाकाबो राझी राष्ट्रीय उद्यानाने सर्व बाजूंनी वेढलेले आहे. हे उद्यान पूर्णतः पर्वतमय प्रदेशात वसलले आहे.
परिसर
शिखराच्या सभोवतालचा समुद्रसपाटीपासून २,४०० ते २,७०० मी. उंचीवरील भाग हा समशीतोष्ण प्रदेश असून ह्या परिसरात सदाहरित पर्जन्यवने आढळतात. अधिक उंचीवर ३,४०० मी. पर्यंत असलेल्या भागात पानगळी तसेच सूचिपर्णी झाडांची वने आहेत. ४,६०० मी.हून अधिक उंचीवर मुख्यतः हिमाच्छादित भूभाग आणि हिमनद्या आढळतात.
गिर्यारोहण
१९९३ पर्यंत परदेशी नागरिकांना ह्या परिसरात जाण्यास बंदी होती. १९९६ मध्ये जपानचे ताकाशी ओझाकी आणि म्यानमारचे न्यिमा ग्याल्त्सेन हे दोघेजण खाकाबो राझी शिखर चढून जाणारे पहिले गिर्यारोहक ठरले. दाट जंगलातून जात असल्यामुळे तसेच वाटेतील अनेक नद्यांवर पूल नसल्यामुळे शिखराच्या तळछावणीकडे जाणारा मार्ग अतिशय खडतर आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये म्यानमारच्या गिर्यारोहकांची शिखराच्या उत्तरेच्या बाजूवरून एक मोहीम निघाली. मोहिमेतील को औंग म्यिंट म्याट आणि को वाय यान मिन थु हे संघातील दोन गिर्यारोहक ३१ ऑगस्ट या दिवशी शिखरावर पोहोचले.
बाह्य दुवे
- इंग्रजी विकिपीडिया (इंग्लिश मजकूर)