खांडववन
खांडववन किंवा खांडवप्रस्थ हे महाभारतातील एक वन / जंगल होते जे कृष्ण आणि अर्जुनाने जाळले. इरावती कर्व्यांच्या युगांत पुस्तकात त्यांनी तीन हजार वर्षापूर्वीच्या महाभारताच्या एक युग संपून दुसरे युग सुरू होण्याच्या काळात कौरव आणि पांडवांचा मूलनिवासी नागांशी संघर्ष कसा सुरू झाला याचे वर्णन केले आहे. कृष्ण आणि अर्जुन त्यांच्या पत्न्या आणि सेवकांबरोबर त्यांच्या इंद्रप्रस्थ राजधानीच्या अवतीभोवतीच्या अरण्यात वनविहारासाठी गेले होते. कृष्ण आणि अर्जुन बसून गप्पा मारत असताना एक ब्राम्हण त्यांना अन्नाची भिक्षा मागत आला. त्यांनी रुकार दिल्यावर त्याने आपण अग्नी आहोत हे प्रगट केले, आणि सर्व प्राण्यां सकट खांडववन जाळून माझी भूक भागवा अशी मागणी केली. हे काम करण्यासाठी अग्नीने त्यांना एक विशेष रथ व आयुधे पुरवली. कृष्ण आणि अर्जुनांनी ते जंगल पेटवून दिले. नाखूष झालेला इंद्र आग विझवायचा विझवायचा प्रयत्न करत राहिला, पण कृष्णार्जुनांनी त्या वनाला पुन्हा पुन्हा आग लावली. खांडववनाभोवती फेऱ्या घालत राहून त्यांनी आगीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व प्राण्यांना पुन्हा पुन्हा आगीत हाकलले; केवळ सात जणांना जगू दिले, यांच्यातल्या मयाने नंतर त्यांच्यासाठी इंद्रप्रस्थातला पांडवांचा राजवाडा मयसभा बांधून दिला. सर्व प्राण्यांच्या चरबीचे भक्षण करत अग्नी संतुष्ट झाला. हे प्रकरण हा कृषीवल समाजाचा त्यांच्यासाठी आणखी आणखी भूमी उपलब्ध करून घ्यायला अरण्य आणि त्यात राहणारे मानव आणि प्राणी नष्ट करण्याच्या प्रयत्नाचे वर्णन आहे. या साठी कृषीवल समाजाचे धुरीण असणाऱ्या कृष्ण आणि अर्जुनांनी नागा आदिवासींची आणि वन्य पशूंची हत्या करून इंद्रप्रस्थ राजधानीच्या सभोवतालची जमीन आपल्या कब्जात आणली.