क्लायनोव्हिया (वनस्पती)
क्लायनोव्हिया हा एक वृक्ष आहे.
माहिती
मध्यम आकाराचा, ओबडधोबड खोड व फांद्या असणारा ४० ते ५० फुट उंचीचा सदाबहार असा हा क्लायनोव्हिया. यांच्या बुंध्याशी भरपूर फुटवा दिसतो, तसेच वर आलेल्या फांद्यासुद्धा भरपूर नवीन पालवी दिसते. बऱ्याच ठिकाणी असलेल्या गाठींमुळे व पसरलेल्या फांद्यांमुळे, वृक्षछाटणीनंतर वाढलेल्या सरळसोट खोडांमुळे, वृक्षाचे वेगवेगळे आघात सोसून उभे राहण्याची धडपड लक्षात येते. खोडाचा बराचसा भाग मऊ, सफेद व हलका असतो. त्यापासून अतिशय टिकाऊ असा दोरखंड बनवतात. काही ठिकाणी जुन्या खोडापासून सूऱ्या व टिकावाच्या मुठी बनवतात. याची पाने हृदयाकृती, थोडे भेंडीच्या पानासारखे असते. दोन्ही बाजू गुळगुळीत असतात. छोट्या गुलाबी फुलांचे गुच्छ झाडावर सगळीकडे दिसतात. पाच पाकळ्यांचे छोटे गुलाबी फुल गव्हाच्या दोन दाण्यांएवढे असते. याचे फळ पाच फुगीर बाजूंनी बनवलेले पोकळ, चक्राकार असते. दोन्ही हातांनी फळ फोडले तर फट् असा आवाज येतो. फुले बारा महिने येतात पण खरा बहर जुलै ते ऑगस्टपासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत असतो. याला क्लायनोव्हिया हे लॅटिन नाव क्लाईनहॉफ नावाच्या डच डॉक्टरवरून मिळाले, कारण हा डॉक्टर उदार व आतिथ्यशील होता, तसेच हे झाडही वेगवेगळ्या नेच्यांच्या, हिरवळीच्या जाती, साप, सरडे, पाली, मुंग्या व पोपट यांना आसरा देत असल्यामुळे हे विशेषनाम याला मिळाले असणार. मेकॉंग नदीकिनारी, मलाया बेट, जावा, सुमात्रा, श्रीलंका, पूर्व आफ्रिका व ऑस्ट्रेलियामध्ये याचे बरेच वृक्ष आहेत. साल व पाने यांचा काढा त्या देशांत उवा मारण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कोवळी पाने फिलिपाईन्समध्ये भाजीसाठी वापरली जातात.
संदर्भ
- वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक