Jump to content

कोफ्तगारी

एखाद्या विशिष्ट धातूवर त्याहून भिन्न अशा धातूच्या तारांच्या साहाय्याने कलात्मक आकारनिर्मिती करून वस्तूचे सुशोभन करण्याची कला म्हणजे कोफ्तगारी. कोफ्तगारीमध्ये विशेषतः लोखंड किंवा पोलाद या मूळ धातूंवर सोने अथवा चांदीच्या तारांनी अत्यंत कुशलतेने विविध आकृतिबंध उठवून वस्तू अलंकृत करण्यात येते. यातील मेळ इतका सुसंगत व सौंदर्यपूर्ण असतो, की ते दोन्ही धातू जणू एकजीव झाल्याचा भास निर्माण होतो आणि ती वस्तू अतिशयच खुलून दिसते.


या कलेची उत्पत्ती प्राचीन काळच्या लढवय्यांच्या अलंकृत हत्यार बाळगण्याच्या हौसेपासून झाली आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात खंजीर, कट्यार, ढाल, तलवार व म्यान यांसारख्या सैनिकी वस्तूंनाच शोभा आणण्याकडे या कलेचा उपयोग कारागीर करू लागले. परंतु पुढे पुढे बदलत्या परिस्थितीमुळे सैनिकी वस्तूंऐवजी सुरई, मंजूषा, थाळ्या, तबके, चाकू, अडकित्ते, कातऱ्या, फुलदाण्या, हुक्क्याच्या बैठकी आणि तत्सम शोभादायक वस्तूंचे अलंकरण करण्यासाठी देखील ही कला उपयोगात येऊ लागली.

दमास्कस हे कोफ्तगारीचे माहेरघर आहे. त्यामुळेच तिला इंग्रजीत दमास्कीनिंग म्हणतात. फार्सीमध्ये कोफ्त म्हणजे कुटलेला आणि गारी म्हणजे तार बसविण्याची कृती. यावरून तिला कोफ्तगारी असे नाव पडले. पुढे ती इराण-अफगाणिस्तानमधून भारतात प्रसार पावली. त्याकाळी ती जयपूर, अलवर, सियालकोट, त्रावणकोर, काश्मीर, बीदर इ. ठिकाणी चांगल्या प्रकारे जोपासली गेली. हत्तीचे अंकुश तलवार, ढाल इ. वस्तूंबरोबरच काही कारागिरांनी समारंभप्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या अन्य वस्तूंसाठीही कोफ्तगारीचा उपयोग सुरू केला. मुस्लिम कारागिरांनीकुराणातील वचने, काव्यपंक्ती किंवा शुभेच्छादर्शक वाक्ये उठविण्यात आपले कौशल्य प्रकट केले, तर त्रावणकोरमधील कारागिरांनी विविध फुलांचे आकृतिबंध व अन्य द्राविडी नीतिवचने आणि सांस्कृतिदर्शक चिन्हे उठविण्याचे कसब दाखविले.


कोफ्तगारीच्या निर्मितीकरिता प्रथम पाणी न दिलेल्या मऊ पोलादी वस्तूच्या पृष्ठभागावर पाणी दिलेल्या कडक पोलादाच्या अणकुचीदार हत्याराने खोलगट स्वरूपात हवा तो आकृतिबंध कोरून घेतात.नंतर खऱ्या व मुलायम सोन्याची तार त्या खाचांतून बसवितात. ती तार ठोकून ठोकून पृष्ठभागाशी घट्ट करतात. नंतर संपूर्ण वस्तूलाच उष्णता देतात व पुन्हा ठोकून ठोकून ती तार आणि पृष्ठभाग एकजीव करतात. यानंतर पृष्ठभागाला एका विशिष्ट आकाराच्या सच्छिद्र दगडाने घासून त्याला चकाकी व गुळगुळीतपणा आणतात. एखाद्या ठिकाणी सोन्याची तार विस्ताराने पसरवावयाची असल्यास तिला वारंवार व वेगाने ठोकून व घर्षण करून पसरट करावी लागते. कोफ्तगारीची ही सर्वसाधारण प्रक्रिया असली, तरी विविध भागांत विविध प्रकारांनी ती करण्यात येते.

तिच्या या विविध प्रक्रिया पद्धतीवरून चार-पाच प्रकार संभवतात.

  1. तेह-निशान : कोफ्तगारीचा हा प्रमुख प्रकार असून यात पुढीलप्रमाणे प्रक्रिया करण्यात येते. प्रथम पोलादी पृष्ठभागावर आकृतिबंध कोरतात. नंतर त्या खाचातून चांदी अथवा सोन्याची जाडशी तार ठोकून ठोकून बसवितात. ती बसविताना पोलादी पृष्ठभाग तापलेला असतो. तो थंड झाल्यावर कानसीने घासून नीट स्वच्छ व गुळगुळीत करण्यात येतो. पृष्ठभागावर कोणत्याही रसायनाचा वापर न करता उष्णता देऊनच तो काळवंडण्यात येतो.
  2. गंगा-यमुना : या प्रकारात करण्यात येणारी प्रक्रिया वरील प्रमाणेच असून त्यात फक्त चांदी व सोने यांच्या तारांची विशिष्ट प्रकारे मांडणी करण्यात येते. त्यामुळे एकमेकांत मिसळणाऱ्या पण परस्परांपासून वेगळ्या दिसणाऱ्या रूपेरी व सोनेरी अशा दोन छटा पृष्ठभागांवर उठून दिसतात. यात सोन्याची पिवळी धमक छटा किंचित तांबूस करण्यासाठी त्यात थोडेसे तांबे मिसळण्यात येते.
  3. खोलगट कोफ्तगारी : यातील खोबण कानसीच्या साहाय्याने विशेष खोलगट स्वरूपाची करून तिच्यामधील तार खूप खोलगट आणि घट्ट बसविण्यात येते. ती तार सोने अथवा चांदी यांपैकी कोणत्याही धातूची असून ती अत्यंत बारीक असते. ती अतिशय खोल अशा चरीमध्ये बसविण्यात आल्यामुळे तिचा पृष्ठभाग घासूनपुसून खूप तुकतुकीत करता येत नाही.
  4. देवली काम : याला कोफ्तगारीचे नकली काम म्हण्यात येते. हे काम ज्या वस्तूवर करण्यात येते त्या वस्तूचा पृष्ठभाग प्रथम कानसाने व नंतर हलक्या जातीच्या दगडाने घासून मऊ आणि सपाट करण्यात येतो. नंतर त्यावर हवा तो आकृतिबंध एका विशिष्ट प्रकारच्या लेखणीने कोरून त्यावर चुन्याची निवळी शिंपडण्यात येते. त्यामुळे पृष्ठभाग स्वच्छ होतो. नंतर पृष्ठभागाला उष्णता देऊन तो तापविण्यात येतो व त्या अवस्थेतच त्यावर सोन्याचे पत्रे ठोकून ठोकून घट्ट करण्यात येतात. ती आकृतिबंधामध्ये घट्ट बसली की मग मोरी दगडाने घासून पत्र्यांच्या कडा कोरलेल्या खाचांमध्ये घट्ट बसवितात.

संदर्भ

  1. https://vishwakosh.marathi.gov.in/21249/