Jump to content

कोन्याक

कोन्याक जमातीतील पुरुष
कोन्याक जमातीतील उत्सवादरम्यानची एक टोपली

कोन्याक नाग ही भारताच्या आसाममधील पूर्वोत्तर भागात आढळणारी एक आदिवासी जमात आहे. नागा जमातीच्या अनेक गटांपैकी एका गटाला कोन्यॅक म्हणतात. १९६१ च्या खानेसुमारीनुसार त्यांची लोकसंख्या ६३,००० होती. ब्रह्मपुत्रेचे खोरे आणि पातकई पर्वताच्या रांगा यांमध्ये त्यांची वस्ती प्रामुख्याने आढळते.

राहणीमान व चालीरीती

त्यांचे राहणीमान व चालीरीती प्राधान्याने अंगामी नागांसारख्याच आहेत. याचे थेंडू आणि थेंकोह असे दोन उपगट आहेत. थेंडू गटातील लोक चेहऱ्यावर गोंदतात. या गटाचे पुढारी फक्त अंग कुळीतील असून, ते डोक्याचे केस वाढवून मागच्या बाजूच अंबाडा बांधतात. थेंकोह गटातील लोक फक्त छातीवर व हातावर गोंदतात. डोक्याचे केस कापतात. मात्र यांचे पुढारी अंग कुळीव्यतिरिक्त कोणत्याही कुळीचे असतात. गावपंचायतीचा पुढारी अंग कुळीचाच असून हा अधिकार वंशपरंपरागत असतो.

विवाहादी परंपरा

कोन्यॅक जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे यांची युवागृहे होत. त्यांना मोरुंग म्हणतात. ही अत्यंत संघटित स्वरूपाची मंडळे असल्याने त्यांचे स्वतंत्र नियम असतात आणि ते कटाक्षाने पाळले जातात. ही युवागृहे खेळनिदर्शिक म्हणजेच वस्तिनिदर्शक असतात. लहान वस्तीसाठी एक व मोठ्या वस्तीसाठी ४-५ युवागृहे असतात. त्याचे सदस्यत्व ४-५ वर्षाच्या मुलामुलींपासून ते तहत विधुर आणि विधवा यांच्यापर्यंत देण्यात येते. विवाहबद्ध होईपर्यंत सदस्यत्व चालू राहते. यांच्यात दीक्षाविधी झालेल्या मुलामुलींना प्रवेश द्यावा, असे बंधन आहे. मोरुंग गावच्या प्रवेशस्थानीच उंचावर बांधलेले असून त्याच्या आतील बाजूस पुरुषांचे नृत्य चालते व तेथेच सण-उत्सवप्रसंगी वाजविले जाणारे १५–२० फूटी प्रचंड ढोल ठेवलेले असतात.

प्रत्येक मोरुंगमध्ये यो नावाचे स्वतंत्र युवतिगृह असते आणि ते दुसऱ्याच वस्तीच्या मोरुंगमधील युवकांनीच बांधावयाचे असून, त्या युवकांनाच फक्त त्यातील मुलींकडे जाण्यास परवानगी असते. अशा व्यवस्थेमुळे कुळीकुळीतील मुलामुलींची मैत्री होऊन अखेर लग्न जुळविले जाते.

मृताला आओ जमातीप्रमाणे पुरतात, त्यापूर्वी त्यास चटईत घालून मंदाग्नीवर काही दिवस ठेवतात. काही दिवसांनी मृताची कवटी बाहेर पडली, की ती गावाजवळच पण बाहेरच्या बाजूला गाडग्यात घालून दगडाआड ठेवतात. पुढाऱ्याचा मृत देह पवित्र मानतात व तो झाडावर न ठेवता नक्षीकाम केलेल्या फरशीवर ठेवतात.

संदर्भ

  • Furer-Haimendorf, C. Von, The Naked Nagas, Calcutta, 1962.
  • मराठी विश्वकोश
  • http://mr.vikaspedia.in/