कोथिंबीर लागवड
प्रस्तावना
कोथिंबीरीचा वापर हा घरात, हॉटेलमध्ये, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीरीची लागवड ही प्रामुख्यारने पावसाळी (खरीप) व हिवाळी (रब्बी) हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरचे उत्पन्न कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करतात.
जमीन
कोथिंबीरीच्या लागवडीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते. परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथिंबीर लागवड करू शकतो.
हवामान
तसे पाहता कोथिंबीरीची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकतो परंतु अति पाऊस किंवा अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हवी तशी होत नाही.
आधी सांगितल्या प्रमाणे उन्हाळ्यात कोथिंबीरीची वाढ कमी असते पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो त्यामुळे पाण्याची उपलब्दता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येतो.
लागवड पद्धुत
- कोथिंबीरीची लागवड करण्याआधी जमीन नांगरून व कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत एकरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
- त्यानंतर ३×२ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. आपण ह्या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल ह्याची काळजी घ्यावी.
- बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफयामध्ये १५ से.मी. अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरु शकतो.
- उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणी आधीच वाफे भिजवा आणि मग वाफसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी.
- कोथिंबीर लागवडीसाठी एकरी २५ ते ३५ किलो बियाणे लागते.
- लागवडी आधी धने हळुवार रगडुन फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे. तसेच पेरणीपुर्वी धण्याचे बी भिजऊन मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे. त्यातमुळे उगवण ८ ते १० दिवसात होते व कोथिंबीरीच्या उत्पादनात वाढ होते. त्याचसोबत काढणी देखील लवकर होते.
सुधारित जाती
व्ही 1, व्ही 2, को-१, डी-९२, डी-९४, जे २१४, के ४५, कोइमतूर-१, कोइमतूर-२, लाम सी.एस.- २, लाम सी.एस.- ४ स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या कोथिंबीरीच्या, स्थासनिक आणि सुधारित जाती लागवडीसाठी वापरली जातात.
खत व पाणी व्यवस्थापन
कोथिंबीर लागवडी आधी जमिनीत एकरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. बी उगवल्यानंतर २० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे. त्याचसोबत २५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करू शकतो ज्यामुळे कोथिंबीरीची वाढ चांगली होते.
कोथिंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये दर ५ दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये ८-१० दिवसांनी पाणी द्यावे.
किड व रोग व्यवस्थापन
कोथिंबीर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. कधी कधी मर, भुरी या रोगांचा प्रार्दूभाव दिसतो. अशावेळी शिफारसीनुसार भुर रोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकतो तसेच पाण्यानत विरघळणारे गंधक वापरावे.
काढणी व उत्पादन
पेरणी नंतर ३५ ते ४० दिवसानी कोथिंबीर १५ ते २० से.मी. उंचीची होते त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. पेरणीच्या २ महिन्यांनंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरुवात होते त्यामुळे त्या आधीच काढणी करणे महत्त्वाचे आहे.
पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे एकरी 10 ते 15 टन उत्पादन मिळते तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन 6 ते 8 टन मिळते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. "कोथिंबीर". http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=3572edbc-f79b-4049-8192-f9f7a6317b38. 22 जून 2019 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- http://shetiaanishetkari.in/pikvyavsthapan/kothimbir.html Archived 2019-06-22 at the Wayback Machine.