Jump to content

केनोपनिषद

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


केन उपनिषद हे दहा उपनिषदांपैकी द्वितीय क्रमांकाचे उपनिषद आहे. श्रीमद् आदि शंकराचार्यांनी या उपनिषदावर भाष्य लिहिलेले असल्याने तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हे उपनिषद महत्त्वाचे मानले जाते.

केन उपनिषद हे सामवेदाच्या ‘तलवकार’ शाखेचे उपनिषद आहे व ते जैमिनीय उपनिषत् ब्राह्मण ग्रंथांचा भाग म्हणून उपलब्ध आहे.  म्हणून शंकराचार्यांनी या उपनिषदाला ‘तलवकार’ उपनिषद म्हणले आहे. सामवेदाच्या तलवकार शाखेचा केन उपनिषद वगळता कोणताही ग्रंथ आज उपलब्ध नाही. त्यामुळे सामवेदातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा हे उपनिषद महत्त्वपूर्ण आहे.

केन उपनिषदाला ‘ब्राह्मी उपनिषद’ असे वैकल्पिक नाव सुद्धा या उपनिषदात सांगितलेले आहे. ‘तप,दान आणि कर्म’ हा या उपनिषदाचा आधार आहे असे सांगितलेले आहे.

केन उपनिषदाची रचना :

केन उपनिषदाची सुरुवात ‘केन’ या शब्दाने होते. म्हणूनच या उपनिषदाला केन हे नाव मिळाले आहे. हे उपनिषद गद्य-पद्य मिश्रित आहे. गुरुशिष्यांच्या प्रश्नोत्तररुपी संवादातून या उपनिषदाची निर्मिती झाली आहे.

केन उपनिषदात एकूण ‘३५’ मंत्र असून ते चार खंडांमध्ये विभागलेले आहेत. त्याचे विभाजन पुढीलप्रमाणे-

प्रथम खंड – ९ मंत्र

द्वितीय खंड – ५ मंत्र

तृतीय खंड – १२ मंत्र

चतुर्थ खंड – ९ मंत्र

या चार खंडांपैकी पहिले दोन खंड हे पद्यात्मक असून शेवटचे दोन खंड हे गद्यात्मक आहेत.

केन उपनिषद शांतिमंत्र :

केन उपनिषदातील शांतिमंत्र असा आहे –

ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षु:,

श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणिच ।

सर्वाणि सर्वं ब्रह्मौपनिषदं माsहं ब्रह्म निराकुर्याम् ।

मा मा ब्रह्म निराकरोदनिराकरणमस्त्व निराकरणम् ।।

मेsस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु ।

धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ।।

।। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।।

याचा अर्थ माझे सर्व अवयव, वाणी,प्राण,डोळे,कान, ब्रह्मविद्येच्या अभ्यासाला समर्थ होवोत. इंद्रिये बलवान होवोत. उपनिषदातील ब्रह्मज्ञान मला प्राप्त होवो. माझे ज्ञान अखंड असो. उपनिषत् – धर्म माझ्यात एकरूप होऊन माझा ताप-त्रय नष्ट होवो. या शांतिमंत्रानंतर केन उपनिषदातील मुख्य विवेचनाला सुरुवात होते.[]

केन उपनिषद प्रथम खंड :

या खंडात ९ मंत्र समाविष्ट आहेत. या खंडात ब्रह्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे. खंडाची सुरुवात शिष्याच्या प्रश्नाने होते. शिष्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून आचार्य ब्रह्माचे स्वरूप स्पष्ट करतात. ब्रह्म म्हणजे जिच्यापर्यंत मन,वाचा,चक्षू पोहोचू शकत नाही अशी शक्ती होय.ज्या शक्तीची उपासना सगुण रूपात केली जात नाही अशी शक्ती म्हणजे ब्रह्म होय असे विवेचन या खंडात केले आहे

केन उपनिषद द्वितीय खंड :

या खंडात ५ मंत्र समाविष्ट आहेत. या खंडात व्यक्तीला ब्रह्मज्ञान झाले की नाही हे ओळखण्याचे निकष सांगितले आहेत.

केन उपनिषद तृतीय खंड :

या खंडात एकूण १२ मंत्र समाविष्ट आहेत. या खंडात ब्रह्माचे सामर्थ्य विशद करण्यासाठी उमा हैमवतीची आख्यायिका सांगितलेली आहे. या कथेनुसार देव-दानवांच्या युद्धात देवांचा विजय झाल्यामुळे देवांना  आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा गर्व होतो. त्यांचे गर्वहरण करण्यासाठी ब्रह्मशक्ती उमाहैमवतीचे रूप घेऊन अवतरते व देवांना ब्रह्मतत्त्व सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव करून देते.

केन उपनिषद चतुर्थ खंड :

या खंडात ९ मंत्र समाविष्ट आहेत. या खंडामध्ये उमाहैमवती देवांना ब्रह्मतत्त्वाचे श्रेष्ठत्व विशद करून सांगते. तसेच उपनिषदाचा समारोप करताना जो हे उपनिषद व ब्रह्मविद्या जाणतो तो अनंतकाल स्वर्गात सुखात राहतो असे सांगितले आहे.

केनोपनिषदातील ब्रह्मज्ञानाचे आकलन :

या उपनिषदाच्या द्वितीय खंडात ब्रह्मज्ञान झाले अथवा नाही हे ओळखण्याचे निकष सांगितले आहेत.  या उपनिषदात म्हणलेले आहे की जर ज्ञान झाले नाही असे वाटले तर ज्ञान झाले असे समज. यालाच ब्रह्मज्ञान असे म्हणता येईल जे समजण्याच्या पलीकडचे असते.

केन उपनिषदातील सर्वसाधारण तत्त्वज्ञान :

जगदुत्पत्तीचे रहस्य कथन करणारे हे उपनिषद आहे. या उपनिषदाच्या पहिल्या दोन खंडांमध्ये आत्म्याचे अस्तित्व तर्काने सिद्ध केले असून अंतिम दोन खंडांमध्ये जगाचे आद्य मूळ आत्मा आहे असे सिद्ध केले आहे. निसर्गातील प्रत्येक घटनेमागे आणि मानवी हालचालीमागे ब्रह्माची शक्ती असते हा या उपनिषदाचा मूलभूत सिद्धांत आहे. कथेच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगणे हे उपनिषदांचे वैशिष्ट्य असून ते या उपनिषदालाही लागू होते. या उपनिषदात प्रामुख्याने ‘अग्नी’, ‘वायू’, ‘इंद्र’ आणि ‘उमा हैमवती’ या चार देवतांचा उल्लेख आढळतो. एक वैशिष्ट्य म्हणजे उमा हैमवती या देवतेचा उल्लेख केनोपनिषद वगळता कुठल्याही वैदिक साहित्यात आढळत नाही. तसेच यात वर्णन केलेला इंद्र हा ऋग्वेदातील महापराक्रमी इंद्र नसून ब्रह्मशक्तीपुढे हतबल झालेला इंद्र आहे.

केन उपनिषदावरील समीक्षाग्रंथ :

आदि शंकराचार्यांनी केनोपनिषदावर दोन टीकाग्रंथ लिहिले आहेत. एका ग्रंथाचे नाव केनोपनिषद-पदभाष्य व दुसऱ्या ग्रंथाचे नाव केनोपनिषद-वाक्यभाष्य असे आहे. एकोणिसाव्या शतकात विंडश्मन आणि काही विद्वानांनी केनोपनिषदाचे जर्मन भाषांतर प्रसिद्ध केले.

डेव्हिड स्टोल या संगीतकाराने केनोपनिषदातील शांतिमंत्रावरून प्रेरित होऊन Sonata for 2 Pianosची निर्मिती केली.

  1. ^ उपनिषदांचे मराठी भाषांतर – सिद्धेश्वरशास्त्री चित्राव