के.के. वाघ
के.के. ऊर्फ कर्मवीर काकासाहेब वाघ (जन्म : २६ ऑक्टोबर १८९८; - नाशिक, २२ जुलै १९७३) हे एक राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते.
कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे व्यक्तिमत्त्व
काकासाहेबांची देहयष्टी सहा फूट उंच होती. भरदार छाती व आवाजात जरब असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे प्रभावशाली होते. आवाज पहाडी होता. बहुजन समाजावरअन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काका आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत. शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्ष शिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या रागलोभाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील, तुम्हाला न भिता बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा, असे त्यांचे रोखठोक मत होते. पक्ष हे त्यांचे साध्य नसून साधन होते. त्यामुळे काकांनी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, पुन्हा काँग्रेस व भारतीय क्रांती दल असे प्रसंगानुरूप पक्षांतर केले. त्यापायी त्यांना अनेक वेळा अपयशही पत्करावे लागले, तरीसुद्धा काकांनी स्वतःच्या हिंमतीवर, कर्तबगारीने जनसेवा केलीच; सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी राजकीय पक्ष व सत्ता गौण मानून सहकार, शिक्षण शेती व बहुजनांच्या विकासासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले.
बांधकाम व्यवसाय
काकांचे कुटुंब तसे मोठे. वडिलांचे कृपाछत्र त्यांना दीर्घकाळ लाभले. काकांचा विवाह १४ व्या वर्षीच झाला. काका मॅट्रिक पास झाले. पुढील शिक्षण न घेता त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचा धंदा सुरू केला त्यांच्यामध्ये धंद्यामध्ये चिकाटी असल्यामुळे त्यांनी धंद्यात जम बसविला. या कामात काकांना भरपूर पैसाही मिळाला. बांधकाम खात्याच्या नियमांचा अभ्यास करून सरकारी कामाचा दर्जा उत्तम राखून एक नवा नावलौकिक मिळवला. कामाच्या गुणवत्तेबाबत आपल्या व्यवसायात त्यांनी कधीच तडजोड केली नाही.
एक रुपया किंमतीची नाशिक नगरपालिकेची इमारत
१९३५ साली नाशिक नगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन १९३७ मध्ये त्यांनी ते पूर्ण केले. अंदाजपत्र व करारनाम्यात डी-वॉटरिंगचा स्पष्ट उल्लेख नसल्याने काकांना या कामात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. तशाही परिस्थीतीत त्यांनी काम पूर्ण केले. परंतु, नगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी काकांच्या बिलाबद्दल दंडात्मक कारवाईचा वापर करून पूर्ण इमारतीच्या बांधकामाच्या बिलापेक्षाही ज्यादा दंडाची आकारणी केली.
एकाही नगरसेवकाने काकांच्या आर्थिक नुकसानाची पर्वा केली नाही. अशा बिकट परिस्थितीत सुद्धा काकांनी स्वतःचा बाणेदारपणा सोडला नाही. भरसभेत त्यांनी एकच विनंती केली. इमारतीचा एकूण खर्च एक रुपया दाखवावा व तसा उल्लेख इमारतीवर करावा व त्यानुसार एक रुपयाच्या व्हाऊचरवर काकांनी सही करून दिली. आजही नाशिकच्या मेनरोडवरील नगरपालिकेच्या इमारतीवर काकांचे नाव व इमारतीची किंमत एक रुपया लिहिलेली आहे.
सामाजिक चळवळी
- १९४८ मध्ये त्यावेळीच्या मुंबई सरकारने नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी भातास कमी भाव व गुजरातमधील भातास जास्त भाव, अशी भेदभावपूर्ण वागणूक शेतकऱ्यांना दिली. त्यावेळी काकासाहेबांनी भातलढ्यासाठी संग्राम, सत्याग्रह आणि असहकार पुकारला. त्यावेळचे मुंबई राज्याचे मंत्री मुरारजीभाई देसाई यांना नमवून सर्वांना समान भाव देण्यास भाग पाडले. परिणामी काकासाहेबांना सहा जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले.
२. चांदवड तालुक्यातील केंद्राई धरणाचे पाणी खडकमाळे गावाला मिळवून देण्यासाठी तत्कालीन जहागिरदार व हितसंबंधी लोकाविरुद्ध जंग लढून काकांनी खडकमाळे गावास पाणी मिळवून दिले.
३. काकासाहेबांनी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रयत्नाने व जिद्दीने उपसा जलसिंचन योजना मंजूुर करून घेतली. सोनगावच्या शेतकऱ्यांनी काकांच्या श्रमाची पावती म्हणून त्या योजनेस कर्मवीर काकासाहेब वाघ उपसा जलसिंचन योजना असे नाव दिले.
४. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा, त्यांच्या उसाची योग्य व्यवस्था लागून देशात साखर उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने त्यांनी रानवड, नाशिक व कादवा सहकारी साखर कारखान्यास केंद्र शासनाकडून मंजूरी मिळवून दिली.
५. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारतर्फे स्पेशल केस म्हणून निफाड सहकारी साखर कारखान्याचा त्यांनी विस्तार करवला.
६. महाराष्ट्रातल्या लेव्ही साखरेस वाजवी भाव मिळवून दिला. काकासाहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताआड येणारी कुठलीच गोष्ट खपवून घेतली नाही.
७. सहकारी साखर कारखानदारी नावारूपास आणली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची भारतामध्ये शान वाढवली. साखर कारखानदारी क्षेत्रातल्या त्यांच्या विलक्षण कर्तृत्वाने, खंबीर नेतृत्वाने सहकारी साखर कारखान्यांचा मार्गदर्शक म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली.
८. नाशिक जिल्हा साखर कारखानदारीत मागे पडू नये यासाठी हा लोकद्रष्टा नेता आयुष्यभर संघर्षाचे कडू घोट पचवत जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच जगला.
कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्यावरील पुस्तके
- पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ (चरित्र) लेखक : डॉ. राहुल पाटील
- कर्मवीर काकासाहेब वाघ काल व कार्य लेखक : डॉ. सुधीर फडके
- जीवनवेध संपादक : डॉ. स्नेहल तावरे व डॉ. शिरीष लांडगे