Jump to content

कृष्णराव शितोळे


राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे देशमुख (३० ऑक्टोबर, इ.स. १९२३; ग्वाल्हेर - इ.स. २०११; पुणे) हे ग्वाल्हेरच्या शितोळे घराण्यात जन्मलेले जहागीरदार सरदार, देशमुख होते. शितोळे देशमुखांचा भव्य व अभेद्य वाडा पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ३५ कि.मी. अंतरावर पाटस या गावी आहे. या वाड्याचे बांधकाम इ. स. १७३० ते १७६० या दरम्यान म्हणजे सरदार महादजी शिंद्यांच्या कारकिर्दीत झाल्याचे सांगितले जाते. गावाच्या वेशीतून आत प्रवेश केल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर हा पूर्वाभिमुख भव्य वाडा आहे.

राजराजेंद्र सरदार मालोजीराव ऊर्फ बाळासाहेब नरसिंहराव शितोळे देशमुख त्यांचे वडील होते. त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातल्या पोहरी येथील राजे होते. शितोळे घराण्याकडे महाराष्ट्रातील पुणे, सांगवी( पिंपरी- चिंचवड), मावळ, पुरंदर, वानवडी, हडपसर, मांजरी, मोशी, लवळे, कासारसाई,पाषाण अशी पुणे परिसरातल्या सुमारे साडेतीनशे गावांची जहागिरी होती. याव्यतिरिक्त मध्य प्रदेश व हरियाणा या प्रांतांतील हुशंगाबाद, सहजाबाद, खांडवा, पानिपत व सोनपत या गावांच्या क्षेत्रांत त्यांची जहागिरी पसरलेली होती.

सरदार शितोळे देशमुख यांचे प्राथमिक शालेय शिक्षण ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील सरदारांसाठी असलेल्या सिंदिया शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नैनिताल येथे गेले. त्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजीचे अध्ययन केले. युद्धकला आणि शस्त्रविद्येत ते प्रवीण होते.

कृष्णराव शितोळ्यांना सिधोजीराजे व प्रल्हादराजे हे दोन पुत्र आणि यशोधराराजे व हेमांगनाराजे या दोन विवाहित कन्या आहेत. कृष्णरावांच्या भगिनी सुशीलादेवी (३० जानेवारी, इ.स. १९१६ - ३१ मार्च, इ.स. २०११) या कर्नाटकातील सोंडूर संस्थानच्या राजमाता होत्या. त्यांचे लग्न सोंडूर संस्थानाचे अधिपती महाराज यशवंतराव घोरपडे यांच्याशी झाले होते.