कृ.पां. गोडबोले
कृष्णशास्त्री पांडुरंगशास्त्री गोडबोले (१ सप्टेंबर, १८३१:वाई, महाराष्ट्र - २२ नोव्हेंबर, १८८६) हे मराठी भाषेत व्याकरण, गणित, ज्योतिषशास्त्र या विषयांचे लेखक होते. सिंध प्रांतात असताना त्यांनी सिंधी, अरबी, फारसी या भाषांचा अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठात ते सिंधी भाषेचे परीक्षक होते.
गोडबोले यांनी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष, व्याकरण या शास्त्रांबरोबरच इंग्रजी विद्याही आत्मसात केली. मुंबईच्या नॉर्मल स्कूलमध्ये ते गणिताचे शिक्षक म्हणून लागले, आणि मुंबईच्या ॲंग्लो मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नोकरी सांभाळून त्यांनी मराठीत विपुल साहित्य निर्मिती केली.
कृष्णशास्त्री यांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे, ‘मराठी भाषेचे नवीन व्याकरण' हे होय. ऐतिहासिक दृष्टी, स्वतंत्र विचारसरणी, अनेक भाषांचा तुलनात्मक विचार, वाक्यविचार, व्युत्पत्ती विचार आदींमुळे त्यांचा हा व्याकरण ग्रंथ मोलाचा ठरला आहे.
पुस्तके
- ऑटिक्विटी ऑफ द वेदाज (ह्या ग्रंथातून त्यांनी ज्योतिष गणिताचा वापर करून भगवद्गीतेचा काळ, तिच्यांतील श्लोकांच्या आधारावर इ.स.पू. ३०,००० असल्याचा दावा केला.)
- चेंबर्सच्या इंग्रजी पुस्तकाधारे ज्योतिषशास्त्र
- जॉन हटनच्या इंग्रजी पुस्तकाचे 'बीजगणिताची मूलतत्त्वे' या नावाचे मराठी भाषांतर
- मराठी भाषेचे नवीन व्याकरण
- युक्लिडच्या भूमितीच्या पुस्तकांचेही मराठी भाषांतर
- सिंधी भाषेचे निरूपण
- सिंधी भाषेतील अंकगणित