कुरतडणारे प्राणी
कुरतडणारे प्राणी म्हणजेच कृंतक पशू हे सस्तन पशू आहेत. ससे, उंदीर, घुशी, खारी, सायाळ, बीव्हर वगैरे पशू कुरतडणारे प्राणी म्हणून ओळखले जातात.
या प्राण्यांच्या तोंडात कातरे दात असतात. हे दात विशेष बळकट, लांबट आणि धारदार असतात. उंदीर, घुशींना दोन कातरे दात वर आणि दोन कातरे दात खाली असे चार कातरे दात असतात तर सशाला चार कातरे दात वर आणि दोन कातरे दात खाली असे सहा कातरे दात असतात. सशाच्या वरच्या चार दातांपैकी दोन मोठे दात पुढे आणि दोन लहान दात मागे असतात. सतत कठीण वस्तु कातरल्यामुळे यांचे दात झिजतात पण लवकर वाढतातही आणि त्यांची धार कायम राहते. या पशूंना सुळे दात नसतात, तेथे मोकळी जागा म्हणजे खिंडारे असतात. त्याला लागून गालाच्या आतल्या बाजुने देखील केस असतात. चावतांना दोन्ही ओठ आतल्या बाजुने ओढले जाऊन तेथे एक केसाळ चाळण तयार होते. त्या चाळणीतून अन्नाचे फक्त लहान तुकडेच आत जाऊ शकतात.
या श्रेणीतील काही प्राणी झाडांवर राहतात तर बहुतेक मंडळी जमिनीखाली बिळे तयार करून राहतात. शीत, उष्ण, सौम्य वगैरे सर्व प्रकारच्या वातावरणात कुरतडणारे प्राणी राहू शकतात. अंटार्क्टिका खंड सोडून जगभर सर्वत्र कुरतडणारे प्राणी आढळतात. काही कृंतक हिमनिद्रा काळात त्यांच्या परिसरातच राहून हिमनिद्रा घेतात तर काही स्थलांतर करून अन्यत्र जातात आणि हिमनिद्रा घेत नाहीत.
कृंतक प्राण्यांमध्ये इतरांवर चढाई करण्याचे सामर्थ्य नसते, स्वसंरक्षणार्थही हे चढाई करत नाहीत तर पलायन करतात. या पशूंना शत्रू पुष्कळ आहेत. त्यामुळे या श्रेणीतील प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो पण यांना संतती पुष्कळ होत असल्याने ही मंडळी होणाऱ्या संहाराला पुरून उरतात. सस्तन प्राण्यातील साधारण ४० टक्के संख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांची असते.
अनेक कृंतक पशू मनुष्य वस्तीजवळच राहत असल्याने ते सहजपणे धान्य, फळे, बिया, मोठ्या प्रमाणात मिळवून फस्त करतात तसेच त्यांच्या बिळांमध्ये साठवूनही ठेवतात. यांच्यामुळे अनेक प्रकारचे रोग सहजपणे पसरतात.
कृंतक श्रेणीतील विविध कूल
- शशाद्य (Leporidae)
- मूषकाद्य (Muridae)
- कीचघूषाद्य (Rhizomyidae)
- शायिकाद्य (Sciuridae)
- शशुंदराद्य (Ochotonidae)
- शलींदराद्य (Hystricidae)
- बीव्हराद्य (Castoridae)
- चिंचिलाद्य (Chinchillidae)
- मंदमूषकाद्य (Muscardinidae)