कुद्रेमनी साहित्य संमेलन
- श्री बलभीम साहित्य संघ आणि कुद्रेमनी ग्रामस्थ यांच्यातर्फे १२वे कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन कुद्रेमनी येथे ७ जानेवारी २०१७ रोजी झाले.
- श्री बलभीम साहित्य संघ आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थांतर्फे कुद्रेमनी येथे १३वे कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष जयसिंगपूरचे निवृत्त प्राध्यापक मोहन पाटील होते. हे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ३०वे संमेलन होते.
बातमी
दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांचे ३०वे संमेलन २३ डिसेंबर २०१८ रोजी कुद्रेमानीत झाले. यापूर्वी तेथे दमसाचे सन २०१०मध्ये २०वे संमेलन झाले होते. बलभीम साहित्य संघाच्यावतीने हा साहित्याचा जागर झाला.
संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन पाटील होते. त्यांनी भाषा आणि अनुवाद याविषयी मांडलेले विचार साहित्य अभ्यासकांना विचार करणारे ठरले. सीमाप्रश्न हा माणसांचा विषय आहे. तो भाषेचा विषय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सीमाप्रश्नाविषयी साहित्य निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली.
जातीच्या परिघाभोवती फिरणारे मराठी साहित्य आणि वास्तवता राजन खान यांनी अधोरेखीत केले. जाती-धर्माच्या वर्तुळाने साहित्याचे नुकसान झाले. खुजे झाल्याची जळजळीत टीका केली. सीमाभागात खरी मराठी पहावयास मिळते. बेळगावच्या बोलीभाषेत साहित्यनिर्मितीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आसाराम लोमटे आणि नवनाथ गोरे यांची मुलाखत महत्त्वाची ठरली. सीमाभागात होणाऱ्या संमेलनामध्ये करमणुकीच्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येते. याचा लाभ होतकरू लेखक, युवकांना होत नाही. यादृष्टीने दोन मुलाखतींची मेजवानी रसिकांना मिळाली.
मराठी साहित्यात गंभीरपणे लिहिणाऱ्यांमध्ये आसाराम लोमटे यांचा समावेश केला जातो. त्यांनी मुलाखतीतून मांडलेले विचार साहित्याकडे गंभीरपणे पाहणाऱ्यांना मार्गदर्शन ठरले. नवनाथ गोरे यांनी आयुष्याचे ‘फेसाटी’चे ‘सुंबरान’ मुलाखतीतून मांडले. शेवटच्या सत्रातून वारकरी संप्रदायाबाबत मूलभूत विचार मांडत मराठीला मरण नसल्याचे प्रतिपादन शामसुंदर सोन्नर यांनी केले. सीमावासीयांची परिस्थिती मायलेकरांची ताटातूट झाल्यासारखी असल्याचे सांगितले. कवि संमेलनात दर्जेदार कविता सादर झाल्या. मधूसुदन नानिवडेकर, सुनंदा शेळके, नारायण पुरी, रमजान मुल्ला व डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी काव्यरसिकांना खिळवून ठेवले. कथाकथनातून रसिकांचे मनोरंजन झाले. अस्सल साहित्याची मेजवानी रसिकांना मिळाली.
पहा : साहित्य संमेलने