कुंभ (तारकासमूह)
तारकासमूह | |
कुंभ मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Aqr |
---|---|
प्रतीक | the Water-Bearer |
विषुवांश | २०h ३८m १९.१७०६s |
क्रांती | ०३.३२५६६७६°–−२४.०९४०४१३°[१] |
क्षेत्रफळ | ९८० चौ. अंश. (१०वा) |
मुख्य तारे | १०, २२ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ९७ |
ग्रह असणारे तारे | १२ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | २ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ७ |
सर्वात तेजस्वी तारा | β ॲक्वॅरी (सादलसूद) (२.९१m) |
सर्वात जवळील तारा | EZ Aqr (११.२७ ly, ३.४५ pc) |
मेसिए वस्तू | ३ |
उल्का वर्षाव | मार्च ॲक्वॅरिड्स ईटा ॲक्वॅरिड्स डेल्टा ॲक्वॅरिड्स आयोटा ॲक्वॅरिड्स |
शेजारील तारकासमूह | मीन महाश्व अश्वमुख धनिष्ठा गरूड मकर दक्षिण मस्त्य शिल्पकार तिमिंगल |
+६५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. ऑक्टोबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
कुंभ हा एक तारकासमूह आणि राशीचक्रातील एक रास आहे. कुंभ मकर आणि मीन यांच्या मध्ये आहे. याला इंग्रजीमध्ये Aquarius (अॅक्वॅरियस) म्हणतात. अॅक्वॅरियस या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ "पाणी वाहक" किंवा "कुंभ वाहक" आहे. कुंभ घेऊन उभा असलेला माणूस हे या राशीचे प्रतीक आहे. त्याचे चिन्ह (युनिकोड ♒) आहे जे पाण्याचे प्रतीक आहे.
कुंभ तारकासमूह क्रांतिवृत्तावरील ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या तारकासमूहांपैकी एक आहे.[2] इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता.
प्राचीन संस्कृतींमध्ये पावसाळ्याचा तर ईजिप्तमध्ये नाईलला येणाऱ्या पुराचा या राशीशी संबंध जोडला जाई. ग्रीक पुराणकथेनुसार गॅनिमिडाने देवांसाठी गरूडावरून नेलेला अमृतकुंभ म्हणजेच हा कुंभ होय.[२]
गुणधर्म
सूर्य १६ फेब्रुवारी ते ११ मार्च यादरम्यान या तारकासमूहामध्ये असतो. या राशीचा बहुतेक सर्व भाग खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणेस विषुवांश २० तास ३० मिनिटे ते २४ तास या दरम्यान दिसतो.
वैशिष्ट्ये
तारे
कुंभ तारकासमूह क्रांतिवृत्तवर असून आणि मोठा आकार असूनसुद्धा याच्यामध्ये दुसऱ्या दृश्यप्रतीपेक्षा जास्त तेजस्वी तारे नाहीत.[7] किंबहुना, अलीकडील संशोधनातून असे समोर आले आहे की याच्यातील काही ताऱ्यांभोवती ग्रहमाला आहेत.
α अॅक्वॅरी ज्याला सादलमेलिक या नावानेही ओळखले जाते, एक पिवळा महाराक्षसी तारा आहे. याच्या अरबी भाषेतील नावाचा अर्थ "राजाचे भाग्यवान तारे" असा होतो.[8] २.९४ दृश्यप्रत असलेला हा तारा कुंभमधील दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे.[11] हा पृथ्वीपासून ५२३ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[11] त्याची तेजस्विता ५२५० L☉ आहे.[7]
β अॅक्वॅरी, ज्याला सादलसूद असेही संबोधतात, हा एक पिवळा महाराक्षसी तारा आहे.[12] त्याच्या अरबी नावाचा अर्थ "भाग्यवान ताऱ्यांमधील सर्वात भाग्यवान तारा" असा आहे.[8] हा कुंभमधील सर्वात तेजस्वी तारा आहे आणि याची आभासी दृश्यप्रत २.८९ आणि निरपेक्ष दृश्यप्रत -४.५ आहे[12] हा तारा पृथ्वीपासून ५३७ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे[12] आणि याची तेजस्विता ५२५० L☉ आहे.[7]
γ अॅक्वॅरी ज्याला सादकबिया असेही म्हणतात, निळा-पांढरा[8] ३.८४ दृश्यप्रत आणि ५० L☉[7] तेजस्वितेचा तारा आहे. तो पृथ्वीपासून १६३ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. सादकबिया हे नाव अरबी भाषेतील "तंबूंचे भाग्यवान तारे" या अर्थाच्या शब्दापासून आले आहे.[6]
δ अॅक्वॅरी जो शीट किंवा[7] स्केत म्हणून ओळखला जातो,[8] निळा-पांढरा ३.२७ दृश्यप्रत आणि १०५ L☉ तेजस्वितेचा तारा आहे.[7]
ε अॅक्वॅरी, किंवा अल्बाली,[5] एक निळा-पांढरा ३.७७ आभासी दृश्यप्रत,१.२ निरपेक्ष दृश्यप्रत आणि २८ L☉ तेजस्विता असणारा तारा आहे.[7][8]
ζ अॅक्वॅरी हा एक द्वैती तारा आहे, ज्यातील दोन्ही तारे पांढरे आहेत.[8] एकत्रितपणे याची दृश्यप्रत ३.६ आणि तेजस्विता ५० L☉ भासते. मुख्य ताऱ्याची दृश्यप्रत ४.५३ आणि दुसऱ्या ताऱ्याची ४.३१ आहे, पण दोन्ही ताऱ्यांची निरपेक्ष दृश्यप्रत ०.६ आहे.[7] त्यांचा आवर्तिकाल ७६० वर्षे आहे आणि दोन्ही तारे एकमेकांपासून हळूहळू दूर जात आहेत.[8]
θ अॅक्वॅरी, ज्याला कधीकधी ॲंका म्हणतात,[5] ४.१६ आभासी दृश्यप्रत आणि १.४ निरपेक्ष दृश्यप्रतीचा तारा आहे.[7]
λ अॅक्वॅरी किंवा हुदूर[5] ३.७४ दृश्यप्रतीचा आणि १२० L☉ तेजस्वितेचा तारा आहे.[7]
ξ अॅक्वॅरी किंवा बुंदा, हा ४.६९ आभासी दृश्यप्रत आणि २.४ निरपेक्ष दॅश्यप्रतीचा तारा आहे.[7]
π अॅक्वॅरी ज्याला सीट असेही संबोधतात, ४.६६ आभासी दृश्यप्रत आणि -४.१ निरपेक्ष दृश्यप्रतीचा तारा आहे.[7]
ग्रहमाला
२०१३ पर्यंत कुंभमध्ये बारा ताऱ्यांभोवती ग्रहमाला सापडल्या आहेत. ग्लीस ८७६ हा पृथ्वीपासून १५ प्रकाश-वर्षे,[14] अंतरावरील पहिला लाल बटूतारा होता ज्याच्याभोवती ग्रहमाला आढळली. त्याच्याभोवती चार ग्रह प्रदक्षिणा घालतात, ज्यापैकी एकाचे वस्तूमान पृथ्वीच्या ६.६ पट आहे आणि त्याला घन पृष्ठभाग आहे. या ग्रहांच्या कक्षेचा कालावधी २ ते १२४ दिवस आहे.[15] ९१ अॅक्वॅरी या ताऱ्याभोवती ९१ अॅक्वॅरी बी हा ग्रह फिरत आहे. त्या ग्रहाचे वस्तूमान गुरू ग्रहाच्या २.९ पट आहे आणि कक्षेचा कालावधी १८२ दिवस आहे.[16] ग्लीस ८४९ हा लाल बटूतारा आहे ज्याच्याभोवती ग्लीस ८४९ बी ग्रह फिरत आहे. त्या ग्रहाचे वस्तूमान गुरूच्या ०.९९ पट आणि कक्षेचा कालावधी १८५२ दिवस आहे.[17]
दूर अंतराळातील वस्तू
कुंभ दीर्घिकेच्या प्रतलापासून लांब असल्याने त्यामध्ये प्रामुख्याने दीर्घिका, गोलाकार तारकागुच्छ आणि ग्रहीय तेजोमेघ या दूर अंतराळातील वस्तू आढळतात.[3] कुंभमध्ये मेसिए २, मेसिए ७२ हे दोन गोलाकार तारकागुच्छ आणि मेसिए ७३ हा खुला तारकागुच्छ आहे. कुंभमध्ये दोन प्रसिद्ध ग्रहीय तेजोमेघ आहेत: μ अॅक्वॅरीच्या आग्नेयेकडील शनी तेजोमेघ (एनजीसी ७००९) आणि δ अॅक्वॅरीच्या नैऋत्येकडील हेलिक्स तेजोमेघ (एनजीसी ७२९३).
एम२ (एनजीसी७०८९) हे पृथ्वीपासून ३७,००० प्रकाश-वर्षे अंतरावरील गोलाकार तारकागुच्छ आहे. ६.५ दृश्यप्रतीचा हा तारकागुच्छ लहान व्यासाच्या दुर्बिणीने पाहता येऊ शकतो. त्यातील तारे विभक्त करून पाहण्यासाठी कमीत कमी १०० मिमी व्यासाची दुर्बीण लागते. एम७२ किंवा एनजीसी ६९८१ हा ९ दृश्यप्रतीचा तारकागुच्छ पृथ्वीपासून ५६,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[३]
एनजीसी ७००९ किंवा शनी तेजोमेघ पृथ्वीपासून ३००० प्रकाश-वर्षे अंतरावरील ८व्या दृश्यप्रतीचा ग्रहीय तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ दुर्बिणीतून शनी ग्रहासारखा दिसल्याने १९व्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ लॉर्ड रॉस यांनी त्याला शनी हे नाव दिले. याच्या दोन बाजूंना फुगवटे आहेत जे शनीच्या कड्यांसारखे दिसतात. दुर्बिणीतून तो निळा-हिरवा दिसतो आणि त्याच्या केंद्रस्थानी ११.३ दृश्यप्रतीचा तारा आहे.[३] हेलिक्स तेजोमेघाच्या तुलनेत हा लहान आहे.[४] एनजीसी ७२९३ किंवा हेलिक्स तेजोमेघ हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रहीय तेजोमेघ आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ६५० प्रकाश-वर्षे आहे. त्याचा आभासी आकार ०.२५ चौरस अंश आहे ज्यामुळे तो पृथ्वीवरून सर्वात मोठा दिसणारा ग्रहीय तेजोमेघ आहे. पण, त्याचा आकार खूप मोठा असल्याने तो अंधुक दिसतो.[३] त्याची एकूण दृश्यप्रत ६.० आहे.[५]
एनजीसी ७७२७ ही कुंभमधील एक दीर्घिका आहे. ही एक सर्पिलाकार दीर्घिका असून तिची दृश्यप्रत १०.७ आणि आभासी आकार ३" x ३" आहे.[६] एनजीसी ७२५२ ही दोन मोठ्या दीर्घिकांच्या टक्करीने निर्माण झालेली सर्पिलाकार दीर्घिका आहे. [७]
उल्का वर्षाव
कुंभमध्ये तीन मोठे उल्का वर्षाव आहेत: ईटा ॲक्वॅरिड्स, डेल्टा ॲक्वॅरिड्स आणि आयोटा ॲक्वॅरिड्स.
ईटा ॲक्वॅरिड्स कुंभमधील सर्वात मोठा उल्का वर्षाव आहे. त्याची सर्वोच्च तीव्रता ५ आणि ६ मे या दिवशी असते आणि उल्कांचा दर हा ताशी ३५ उल्का एवढा असतो.[३] या उल्का वर्षावाचा मूळ स्रोत हॅले धूमकेतू आहे. सर्वोच्च तीव्रतेनंतरही काही दिवस ९ ते ११ मे यादरम्यान उल्का दिसतात.[८]
डेल्टा ॲक्वॅरिड्स दोन टप्प्यातील उल्का वर्षाव आहे. याची तीव्रता आधी २९ जुलै आणि नंतर ६ ऑगस्ट रोजी सर्वोच्च असते. पहिल्या टप्प्यातील वर्षाव तारकासमूहाच्या दक्षिण भागामधे तर दुसऱ्या टप्प्यातील उत्तर भागामध्ये दिसतो. दक्षिणेकडील वर्षावाचा सर्वोच्च दर २० उल्का प्रति तास आणि उत्तरेकडील वर्षावाचा दर १० उल्का प्रति तास इतका आहे.[३]
आयोटा ॲक्वॅरिड्स कमकुवत उल्का वर्षाव आहे. याची सर्वोच्च तीव्रता ६ ऑगस्ट रोजी असते आणि उल्कांचा दर साधारणत: ताशी ८ उल्का इतका असतो.[३]
संदर्भ
- ^ a b "Aquarius, constellation boundary". The Constellations. International Astronomical Union. 30 April 2016 रोजी पाहिले.
- ^ ठाकूर, अ. ना. "कुंभ". मराठी विश्वकोश. खंड ४. मुंबई. ६६००.
- ^ a b c d e f Ridpath 2001.
- ^ Levy 2005, पान. 132.
- ^ Levy 2005, पान. 131.
- ^ Sherrod & Koed 2003, पान. 222.
- ^ APOD Atoms-for-Peace Galaxy.
- ^ Sherrod & Koed 2003, पान. 52.