किशनराव देवबा रणवीर
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक किशनराव देवबा रणवीर यांचा जन्म सन १९१२ साली वारंगा फाटा येथे झाला. ते काही वर्षानंतर महालिंगी या गावी राहू लागले. त्याकाळात त्यांचे वडिल देवबा रणवीर हे शेती आणि गावकीची कामे करीत असत. त्या काळात प्रत्येक महार व्यक्तीला गावकीची कामे गावानुसार वाटून दिली जात असे. किशनराव रणवीर यांना महालिंगी येथे गावकी मिळाली. महालिंगी गाव वारंगापासून दूर असल्यााने ते महालिंगी या गावीच राहायला गेले. शेती आणि गावकी व सरपंचकी यामध्ये त्यांना रस होता.
त्यांच्या काळात पळापळीचा काळ म्हणजेच काशीम रझवी यांची संपूर्ण मराठवाड्यावर हुकूमत होती. त्यावेळी किशनराव देवबा रणवीर हे तेव्हा ४२ वर्षीचे होते. उंचा-पुरा, गोरा वर्ण, सहा फुट उंची, काटक शरीर. त्यांचे व्यक्तिमत्व चलाख, म्हणून ओळखले जात होते. महालिंगी या गावात चॉंदखान नावाचा मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ प्रसिद्ध होते आणि आजही तेथेच आहे.
काशीम रझवी हा एक हैदराबाद संस्थानातील एक कर्तबगार सर सेनापती असल्याने संपूर्ण मराठवाडा त्यांच्या ताब्यात होता. तो मराठवाड्यातील आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी जाऊन विशेषतः तेथील पुरुष व्यक्तींना त्यांच्या सहकाऱ्यांकरवी मारहाण करणे, इजा करणे, धमकी देणे, लुटणे असे अत्याचार करीत असे. एखाद्या पारिवारांतील सदस्यांना सांगून ऐकत नसेल तर ठार मारणे अशा प्रकारची हुकूमत संपूर्ण मराठवाड्यातील गावातील खेड्यात होती. काशीम रझवीचे हस्तक असलेले त्यांचे सहकारी रोहिले म्हणून प्रसिद्ध होते. गावपाड्यात रोहिले आले की कोणी म्हणत निजाम आला तर कोणी काशीम रझवी आला, अशा वेगवेगळ्या नावाने काशीम रझवी हा हैदराबाद संस्थानातील सरसेनापती म्हणून ओळखला जात होता.
निजामी राजवटीच्या काळामध्ये किशनराव रणवीर तरुण असल्यामुळे जवळच दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव माळ हे माळावर वसलेले असल्यामुळे तेथील वस्ती ही सर्व धर्मीयांची होती. जेव्हा जेव्हा महालिंगी गावात येत तेव्हा गावातील स्त्रिया भयभीत होवून थरथर कापत असत. पुरुष व्यक्ती कोणी कणगीत लपत असत, तर कोणी ढाळजामध्ये, तर कोणी विहिरीमध्ये उड्या मारत. प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याकरता प्रयत्न करीत असत. अशी भयंकर स्वरूपाची हुकूमत काशीम रझवीची मराठवाड्यातील गावावर होती.
या सर्व संकटानून वाचण्यासाठी किशनरावांनी महालिंगीतून पळ काढत सावरगाव माळ गाठला. या गावाला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता, माळमाळने जाऊन त्या काळात अनेक मोठमोठे दरे, आगडे पायथी घालून त्या काळात सावरगावातील काही आदिवासी समाज व इतर आठरापगड जातीतील काही निवडक लोकांना एकत्रित करून काशीम रझवी आणि त्यांच्या सहकारी यांच्याशी सामना करून झुंज देण्याचा किशनराव रणवीर यांनी आटोकाट प्रयत्न केला. या लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात धाडसाने प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्या काळात महालिंगी गावातील काशीनाथ पातळे परिवारातील एका व्यक्तिला निजामांच्या हस्तकाद्वारे ठार मारण्यात आले. तसेच संगाप्पा वनवले कुटुंबातील एका व्यक्तिला ठार मारण्यात आले ही दहशत स्वतः किशनरावांनी अनुभवलेली असल्याचे दिसून येते.
त्यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्राम हा लढा म्हणजे निजामशाहीच्या विरोधात बंड पुकारणे म्हणजेच जीवावरची पोळी होती.तरीही निजामांचा प्रतिकार करण्यास किशनराव रणवीर तसेच सावरगाव माळ येथील मुळे, डाखोरे, मुरमुरे, परिवारातील सदस्य अशा अनेक व्यक्तींनी या निजामाच्या लढ्याला तोंड दिले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढाकाराने मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभागी झाले होते, निजामी राजवटीविरोधात प्राणांची आहुती दिली, निजामांचा प्रतिकार केला अशांच्या परिवारातील मुलगा, मुलगी नसेल तर ,भाऊ, बहीण, पती-पत्नी अशांना राज्यशासनाकडून आणि केंद्रशासनाकडून मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या सैनिकांना व हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांच्या परिवारातील एका सदस्यांना स्वातंत्र्यसैनिक सन्मान करण्यात येऊन त्यांना पेन्शन लागू केली. १७ सप्टेंबर १९९८ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त हदगांव नगर परिषदेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यसैनिक किसनराव देवबा रणवीर यांचे निधन दि. २० सप्टेंबर २०१२ रोजी झाले. त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसपत्नी स्वातंत्र्यसैनिक हिराबाई किसनराव रणवीर ह्या हयात असून त्यांचे वय वर्षे ९० आहे. त्यांना दोन मुले, एक मुलगी, आणि पाच नातवंडे असा विस्तृत्त असा परिवार आहे.
संदर्भ
https://nanded.gov.in/en/document-category/freedom_fighter/
किशनराव देवबा रणवीर यांची रा. सावरगाव माळ ह. मु. महलिंगी यांची प्रत्यक्ष मुलाखत दि.१७ सप्टेंबर २००२ मध्ये स्वतः नातू डॉ. रणविर धारबा यादवराव यांनी घेतले.