किशनजी
मुळनाव मल्लाजुल्ला कोटेश्वर राव , (जन्म १० ऑक्टोबर १९५३ मृत्यु २४ नोव्हेंबर २०११) किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळापासून कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे. २४ नोव्हेंबर २०११ रोजी पश्चिम बंगाल राज्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.
सुरुवातीचे आयुष्य व शिक्षण
कोटेश्वरचा जन्म पेद्दापल्ली गावात ( जिल्हा करीमनगर, राज्य आंध्र प्रदेश) ब्राम्हण कुटुंबात झाला. कोटेश्वरचे वडील हे स्वातंत्र सैनिक होते. करीमनगरमध्ये त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण १९७३ साली पूर्ण केले. यानंतर कोटेश्वरने कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात प्रवेश घेतला.
नक्षलवादी चळवळीत प्रवेश
हैदराबाद येथे आल्यावर मात्र त्याचे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे गेले. या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या भुमिकेतुन कोटेश्वररावने १९७३ सालीच शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना (Radical Students Union (RSU) ) स्थापन केली. याच चळवळीत त्याची ओळख कोंडापल्ली सीतारामय्या सोबत झाली. हे दोघे पुढे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. १९७५ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली. याच दरम्यान भारतात आणीबाणी घोषित झाली होती. सरकारनेही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच सीतारामय्या व कोटेश्वरराव दोघेही भूमिगत झाले.
नक्षलवादी चळवळीतील आयुष्य
आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये सीतारामय्याने जगीत्याल (जिल्हा करीमनगर, राज्य आंध्र प्रदेश) या गावात भांडवलशाहीच्या विरोधात ‘जैत्रा यात्रा’ म्हणजेच एक जनसभा आयोजित केली होती. यासभेसाठी कोटेश्वररावने फार मेहनत घेतली. या सभेला साधारण ७५ हजार लोक हजर होते. याघटनेतुन कोटेश्वरराव नक्षलवादी चळवळतील प्रमुख घटक झाला. यानंतर सीतारामय्याने रयतकुली संगमची जबाबदारी कोटेश्वरवर सोपवली. या माध्यमातून कोटेश्वररावने संपूर्ण तेलंगणात ( आंध्रप्रदेशमधील भाग) संघटना उभारण्याचे काम केले. १९७९ मध्ये निझामाबाद पोलिसांनी त्याला अटक केली व कारावासाची शिक्षा झाली. एक वर्ष वरंगलच्या केंद्रीय कारागृहात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. यानंतर मात्र कोटेश्वर 'किशनजी' असे नाव धारण करून पीपल्स वॉर ग्रुपच्या कामात सक्रिय झाला. नंतर वेगवेगळय़ा राज्यात प्रदीप, प्रल्हाद, मुरली, रामजी, विमल रेड्डी या नावाने किशनजी वावरत राहिला. सीतारामय्याने किशनजीला प्रांत आंध्र प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी दिली. तीन वर्षे राज्यात सतत संघटनेचा विस्तार केल्यानंतर किशनजीला छत्तीसगड, महाराष्ट्र व ओडिशा या तीन राज्यांची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. दंडकारण्य भागात चळवळीला किशनजीने अतिशय मजबुत स्वरूप प्राप्त करून दिले. देशभरात वेगवेगळय़ा नक्षलवादी गटांचे एकत्रीकरण करण्यात , तसेच पीपल्स वॉर ग्रुप व माओवादी कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) यांचे एकत्रीकरण करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) किंवा भाकप (माओवादी) हा पक्ष स्थापण्यात किशनजीने महत्त्वाची भूमिका बजावली. साधारण २० वर्षे छत्तीसगड, महाराष्ट्र भागात काम केल्यानंतर किशनजी पश्चिम बंगाल मध्ये गेला व त्यानंतर किशनजी ने पुर्व भारतात संघटनेचा प्रसार केला दरम्यानच्या काळात नक्षलवादी चळवळतीलच सहकारिणीशी विवाह केला.
मृत्यु
२२ नोव्हेंबर २०११ पासून २०७ कोब्रा बटालियन (207 Combat Battalion for Resolute Action (CoBRA) Battalion)चे जवान व १६७ व १८४ केंद्रीय राखीव पोलीस दल ( सी आर पी एफ Central Reserve Police Force ) बटालियनचे जवान व पश्चिम बंगाल पोलिसांचे Counter Insurgency Force (CIF),यांनी कुसबानीच्या जंगलात मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहिम हाती घेतली.