Jump to content

काशीनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर


संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे पंडित

७ ऑगस्ट १८९० — १ डिसेंबर १९७६

काशीनाथशास्त्री हे पुणे येथील सुविख्यात वैय्याकरण महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव होत. त्यांचे सर्व शिक्षण पुण्यातच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व फर्गसन महाविद्यालयात झाले. विद्यापीठाच्या सर्व परीक्षांत संस्कृत विषयात प्रथम क्रमांक मिळवून त्या विषयाकरिता असलेली सर्व बक्षिसे व पारितोषिके त्यांनी मिळवली. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना वडिलांजवळ व्याकरण, न्याय, धर्मशास्त्र, पूर्व-उत्तर मीमांसा, वेदान्त यांचा कसोशीने अभ्यास झाला. पुढे अध्यापन करताना याचा विशेष फायदा झाला. विविध प्रकारे अध्ययन झाल्याने विषयांची तयारी फारशी करावी लागत नसे व इतर शास्त्रांच्या पुढील अध्ययनाला पुरेसा वेळ मिळे. पदव्युत्तर परीक्षा व पीएच.डी. करता मार्गदर्शन करणे या कामातही त्यांच्या पूर्व अभ्यासामुळे ; त्यांना काम करणे अवघड गेले नाही.

१९१२ साली  एम. ए.ची परीक्षा देण्यापूर्वीच  गुजरात कॉलेज, अहमदाबाद येथे संस्कृत विषयाचे अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१९ साली ते संस्कृत विभागाचे प्रमुख झाले. १९४५ साली सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते एम.ए.च्या व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. गुजरात विधानसभेने मानद अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केली. तेथे ते १९५५पर्यंत होते. मुंबई विद्यापीठाने १९२३ साली अर्धमागधी हा विषय सुरू केला, तेव्हा परीक्षक म्हणून व अध्यापक म्हणून गुजरात कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली. १९५५नंतर ते पुण्याला स्थायिक झाले. १९६९ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित म्हणून भारत सरकारने त्यांचा गौरव केला. महाविद्यालयात शिकवताना  त्यांनी ‘उत्तररामचरित’, ‘मुद्राराक्षस’ व ‘स्वप्नवासवदत्त’ या पुस्तकांवर विद्यार्थ्यांना उपयुक्त होतील अशा टिप्पण्या काढल्या. अर्धमागधी शिकवायचे म्हणून त्यांनी जैन आगमग्रंथांचे अध्ययन केले आणि ‘कुम्मापुत्ताचरियव’, ‘दासावेआलियसुत्त’ व ‘विंशतिविंशतिका’ या तीन  दुर्मिळ पुस्तकांच्या संशोधित आवृत्त्या त्यांनी काढल्या. ‘भैरवपद्मावतीकल्प’ हे जैन मंत्रशास्त्रावर आधारित असलेले दुर्मिळ पुस्तक - ज्याची एकच हस्तलिखित प्रत उपलब्ध होती, हेही त्यांनी सटीक संपादित केले. जैमिनीचा ‘उपदेशसूत्र’ हा फलज्योतिषावर असलेला ग्रंथ सटीक संपादित केला. ‘संस्कृत व्याकरणाचा इतिहास’, ‘संस्कृत व्याकरणाचा कोश’, ‘परिभाषासंग्रह’ (परिभाषांची सुमारे डझनभर लहान-लहान पुस्तके एकत्र आणून त्यांचा संग्रह केला व त्यास विस्तृत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली), हयग्रीवाचे ‘शक्तिदर्शन’ व त्यावर संस्कृतमधून भाष्य, भर्तृहरीची ‘महाभाष्यदीपिका’ व ‘वाक्यपदीय’ ग्रंथही संपादित केले. ‘महाभाष्यदीपिका’ व ‘वाक्यपदीय’ हे दोन्ही ग्रंथ त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात आचार्य वि.प्र. लिमये यांच्याबरोबर प्रकाशित केले.

त्यांचे वडील वासुदेवशास्त्री यांनी तयार केलेल्या ‘श्रीमद्भगवान्पतंजलीकृत व्याकरणमहाभाष्य’ या सप्तखंडात्मक ग्रंथाच्या संपादनाची महत्त्वाची कामगिरी केली. वासुदेवशास्त्री यांच्या हयातीत या भाषांतराचे दोन खंडच प्रसिद्ध झाले होते. उरलेले चार खंड व पाचवा स्वतंत्र प्रस्तावना खंड, अशी सात खंडांची ही आवृत्ती १९५१ ते १९५४ या काळात काशीनाथशास्त्रींनी प्रसिद्ध केली. प्रस्तावना खंडाचे कर्तृत्व संपूर्णपणे काशीनाथशास्त्री यांचे आहे. त्यात व्याकरणशास्त्रावरच्या सर्व उपलब्ध ग्रंथांचा ऐतिहासिक व चिकित्सक पद्धतीने परामर्श घेतलेला आहे.

१९५१ साली वासुदेवशास्त्री यांच्याच ‘शांकर ब्रह्मसूत्राचे मराठी भाषांतर’ या ग्रंथाची द्वितीयावृत्ती उत्तम प्रकारे संपादून, त्याला विस्तृत व विवेचनात्मक प्रस्तावना  त्यांनी जोडली आहे. अखेरच्या काही वर्षांमध्ये त्यांनी वैदिक व्याकरणात विशेष रस घेतला. त्यातील कठीण भागांवर ‘वेदप्रदपाठचर्चा’ हा ग्रंथ त्यांनी १९७४ साली लिहिला. त्यात सूत्रे, त्यांवर इंगजीतून स्पष्टीकरण, पदपाठासंबंधीचे व्याकरणाचे नियम व परंपरा यांचा विचार केलेला आहे. भारद्वाज बृहस्पतीचा ‘उपलेखसूत्र’ हा ग्रंथ वासुदेवशास्त्री यांनी १९७४ साली प्रकाशित केला. ‘वेदविकृतिलक्षणसंग्रह’ हा त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे. यात वैदिक संहितामधील विकृतींचा विचार करणारे जे ग्रंथ आहेत, त्याचा संग्रह आहे. हा ग्रंथ वासुदेवशास्त्री यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.

काशीनाथशास्त्री यांनी संस्कृत-भारतीय विद्यांच्या अभ्यासात व संशोधनात आपले आयुष्य व्यतीत केले. या विषयांशी संबंधित असे त्यांचे संशोधनपर, विवेचनपर लेख अनेक नियतकालिकात प्रसिद्ध झाले. पुण्यात राहत असताना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आपले विद्वत्तापूर्ण संशोधन ते तेथेच करीत. याखेरीज संस्थेच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांचेही काम त्यांनी पाहिले. शेवटी ते एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच पुण्यातील महत्त्वाच्या संस्था म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, वैदिक संशोधन मंडळ, आनंदाश्रम अशा संस्थांशी ते संबंधित होते. अशा महान व्यक्तीची गुन्हेगारांकडून चोरीच्या उद्देशाने क्रूरपणे निर्घृण हत्या झाली.