काशीनाथ नारायण साने
काशिनाथ नारायण साने | |
---|---|
जन्म नाव | काशिनाथ नारायण साने |
टोपणनाव | बाबासाहेब |
जन्म | २५ सप्टेंबर, इ.स. १८५१ |
मृत्यू | १७ मार्च, १९२७ (वय ७५) |
कार्यक्षेत्र | इतिहास, मराठी साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहास, काव्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | काव्येतिहास-संग्रह मासिक सभासद बखर |
वडील | नारायण साने |
राव बहादूर काशिनाथ नारायण साने उर्फ का.ना. साने (२५ सप्टेंबर, १८५१ - १७ मार्च, १९२७) हे काव्येतिहास-संग्रह मासिकाचे संपादक होते. साने इतिहास अभ्यासक व पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष होते.
पूर्वायुष्य
सानेंनी पुण्याच्या डेक्कन काॅलेज मधून १८७३ साली बी.ए.ची पदवी संपादन केली व नंतर महसूल खात्यात प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने शिक्षण खात्यात नोकरी पत्करली. तेथे त्यांनी उप शिक्षण अधिकारी, ट्रेनिंग काॅलेज , पुणे येथे उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच पुणे, बेळगाव येथे हेडमास्तर इत्यादी पदांवर कार्यरत होते. १९०८ साली मुख्य शिक्षण अधिकारी पदावरून डावलल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दीर्घकाळ प्रामाणिकपणे नोकरी केल्यामुळे इंग्लंडच्या पंचम जाॅर्ज बादशहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारने सानेंना रावबहादूर हा किताब बहाल केला.[१]
इतिहासविषयक कार्य
शिक्षण खात्यात नोकरीला असताना सानेंना जुने ग्रंथ , बखरी जमविण्याचा नाद लागला. नोकरीच्या निमित्ताने मुंबई इलाख्यातील अनेक शाळांना भेटी देण्यासाठी भ्रमण करावे लागे. ह्यामुळे निरनिराळ्या गावांतून कागदपत्रे, ग्रंथ, पोथ्या मिळवणे त्यांना शक्य झाले.
१८७८ साली का. ना. सानेंनी विष्णूशास्त्री चिपळूणकर व जनार्दन बाळाजी मोडक यांच्यासह काव्येतिहास-संग्रह नावाचे मासिक सुरू केले.[२] ह्या मासिकात मराठी काव्य, संस्कृत काव्य व मराठी बखरी , कागदपत्रे ह्यात प्रसिद्ध होत असे. काव्येतिहास संग्रहातील ऐतिहासिक साहित्याची जबाबदारी सानेची होती , तर संस्कृत व मराठी काव्याची जबाबदारी अनुक्रमे चिपळूणकर आणि मोडक यांची होती.
१८७८ ते १८८८ असे अकरा वर्ष काव्येतिहास संग्रह मासिक सुरू होते. ह्या मासिकातून २२ ऐतिहासिक ग्रंथ, ५०१ ऐतिहासिक कागदपत्रे, १९ संस्कृत ग्रंथ व १० मराठी काव्य संग्रह प्रकाशित झाले.[३] हे मासिक बंद झाल्यावरही सानेंचे इतिहास कार्य सुरू होते. सानेंनी मासिकात छापलेल्या बखरी स्वतंत्रपणे व कागदपत्रांचे एकत्र संपादन करून ग्रंथरूपाने प्रकाशित केले. साने १९१३ ते १९२६ पर्यंत भारत इतिहास संशोधक मंडळ ह्या पुण्यातील संस्थेचे अध्यक्ष होते.
ग्रंथसंपदा
- चित्रगुप्त विरचित शिवाजी महाराजांची बखर
- साष्टीची बखर
- काशिराज गुप्ते विरचित नागपूरकर भोसले बखर
- होळकरांची कैफियत
- दाभाडे सेनापती व गायकवाड यांची हकीकत
- मल्हार रामराव चिटणीस कृत शककर्ते श्री शिवछत्रपती महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
- श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज व थोरले राजाराम यांची चरित्रे
- कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिवछत्रपतींचे चरित्र
- मल्हार रामराव चिटणीस कृत राजनिती
- धावडशी येथील ब्रह्मेंद्रस्वामी उर्फ भार्गवबाबा यांचे चरित्र
- भूषण कविकृत शिवराजभूषण काव्य
- पुरषोत्तम पंडित कृत श्री शिवकाव्यम
- साने, का.ना. (१८७५). खरड्याच्या स्वारीची बखर. पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, काशिनाथ नारायण (१८८३). श्रीमंत पंत प्रधान यांची शकावली (PDF) (१ ed.). पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, काशिनाथ नारायण (१८८५). रघुनाथ यादव विरचित पाणिपतची बखर (PDF) (१ ed.). पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, काशिनाथ नारायण (१८८७). श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर (PDF) (१ ed.). पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, काशिनाथ नारायण (१८८९). ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे. पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, का.ना. (१८९३). मल्हार रामराव चिटणीस विरचित थोरले शाहू महाराज यांचे चरित्र (२ ed.). पुणे: काशिनाथ नारायण साने.
- वाड, गणेश चिमणाजी; साने, काशिनाथ नारायण (१९११). सातारकर महाराज व त्यांचे पेशवे यांच्या रोशनिशीतील उतारे खंड ९ - माधवराव बल्लाळ उर्फ थोरले माधवराव पेशवे, भाग १. पुणे: डेक्कन व्हर्न्याक्युलर सोसायटी.
- साने, का.ना. (१९१२). श्रीमंत भाऊसाहेब यांची कैफियत. पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, काशिनाथ नारायण (१९२५). कृष्णाजी विनायक सोहनी विरचित पेशव्यांची बखर (५ ed.). पुणे: काशिनाथ नारायण साने.
- साने, काशिनाथ नारायण (१९३२). कृष्णाजी शामराव विरचित भाऊसाहेबांची बखर (PDF) (५ ed.). पुणे: काशिनाथ नारायण साने.
इतर
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने, रा.का.ना.साने ह्यांचे वसंत व्याख्यानमालेतील १८९६ चे व्याख्यान - संपादक : डॉ.विद्यागौरी टिळक, डॉ. अंजली जोशी , पद्मगंधा प्रकाशन, पुणे , २०**
संदर्भ आणि नोंदी
- ^ कुलकर्णी, अ.रा. (२०११). मराठ्यांचे इतिहासकार. डायमंड पब्लिकेशन्स. pp. Page १२८-१२९. ISBN 978-81-8483-359-1.
- ^ मोडक, ज.बा (१८७८). काव्येतिहास संग्रह पुस्तक १ अंक १ , जानेवारी १८७८. pp. Page १.
- ^ कुलकर्णी, अ.रा. (२०११). मराठ्यांचे इतिहासकार. डायमंड पब्लिकेशन्स. pp. Page १२९. ISBN 978-81-8483-359-1.