Jump to content

काशीनाथ त्र्यंबक तेलंग

काशिनाथ त्र्यंबक तेलंग

टोपणनाव: न्यायमूर्ती तेलंग
जन्म: ३० ऑगस्ट, इ.स. १८५०
मुंबई
मृत्यू: १ सप्टेंबर, इ.स. १८९३
चळवळ: भारतीय स्वातंत्र्य चळवळ
शिक्षण: पदव्युत्तर संस्कृत व इंग्रजी पदवी, एल.एल.बी
अवगत भाषा: मराठी, इंग्रजी, संस्कृत
कार्यक्षेत्र: कायदा, भाषा, इतिहास
धर्म: हिंदू
वडील: त्र्यंबक तेलंग
पत्नी: अन्नपूर्णा
अपत्ये: पंढरीनाथ, द्वारकानाथ व इतर चार मुली

काशिनाथ त्र्यंबक तेलंग (३० ऑगस्ट, इ.स. १८५० – १ सप्टेंबर, इ.स. १८९३) हे ब्रिटिश भारतातील न्यायाधीश, मराठी लेखक-संपादक, व सुधारक होते. ते इ.स. १८८५-८९ या कालखंडात अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस होते. इ.स. १८८९ साली तेलंग मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले, तर इ.स. १८९२ साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

जीवन

काशिनाथ तेलंग यांचा जन्म ३० ऑगस्ट, इ.स. १८५० रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी एका मध्यमवर्गीय सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. काशिनाथ यांच्या जन्मदात्या वडिलांचे नाव बापूभाई होते. त्यांना कृष्णराव व काशिनाथ ही दोन मुले होती. परंतु बापूभाई यांच्या मोठ्या बंधूंना-त्र्यंबक तेलंग यांनी मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी काशिनाथ यांना दत्तक घेतले.[]

शिक्षण

वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर काशिनाथ एका स्थानिक शाळेत जाऊ लागले. ते सुरुवातीला दिनकरपंत दाते यांच्या व नंतर महादेव पंतोजी यांच्या शाळेत जाऊ लागले. लहानपणापासूनच ते हुशार विद्यार्थी होते. काशिनाथ यांचे मराठी शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नवव्या वर्षी एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकण्यासाठी जाऊ लागले.[]

शालेय जीवनात शैक्षणिक पुस्तकांशिवाय ते अवांतर पुस्तके देखील वाचत असत. इ.स. १८६१ मध्ये मिडल स्कूलच्या परीक्षेत, इंग्लिश भाषेत त्यांनी प्रावीण्य मिळवले. त्यांची हुशारी पाहून मुख्याध्यापक एडमंड बर्क यांनी काशिनाथ यांना इंग्रजी तिसरीतून पाचवीच्या वर्गात चढवले.[] शालेय जीवनातच त्यांना मराठी कवितेची गोडी लागली. संस्कृत शिकण्यासाठी ते व त्यांचे वर्गमित्र श्रीपाद ठाकूर यज्ञेश्वर चिमणाजी शास्त्री सुरतकर यांच्याकडे जाऊ लागले. शाळेत इंग्रजी व संस्कृत हे दोन विषय त्यांचे उत्तम होते.[]

इ.स. १८६४ साली काशिनाथ संस्कृत विषय घेऊन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. संस्कृत ही भाषा घेऊन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेले काशिनाथ व श्रीपाद ठाकूर हे पहिले विद्यार्थी होते. एल्फिन्स्टन हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक मिस्टर जेफ्रेसन यांनी काशिनाथांना मॅक्स मुल्लरचे 'संस्कृत वाङ्‌मयाचा इतिहास' हे पुस्तक बक्षीस म्हणून दिले.[]

इ.स. १८६५मध्ये पुढील शिक्षणासाठी काशिनाथ एल्फिन्स्टन महाविद्यालयात जाऊन लागले. पहिल्याच वर्षी त्यांना ज्युनियर स्कॉलरशिप व त्याच्या पुढच्या वर्षी त्यांना सिनियर स्कॉलरशिप मिळू लागली. इ.स. १८६७मध्ये ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले व इ.स. १८६९मध्ये इंग्रजी व संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाले. याच वर्षी ते एल.एल.बी.ची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले.[]

कारकीर्द

न्यायालयीन कारकीर्द

इ.स. १८६८मध्ये काशिनाथ तेलंग एल्फिन्सटन शाळेत संस्कृत शिक्षकाची नोकरी करू लागले. पण त्यांच्या वरिष्ठांनी लवकरच त्यांची नेमणूक एल्फिन्सटन महाविद्यालयात केली. तिथे काम करत असतानाच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलीच्या परीक्षेची तयारी करत होते. इ.स. १८७२मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली.[]

इ.स. १८७२-७३ साली तेलंग यांचे "रामायण-होमर" व "गीता-बायबल" या विषयांवरील निबंध प्रसिद्ध झाले. इ.स. १८८०मध्ये मुख्य न्यायाधीशांच्या शिफारशीवरून तेलंग यांना ठाणे येथे सह-न्यायाधीशाची जागा देण्यात आली होती पण त्यांनी ती नाकारली.[]

तेलंग यांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे न्यायालयात वकिली करताना विशेषतः हिंदू कायद्या संदर्भात याचा त्यांना फायदा झाला. इ.स. १८८९मध्ये न्यायाधीश नानाभाई हरिदास यांच्या निधनामुळे न्यायाधीशाचे पद रिक्त झाले व त्या पदावर काशिनाथ तेलंग यांनी नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे ते ३४ वे न्यायाधीश होते. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदू कायद्यात सुधारणा केल्या.[]

साहित्य क्षेत्रातील योगदान

इ.स. १८७०मध्ये तेलंग यांनी वयाच्या विसाव्या वर्षी "शंकराचार्य यांचे चरित्र" हा निबंध लिहून स्टु.लि.सा. सोसायटीमध्ये सादर केला. त्यांनी इ.स. १८७२मध्ये रामायणावर एक अभ्यासपूर्ण निबंध लिहून डॉ. वेबर यांनी रामायण–काळासंबंधीचा मांडलेला सिद्धान्त खोडून काढला. त्याचप्रमाणे तेलंग यांनी भगवतगीतेवर अभ्यासपूर्ण निबंध लिहून लेरिंगेर याचे भगवद्गीते संबंधीचे प्रतिपादन तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढले.[]

इ.स. १८७४साली तेलंग यांनी मुंबई सरकारसाठी भर्तृहरीची "नीति आणि वैराग्य" ही शतके एकत्र करून सटीप पुस्तक लिहिले व त्याला त्यांनी प्रस्तावना दिली. तसेच इ.स. १८८४साली त्यांनी मुंबई सरकारसाठी विशाखदत्त याच्या "मुद्राराक्षस" या संस्कृत नाटकाची सटीप आवृत्ती लिहिली.[१०]

तेलंग यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांनी "स्थानिक राज्यव्यवस्था" व "शहाणा नेथन" अशी दोन पुस्तके मराठीत लिहिली. त्यापैकी "शहाणा नेथन" हे पुस्तक "Nathan the wise" या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर होते. इ.स. १८८६साली त्यांनी हिंदू युनियन क्लबतर्फे मराठी लोकांना विविध विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी "हेमंतोत्सव" व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेत त्यांनी इ.स. १८८६मध्ये "शास्त्र व रुढी" या विषयावर व्याख्यान दिले व इ.स. १८८९मध्ये त्यांनी "सामाजिक संबंधांवर तडजोड" या विषयावर व्याख्यान दिले.[११] मराठी साहित्याच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या 'महाराष्ट्र भाषा संवर्धक मंडळ' या संस्थेचे तेलंग हे एक संस्थापक होत.[१२].

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
स्थानिक राज्यव्यवस्था
शहाणा नेथननाटक (भाषांतरित)इ.स. १८८७"Nathan the wise" या इंग्रजी नाटकाचे मराठी भाषांतर

[१३]

शैक्षणिक कार्य

इ.स. १८८१मध्ये तेलंग यांची लॉ स्कूलमध्ये हिंदीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. इ.स. १८८९मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यामुळे त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. इ.स. १८७२मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या संस्कृत विषयाच्या परीक्षक म्हणून नेमले गेले. इ.स. १८७७मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या फेलोच्या जागी नेमण्यात आले. इ.स. १८८२मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे सिंडिक झाले. या पदावर ते दहा वर्षे राहिले व इ.स. १८९२ मध्ये त्यांची सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती केली.[१४]

इ.स. १८८२ ते इ.स. १८९२ या काळात मुंबई विद्यापीठात सिंडीक(?) पदावर असताना त्यांनी शेतकी, कायदा, कला या विषयांचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कायद्याच्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या. बी.ए.चा व्यापक अभ्यासक्रम तयार केला व सर्व अभ्यास नीट व्हावा म्हणून मॅट्रिक ते बी.ए.च्या अभ्यासक्रमाची मुदत त्यांनी तीन ऐवजी चार वर्षांपर्यंत केली.[१५]

इ.स. १८८२मध्ये लॉर्ड रिपन याने एज्युकेशन कमिशनची नेमणूक केली. काशिनाथ तेलंग ह्या कमिशनचे सभासद होते. तेलंग दर महिन्याला मुंबईत राहणाऱ्या सुमारे ३०० गरीब विद्यार्थ्यांना फी किंवा पुस्तकं अथवा खानावळीचे पैसे देण्यासाठी आर्थिक मदत करत असत. इ.स. १८९२मध्ये दादर येथे स्थापन झालेल्या "द जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट" या शिक्षणसंस्थेचे तेलंग संस्थापक सदस्य होते. पुण्यात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी स्थापन केलेल्या "न्यू इंग्लिश स्कूल"ला रसायनशास्त्राच्या उपकरणांकरिता तेलंग यांनी ५० रुपये मदत केली होती. इ.स. १८८४ मध्ये "न्यू इंग्लिश स्कूल"च्या "डेक्कन एज्युकेशन सोसायटी"च्या स्थापनेवेळी १००० रुपये भरून तेलंग त्या संस्थेचे पेट्रन (आश्रयदाता) झाले. त्याचप्रमाणे त्यांची संस्थेच्या सल्लागार समितीत निवड झाली. १८८४ पासून ते निधनापर्यंत (१८९३) तेलंग सल्लागार समितीचे सदस्य होते.[१६]

मुंबईतील "नेटिव्ह जनरल लायब्ररी" या वाचनालयाचे तेलंग अनेक वर्षे अध्यक्ष होते. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते इ.स. १८७४पासून अखेरपर्यंत सभासद होते. इ.स. १८९३साली एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी तेलंग यांची निवड करण्यात आली. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे तेलंग हे पहिले भारतीय अध्यक्ष होते.[१७]


राजकीय चळवळ

इ.स. १८७२च्या सुमारास तेलंग यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. त्याच साली त्यांनी मुंबई नगरपालिकेच्या सुधारणेच्या विषयी भाषण दिले. सार्वजनिक व्यासपीठावरून दिलेले हे त्यांचे पहिले भाषण होय. इ.स. १८७६ ते इ.स. १८८० पर्यंत लॉर्ड लिटन भारताचे व्हाईसरॉय त्यांच्या कारकिर्दीत सरकारने भारतीयांच्या हिताकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले. या काळात तेलंग यांनी वेळोवेळी सरकारच्या चुकीच्या कृत्यांवर टीका केली. त्यामुळे तेलंग यांची एक निर्भिड पुढारी म्हणून प्रसिद्धी झाली.[१८]

'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन' स्थापन करण्यात फिरोजशहा मेहता, काशिनाथ त्र्यंबक तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांचा विशेष सहभाग होता.[१९] तेलंग या संस्थेचे सचिव होते. इ.स. १८८५मध्ये प्रिन्सिपॉल वर्डस्वर्थ याने भारतातील खरी बातमी इंग्लंडमधील लोकांना कळावी यासाठी मुंबई इलाख्यात एक समिती स्थापन केली. दादाभाई नौरोजी, काशिनाथ त्र्यंबक तेलंग व बद्रुद्दीन तय्यबजी हे त्या समितीचे सदस्य होते. [२०]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत तेलंग यांचे योगदान होते. काँग्रेसच्या पहिल्या तीन अधिवेशनाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हजर राहू शकले नाहीत. इ.स. १८८४मध्ये अलाहाबाद येथील राष्ट्रीय सभेच्या चौथ्या अधिवेशनाला ते हजर होते. त्यांनी कायदे मंडळाच्या सुधारणे संबंधातील ठराव सभेपुढे मांडला.[२१] इ.स. १८८९मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नेमणूक झाल्याने ते त्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला प्रतिनिधी म्हणून उपस्थित न राहता प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले.[२२]

अखेर

इ.स. १८९२पासूनच तेलंग यांची प्रकृती बरी नव्हती. मोडाच्या दुखण्याचा आजार बळावल्यामुळे १ सप्टेंबर, १८९३ रोजी तेलंग यांचे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी निधन झाले.[२३]

तेलंग यांची स्मारके व स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे पुरस्कार

  • तेलंग यांच्या स्मारकासाठी ऑक्टोबर इ.स. १८९३ मध्ये एक सभा मुंबईत झाली. यावेळी तेलंग यांच्या स्मारकासाठी ४०,००० रुपये इतकी रक्कम जमली. या वर्गणीतून एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत बांधण्यात आली व त्याला "तेलंग विंग" असे नाव देण्यात आले.
  • आताच्या गुजरात राज्यातील व तत्कालीन मुंबई इलाख्यातील पंचमहाल जिल्ह्यामधील एका नवीन शाळेची स्थापना करून तिचे नाव "तेलंग हायस्कूल" असे करण्यात आले.
  • तेलंग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ माटुंगा येथील एका मार्गाला "तेलंग मार्ग" असे नाव देण्यात आले.
  • नारायण विष्णू बापट यांनी मुंबई विद्यापीठात सहा हजारे रुपये देऊन इतिहासतत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास तेलंग यांच्या नावाने सुवर्ण पदक ठेवले. [२४]

संदर्भ व नोंदी

  1. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.२.
  2. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.३.
  3. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.४.
  4. ^ a b कर्नाटकी, १९३१ पृ.५.
  5. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.७.
  6. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.७-८.
  7. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.२३.
  8. ^ "MR. K.T. Telang". www.bombayhighcourt.nic.in. 28 डिसेंबर 2019 रोजी पाहिले.
  9. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.३१ ते ४७.
  10. ^ कर्नाटकी, १९३१ पृ. ४९.
  11. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.५८ ते ६८.
  12. ^ "आजचे महाराष्ट्र सारस्वत". ३० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.५८-५९.
  14. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.७६.
  15. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.७६ ते ७८.
  16. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.८६ ते ८८.
  17. ^ कर्नाटकी, १९३१ पृ.८८-८९.
  18. ^ कर्नाटकी, १९३१ पृ. १३१ ते १३५.
  19. ^ नुरानी, Badruddin Tyabji, २००९ पृ.५१-५२.
  20. ^ कर्नाटकी ,१९३१ पृ. १५५ ते १६२.
  21. ^ कर्नाटकी, १९३१ पृ. १६४ ते १६७.
  22. ^ कर्नाटकी, १९३१ पृ. १६९.
  23. ^ १९३१,कर्नाटकी पृ. १९९.
  24. ^ कर्नाटकी, १९३१ पृ. २००.

संदर्भयादी

  • कर्नाटकी, श्रीनिवास नारायण. नामदार न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे चरित्र (संक्षिप्त आवृत्ती).
  • नुरानी, ए.जी. Badruddin Tyabji (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे