Jump to content

कालिकत विद्यापीठ

केरळ राज्यातील एक विद्यापीठ. कालिकत ह्या ठिकाणी १९६८ मध्ये स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून त्याच्या कक्षेत मल्लापुरम्‌, कननोर, कालिकत, पालघाट व त्रिचूर या महसूल जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालये समाविष्ट करण्यात आली आहेत. ह्याशिवाय विद्यापीठात इतिहास, हिंदी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान ह्या विषयांत संशोधन केले जाते. तसेच संलग्न महाविद्यालयांतील फारूक महाविद्यालय आणि सेंट जोसेफ महाविद्यालय येथेही संशोधनाची केंद्रे आहेत. ह्यांव्यतिरिक्त विद्यापीठाने कोईमतूर येथील ‘साउथ इंडिया टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन’ व पट्टम्बी येथील ‘राइस रिसर्च स्टेशन’ ह्या संस्थांस विद्यापीठीय संशोधनसंस्था म्हणून मान्यता दिली आहे. प्रौढशिक्षण व विस्तार सेवा या विद्याशाखांद्वारे विद्यापीठ प्रौढशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करते तसेच शिक्षक व मागास वर्ग यांसाठी सुधारकेंद्रे चालविते. ही विद्यापीठाची खास वैशिष्ट्ये होत. विद्यापीठाची प्रशासनव्यवस्था विद्यापीठीय संविधानानुसार कुलगुरू व कुलसचिव पाहतात. कुलगुरुपद सवेतन आहे. विद्यापीठाचे उत्पन्न १९७१–७२ मध्ये ११४·०९ लाख रु.व खर्च ११२·४९ लाख रु. एवढा होता. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी असून त्यात १९७१–७२ मध्ये सु. ५३,००० विद्यार्थी शिकत होते.