कारिवणा
वनस्पतीशास्त्रीय नावः Hydrocotyle asiatica L. (हायड्रोकॉटिल एशिआटिका) किंवा Centella asiatica
कुळ: Umbelliferae
नाम:- (सं.) मण्डूकपर्णी, एकपर्णी; (को.) एकपानी; (हिं.) ब्रह्ममंडूकी, खुलखुडी, बल्लारि; (बं.) ब्रम्हमंडूकी, थलखुरी; (गु.) खडब्राह्मी; (क.) ओंदेलग; (ते.) मंडूकब्रह्मी; (ता.) वल्लारै; (मला.) कोडोगम्, मुत्रळ; (तु.) तिमरे; (सिंगाली) हिंगोटुकोल; (ब्रम्हदेश) मिंकहु अविन्; (मलै) दवून् पुंग्घ्; (इं.) Pennywort (पेनीवॉर्ट).
वर्णन: ही जमिनीवर पसरणारी वेल आहे. ही सर्वत्र पावसाळ्यांत उगवते व पाणी मिळाल्यास वर्षभर जगते. ताणे लांबवर जातात व त्यांस पेरापेरांवर मुळे, पाने, फुले आणि फळे येतात; प्रत्येक पेरावर एकच पान असते; पान अखंड, मूत्रपिंडाकृति, दांतेयुक्त व सुमारे १ ते १ १/२ इंच मोठे; पानावर ७ शिरा असतात व कोवळेपणी खालचे अंगावर लव असते; पानाचे देठ लांब असतात; फुले लहान व साधी. ही वेल गुरे, बकरी, डुकरे वगैरे जनावरे खातात. ताजी वनस्पती चुरडल्यास सुवास येतो; चव किळसवाणी कडू व तिखट; पाने सुकविली म्हणजे वास व रूची जातात. औषधांत मुळासकट अखंड वेल वापरली जाते.
कारिवण्याची वेल ब्राह्मीसारखी दिसते परंतु ह्या दोन्ही वेली अगदी भिन्न आहेत. ब्राह्मीची पाने गुळगुळीत व एकापेक्षा जास्त प्रत्येक पेरावर असतात. कारिवण्याची पाने जरा खरखरीत, जरा लहान व प्रत्येक पेरावर एक एक पान असते. ब्राह्मीची क्रिया मज्जातंतूव्यूहावर होते व कारिवण्याची क्रिया त्वचेवर होते.
रसशास्त्र:- ताज्या पानांत ७८ टक्के पाणी असते. सुक्या पानाची १२१/४ टक्के राख पडते. ताज्या पानांत उडणारे तेल असते ते उष्णतेने किंवा उन्हाने उडते.
धर्म:- कारिवणा कुष्ठघ्न, व्रणशोधन, व्रणरोपण, मूत्रजनन, स्तन्यशोधन, संग्राहक, बल्य व रसायन आहे. मोठ्या मात्रेंत कैफजनक आहे. ह्याने डोके दुखते, भोवळ येते व कैफ चढतो. ह्याची त्वचेवर खास क्रिया घडते. ह्याच्यांतील तेल त्वचेंतून बाहेर पडावयास जलदी लागते. त्वचा गरम वाटते व टोचल्यासारखे वाटू लागते. टोचणी प्रारंभी हातापायास जाणवते, नंतर सर्व शरीरभर उष्णता भासते ती इतकी कीं, केव्हां केव्हां असह्य होते. त्वचेंतील रक्तवाहिन्यांचे विकासन होते व त्यांजमधून रक्त जलदी वाहते. त्वचा लाल होते व फार खाज सुटते. सुमारे एक आठवड्यानंतर भूक वाढते. ह्याच्यांतील तेल मूत्रपिंडांतून बाहेर पडते म्हणून मूत्राचे प्रमाण वाढते.
मात्रा:- उजेडांत व पुष्कळ वाऱ्यावर सुकविलेले पंचांगाचे चूर्ण २ ते ४ गुंजा, दिवसांतून तीन वेळ देणे. कारिवण्याचा काढा करू नये, कारण त्यांतील उपयुक्त तेल उष्णतेने उडून जाते. ताजी पाने २ ते ४ मुलांसाठी व ८ ते १२ प्रौढांसाठी.
उपयोग:
- त्वचेच्या रोगांत कारिवणा उत्तम गुणकारी आहे
- सर्व त्वचेच्या रोगांत कारिवणा पोटांत देतात व त्याचा लेप करितात.
- मार किंवा ठेच लागून रक्त सांकळले असल्यास किंवा सूज आली असल्यास कारिवण्याचा लेप करितात.
- कारिवण्याने लघवीचे प्रमाण वाढते खरे तरी त्यास मूत्रजनन म्हणून स्वतंत्र वापरता येत नाही. कारण त्याने मूत्रपिंडास दगा होतो व इतर कांहीं त्रास होतात. जावा बेटांत कारिवण्याचा रस ज्येष्ठीमधाबरोबर दुधांतून मूत्रनलिकेच्या रोगांत देतात.
- उन्हाळ्यांत लहान मुलांस रक्तमिश्रित जुलाब होतात व लघवीस त्रास होतो किंवा लघवी कमी होते तेव्हां २ ते ४ पानांचा रस जिरे आणि खडीसाखरेबरोबर देतात व कारिवणा वाटून त्याची पोळी बेंबीखालीं पोटावर बांधतात. ह्या रोगांत ज्वर असल्यास मलबारांत कारिवणा मेथीच्या फांटाबरोबर देतात.
- बोबडे बोलणाऱ्या मुलांस शब्दोच्चार स्पष्ट होण्यास पाने चावण्यास देतात.
संदर्भ
- ^ 'ओषधीसंग्रह'- डॉ. वामन गणेश देसाई
विकिपीडिया:वनस्पती/यादी