Jump to content

कामाक्षी देवी (शिरोडा, गोवा)

शिरोडा, गोवा येथील देवालयातील श्रीकामाक्षीदेवी

स्थलविषयक

श्री कामाक्षीदेवीचे देवालय, हे उत्तर गोव्यातील फोंडा तालुक्यातील ’शिरोडा’ ह्या ठिकाणी आहे. तसेच शिवनाथ,रवळनाथ,या देवाची मंदिरे आहे.सन २००१ च्या जनगणनेनुसार, ह्या गावाची लोकसंख्या अंदाजे १४५०० च्या जवळपास आहे. शिरोडा हे गाव श्रीकामाक्षीदेवी देवस्थानामुळेच प्रसिद्ध आहे, इथे दर अमावस्येला श्रीकामाक्षीदेवीची खूप मोठी जत्रा भरते. त्यावेळी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ह्या राज्यातून सर्व भाविक हजारोच्या संख्येने येतात. शिरोडा गावात येण्यासाठी प्रथम मडगांव[] अथवा पणजीला यावे लागते, तेथून मडगाव-सावर्डे-शिरोडा किंवा पणजी-सावर्डे-शिरोडा बसेस मिळू शकतात, तसेच बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून टॅक्सी/रिक्षा मिळू शकतात.

देवालय परिसर

शिरोडा गावातून देवालया कडे येताना, प्रथम एक कमान लागते, तिथून पुढे येताच देवालयाचे ऊंच कळस, शिखरे, दीपस्तंभ दिसू लागतात. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसरातील कमालीची स्वच्छता. हे देवालय एका टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि आजूबाजूला खूप प्राचीन वृक्ष आहेत. देवीच्या मंदिराच्या ऊजव्या बाजूस आणखी एक देवालय आहे, त्यात श्री लक्ष्मीनारायण, श्री रायेश्वर, श्री शांतादुर्गा, श्री महाडेश्वर ह्या देवतांच्या मूर्त्या आहेत. देवळासमोर तुळशीवृंदावन,दीपस्तंभ आहे, त्याला लागून अष्टकोनी कमानी असलेली विहीर आहे, ह्याच विहीरीतील जलानी सर्व देवतांवर अभिषेक केला जातो. तिथून पुढे गेल्यावर अग्रशाळा दिसते, मागच्या बाजूस एक छान दगडी कमानी असलेल पाण्याचे कुंड आहे. देवीच्या मंदिरासमोर एक ऊंच दीपमाळ आहे. तिथून आत प्रवेश करतो तो एक संपूर्ण लाकडी सभामंडप आहे, ज्याचा दुतर्फा बसायची सोय आहे, त्यातील दोन दगडी खांबांजवळ साधारण आठ-साडेआठ फूट ऊंचीच्या दोन पितळी समया आहेत, त्याची तेलपात्र पाच लिटर पेक्षा जास्त तेल सामावून घेतील एवढी आहेत. त्या सभामंडपातून पुढे चार पायऱ्या चढल्यावर डावी कडे श्रीवेताळ आणि उजवीकडे श्रीकालभैरव यांची देवळ आहेत. त्यांच्या शेजारी श्रीखुटी आणि श्रीसटी अशा नावाची कुंभार आणि घाडी यांची दैवते आहेत. महाद्वाराजवळ वाद्ये, वाजंत्री वाजवण्याची जागा आहे. महाद्वारातून आत शिरताच अत्यंत शोभिवंत असा सभामंडप दिसतो, जो आठ नक्षीदार दगडी खांबावर उभा आहे. विविध चित्रे, हंड्या, झुंबरे यांनी सजवलेला आहे. ह्या कोरलेल्या नक्षीदार दगडी खांबावर वेगवेगळ्या देवाच्या रंगवलेल्या लाकडी मूर्त्या ठेवलेल्या आहेत.

देवीचे रूप

श्री कामाक्षीदेवी समोर एक चौक आहे. त्याला संपूर्ण चांदीचा दरवाजा आहे, तिथून पुढे दिसतो तो दुसरा दरवाजा तो सुद्धा चांदीचाच, त्याच्यापुढे देवीचा गाभारा आणि त्यात संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर विराजमान श्रीकामाक्षीदेवीची विविध फुलांनी सजलेली अत्यंत मनमोहक अशी मूर्ती आणि तिच्या भोवताली असलेल्या लामणदिव्यांच्या प्रकाशात तिचे रूप आणखीनच तेजःपूंज, तेजस्वी दिसते. श्री कामाक्षी देवीची मूळ मुर्ती ही चांदीची असुन, ती ’महिषासुर मर्दिनी’ रूपातील आहे, ती चतुर्भुज आहे. तिने आपला उजवा पाय महिषासुरावर ठेवला आहे, देवीच्या उजव्या पुढील हातात महिषासुरावर रोखलेले त्रिशूळ आणि उजव्या मागील हातात खड्ग (तलवार) आहे आणि डाव्या मागील हातात ’ढाल’ आहे तर डाव्या पुढील हातात तिने महिषासुराचे केस हातात धरले आहेत. संपूर्ण मूर्ती भोवती अतिशय सुंदर अशी प्रभावळ आहे. ह्या मुर्तीचीच एक छोटी प्रतिकृती गाभा-यात देवीजवळ ठेवलेली आहे, त्या मूर्तीलाच देवीच्या गणाजवळ ठेवून कौल लावतात. देवी पुढील चौकात, अगदी देवी समोर, एक मोठ्या नागाची पितळी प्रतिमा ठेवलेली आहे, तीच ही देवीच्या गणांची जागा. त्या बद्दल असे सांगतात की, त्या नागाच्या मूर्तीखाली एक प्रचंड घंटा पुरलेली आहे आणि त्या घंटेच्या नादाने सर्वात मोठ्ठी संकटे नाहीशी होतात, तिचा नाद ऐकताच देवीचे साठसहस्त्र गण आणि साडेतीन कोटी भुतावळ संकट निवारण्यास सज्ज होतात. याच स्थानाला ’गण’ असे म्हणतात, इथेच देवीच्या प्रतिमेला कौल लावला जातो, त्याला ’प्रसाद-कौल’ असे म्हणतात.

प्रसाद-कौल

प्रापंचिक दुःखाबद्दल, आधिभौतिक,दैविक कृत्यांची गा-हाणी देवासमोर कौल रूपाने मांडून त्याचा उलगडाकरून त्याप्रमाणे वर्तन ठेवणे ह्याला ’प्रसाद’ म्हणतात. या प्रसादाप्रमाणे श्रद्धापूर्वक आचरण केल्यास भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात, ही वहिवाट गोव्यात बहुतेक देवस्थानात अद्यापी चालू आहे. श्रीकामाक्षीदेचीची प्रसाद/कौलाची प्रतिमा वेगळी असून ती महिषासूरमर्दिनी अशी आहे. ती चतुर्भूज असून, हातात त्रिशूळ, खड्ग, ढाल, रूंड धारण केलीली आहे. या मूर्तीस ’करमळ’ वृक्षाची पिकलेली पानाचे तुकडे पाण्याने लावतात. प्रसाद/कौल घेण्याची उजवी आणि डावी अशी दोन अंग आहेत. उजवे स्थान हे शुभदर्शक आहेत. देवीच्या मूर्तीवर, मूर्तीच्या प्रभावळीसकट एकंदर ७२ स्थाने आहेत व त्यांची वेगवेगळी परिभाषा आणि निकाल आहेत. प्रत्येक एकादशी, अमावस्येला, जत्रा, नवरात्र ह्या देवालयातील उत्सवांच्या दिवशी ’प्रसाद-कौल’ लावत नाहीत. दररोज सकाळी निर्माल्यविसर्जनानंतर दुपारी आरती सुरू होईपर्यंत आणि आरतीनंतर रात्रीची आरती सुरू होईपर्यंत प्रसाद-कौलाचे काम चालू असते.

श्रीरैक्षेत्र - श्रीकामाक्षी माहात्म्य

पूर्वी श्री कामाक्षीदेवीचे देवालय हे साष्टी [] प्रांतातील रायतूर खाडीपलीकडे "श्रीक्षेत्र रै" [] नावाच्या क्षेत्रात होते, त्याला आता ’राय’ असे म्हणतात. श्रीरैक्षेत्रातील श्रीकामाक्षी ही वरददेवता, तर मूळदेवता अनुक्रमे श्रीलक्ष्मीनारायण, श्रीरायेश्वर, श्रीशांतादुर्गा, श्रीग्रामपुरुष, श्रीवेताळ ह्या आहेत. श्रीकाळभैरव हा श्रीकामाक्षी सोबत श्रीरैक्षेत्रात आला, याचा उल्लेख स्कंदपुराणातील सह्याद्रिखंडात आहे. पोर्तुगीजांनी सुरू केलेल्या बाटाबाटीच्या धामधुमीत काही भक्त मंडळीं देवांना घेऊन निघाली. ह्या गडबडीत एका कुंभार भक्ताने प्राणावर उदार होऊन देवीची मुर्ती झुआरी नदीपार नेली. नंतर एकचार पाच मैल लपत छपत प्रवास करत सुरक्षित जागा मिळेपर्यंत फिरत राहीली आणि अखेर शिरोडा या गावी एकांत स्थानी स्थिरावली, नंतर सध्याच्या स्थानावरील लहान-मोठे वृक्ष कापून, खडक काढून ही जागा देवालयासाठी तयार केली, त्यावर देवालये बांधून देवतांची स्थापना केली. त्या कुंभार भक्ताची आठवण आणि मान म्हणून देवीच्या दीपोत्सवाच्या दिवशी, देवीला पहिला दीप अर्पण आणि प्रज्वलीत करायचा मान त्या कुंभार समाजातील/वंशातील त्यांच्या वंशजांचा असतो. श्रीरैक्षेत्रात श्रीकामाक्षीदेवी कशी आली याचे वर्णन ’स्कंदपुराणात’ ’श्रीकामाक्षीमाहात्म्यात’ श्नीनारदमुनी आणि अंबरीष ऋषी यांच्यातील संवादरूपाने आढळते, ह्या श्रीकामाक्षीमाहात्म्यात एकूण चार अध्याय आहेत, ते अनुक्रमे १) श्रीकामाक्षीदेवी २) भक्तब्राम्हण: ३) महिषसैन्यवध: ४) महिषासुरमर्दिनी असे आहेत.

देवालयातील नित्यक्रम

देवळातील नित्यक्रम खालील प्रमाणे आहे.

सकाळीनित्यकर्म
५.०० ते ५.३०पहाटेची नौबत
५.३० ते ६.३०सडामार्जन, देवालयातील भांडी घासणे
६.३० ते ७.००निर्माल्य विसर्जन
७.०० ते १०.००एकादष्णी, पंचामृत अभिषेक, प्रसाद
१०.०० ते ११.००पूजा बांधणे, घंटानादाने आरतीचा इशारा देणे
११.०० ते १२.००आरत्या, नैवैद्य, मंत्रपुष्प इत्यादी.
संध्याकाळीनित्यकर्म
१.०० ते ५.००प्रसाद लावणे
५.०० ते ५.३०धुवाळीस, नौबतीस, देवालयातील दिवे पेटवण्यासंबंधी घंटानादाने इशारा
५.३० ते ६.००धुवाळ फिरवणे
६.०० ते ७.००तिन्हीसांजेची नौबत
७.०० ते ८.००प्रसाद घेणे
८.०० ते ९.००आरत्या, नैवैद्य, मंत्रपुष्प
९.०० ते ९.३०गायन, झुलवे इत्यादी.

नित्याच्या आरती आणि अभिषेकाचा क्रम, प्रथम श्रीलक्ष्मीनारायण, त्यानंतर श्रीग्रामपुरूष, मग श्रीरायेश्वर, श्रीशांतादुर्गा नंतर श्रीकामाक्षीदेवी असा आहे. परंतु श्रीकामाक्षी नंतर महालखांब, श्रीवेताळ, नंतर श्रीकाळभैरव यांस अभिषेक केला जातो.

वर्षातील विविध उत्सव

महिनाउत्सव
चैत्रशुद्ध प्रतिपदा, पंचांगपूजन,श्रीरामनवरात्र प्रारंभ, श्रीराम नवमी
वैशाखवसंतपूजा-शुद्ध प्रतिपदा
श्रावणश्रीकामाक्षी - रविवार,सोमवार - रंगपूजा, पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, अमावस्या - जातिपुष्प पूजा
भाद्रपदनवान्न ग्रहणविधी - शुद्ध पंचमी
आश्विनश्रीदेवी घटस्थापना, नवरात्रोत्सव प्रारंभ, मखर, घटविसर्जन, नवचंडी-सप्तशती पाठ, हवन, बलिदान, तरंगमूर्ती मिरवणूक, विजयादशमी, सीमोल्लंघन, दसरा, रंगपूजा, पुष्पपूजा, हरीजागर, काळभैरव क्षेत्रपाल पूजा, दिपावली, श्रीलक्ष्मीपूजन
कार्तिकतैलमार्जन, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा
मार्गशीर्षवनभोजन, काला, गवळणकाला
माघम्हातन, जागर, महाशिवरात्री, जत्रा, सज्जा वरील पूजा
फाल्गुनरथोत्सव, जत्रेतील शिबिकोत्सव, रंगपूजा, होळी, शिमगा

श्रीकामाक्षी शरणपंचक

श्रीकामाक्षी शरणपंचक
श्रीकामाक्षे तव शरणम्‌ । भो करुणाक्षे तव शरणम्‌ । अलक्ष लक्षे सर्व साक्षे । मंगलाक्षे तव शरणम्‌ ॥१॥

आदीमाते तव शरणम्‌ । दुर्गे शांते तव शरणम्‌ ॥२॥ विश्वपालके तव शरणम्‌ । विश्वचालके तव शरणम्‌ । भक्तरक्षके मोक्षदायके । सचित्सौख्ये तव शरणम्‌ ॥३॥ ब्रम्हस्वरूपे तव शरणम्‌ । मायारूपे तव शरणम्‌ । चराचरात्मक चिन्मयरूपे । पाहि सुकृपें तव शरणम्‌ ॥४॥ दीन दयाळे तव शरणम्‌ । पूर्ण कृपाळे तव शरणम्‌ । भक्त माउले दावि पाउलें । विश्व साउले तव शरणम्‌ ॥५॥

संदर्भ व इतर संकेतस्थळांवरील काही चित्रे

  1. ^ मडगांव: मडगांव ह्या ठिकाणी एका साधूचा मठ होता, त्यामुळे त्याचे नाव ’मठग्राम’ झाले असावे असे सांगतात.
  2. ^ साष्टी: स्कंदपुराणातील, सह्याद्रीखंडानुसार, हजारोवर्षापूर्वी श्रीपरशुरामांनी दहा गोत्रांच्या ६६ कुळांना गोमांतकात स्थायिक होण्यासाठी विवीध नियोजीत जागा, अग्रहार, शेतजमीनी दिल्या. त्याच ६६ कुळांच्या भागाला सासष्टी म्हणतात, त्याचा अपभ्रंश होऊन बहुदा ’साष्टी’ हे नाव झाले असावे.
  3. ^ श्रीक्षेत्र रै: सध्या गोव्यात असलेली बहुतेक देवायले ही साष्टी प्रांतामधील रै क्षेत्रातच होती. पोर्तुगीजांच्या जुलूमाचा प्रतिकार तेथील ब्राम्हण करू शकत नव्हते, त्यामुळे ते आपआपल्या देवतांना सोबत घेऊन गोव्यातील विवीध सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत झाले.

http://www.shrikamakshi.com/ Archived 2012-08-30 at the Wayback Machine.

http://www.goaholidayhomes.com/photo-gallery/information/143/ Archived 2013-04-28 at the Wayback Machine. http://www.onefivenine.com/india/villages/North-Goa/Ponda/Shiroda/

संदर्भ आणि नोंदी